आमचे सहस्रबुद्धेकाका बोलायला लागले की काव्य, विचार, सुभाषिते यांच्या अमृतधारा बरसतात. अशीच दोन वाक्ये-
‘झुकता वही जिसमें जान है,
अकड मुर्दे की पहचान है’
जो जिवंत आहे, तोच नम्र होऊ शकतो. जो ‘अकडतो’, कडक असतो, झुकत नाही, तो मृतवत असल्याप्रमाणेच आहे. या विचाराने अंतर्मुख केले! जमलेच तर आपण फक्त देवळात काही क्षण नम्र होतो. एरवी आपण आपल्याच मस्तीत असतो. अनुभवात मीच श्रेष्ठ! कामात मीच मोठा. माझे दु:ख एकच असते- माझ्या अनुभवांचा फायदा करून घ्यावा असे माझ्या घरातील लोकांना अजिबात वाटत नाही. माझी कुणाला किंमत नाही. इतरांनी मला देण्याच्या किमतीला माझ्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. म्हणजेच केंद्रिबदूपेक्षा मी परीघ महत्त्वाचा मानते. परिघावर लक्ष देणे हा ओशोंच्या मते झाला प्रपंच, पण जेव्हा आपले लक्ष आपण अधिकाधिक आत वळवू लागतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने परमार्थाकडे वळतो. परिघावर घडणाऱ्या घटनांचा आपल्यावर परिणाम होऊ न देता केंद्रिबदूकडे वाटचाल केली, तर अबोधापासून स्वबोधाकडे जाता येईल. ही खरी आंतरिक जागृती आहे. देवळातील देवापेक्षा, अंतरातील देवत्व जपणे, निर्माण करणे म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ करणे! संतांनी हेच केले. When you are somebody, anybody can harm you, but when you become nobody, you cannot be harmed by anybody.
तिर्यक कटी चक्रासन
दंडस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. दोन्ही पायांत व्यवस्थित अंतर घ्या. दोन्ही हात सरळ समोर घ्या. हातांची बोटे एकमेकांत गुंफवा. आता शरीर कमरेपर्यंत काटकोनात झुकवा. आता पाय गुडघ्यात न वाकविता दोन्ही हात (सरळ ठेवून) व मान उजवीकडे न्या. काही क्षण थांबून मध्यभागी या. हीच कृती डावीकडे पुन्हा करा.
या आसनाच्या सरावाने शरीर व मनाचे संतुलन व समन्वय सुधारण्यास मदत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा