महाभारतात हेवा वाटावा असे एक व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घेणारा अर्जुन हा तर खरा भक्तच! पण त्याबरोबर या विश्वरूप दर्शनाचे साक्षी झालेला, दिव्यदृष्टी प्राप्त झालेला संजय हा अनेक दृष्टींनी प्रतीकात्मक होऊ शकतो असे वाटते. कृष्ण- अर्जुनाच्या अद्भुत, आश्चर्यकारी, दिव्य अशा संवादाचे प्रत्यक्ष साक्षीदार होणे हा काय निव्वळ योगायोग थोडीच आहे?
साधनेत अशी ‘योगदृष्टी’ प्राप्त झाली पाहिजे असे जन्मत: अंध असलेले गुलाबराव महाराज म्हणत असत. जन्मत: अंध असलेल्या हेलन केलर यासुद्धा आयसाइट व व्हिजन यांतील फरक स्पष्ट करीत. थोडक्यात, डोळ्यांच्या पलीकडे विश्व पाहायला शिकणे ही खरी साधना.
तिर्यक भुजंगासन
आज आपण तिर्यक भुजंगासनाचा सराव करू या.
विपरीत शयनस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. आता दोन्ही पाय एकमेकांना जोडा, हात छातीच्या बाजूला ठेवा. पायांच्या टाचा उंचावल्या पाहिजे व पावले बोटांवर ठेवावीत. आता मान वर उचला. मान वळवून उजव्या पायाच्या टाचेवर दृष्टी स्थिर करा. काही क्षण या स्थितीत राहून, नंतर विरुद्ध बाजूने पुन्हा कृती करा. आसनाच्या अंतिम स्थितीत मानेला बसलेला पीळ पाठकण्यावर आलेला ताण यांवर लक्ष एकाग्र करा. तिर्यक भुजंगासनामध्ये पोटावर दाब येत असल्याने, उदरस्थ अवयवांचे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. दीर्घ श्वसनाचा सराव केल्याने श्वसनक्षमता वाढते. इतकेच नव्हे तर अप्रत्यक्षपणे ह्रदयाची कार्यक्षमता सुधारण्यासही मदत होते. भुंजगासन करताना भेदात्मक शिथिलीकरण अनुभवणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच छातीपासून डोक्यापुढचा भाग वर उचलला असेल तेव्हा नाभीपासून पावलापर्यंतचा भाग अगदी शिथिल ठेवणे महत्त्वाचे आहे.
खा आनंदाने! : मानस पूजा आणि मानस उपवास
वैदेही अमोघ नवाथे आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
भाद्रपद महिना आता सुरू होईल म्हणजे चातुर्मास अर्धा संपलासुद्धा! भाद्रपद महिन्याची सुरुवातच हरितालिका, गणेश चतुर्थी वगैरे सणांनी होते. ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने तसेच वयोमानाप्रमाणे पित्त प्रकृती बळावते म्हणून चातुर्मासातील इतर महिन्यांप्रमाणे या महिन्यात वज्र्य असणारे पदार्थ म्हणजे आंबवलेले पदार्थ जसे इडली / डोसा / ढोकळा / दही वगैरे. चातुर्मासामध्ये कांदा, लसूण आणि मांसाहार टाळला जातो कारण अपचन म्हणजेच शरीराची अन्न पचवण्याची ताकद कमी झालेली असते. म्हणून पचायला जड पदार्थ टाळणेच बरे! दुपारी झोपणेसुद्धा शक्यतो टाळावे.
या महिन्याची सुरुवातच उत्साहवर्धक असते कारण ‘गणपती आगमन’. वर्षांनुवर्षे उपवास करणाऱ्या समस्त ‘आज्या’ वय जसं वाढतं तसं हरितालिकेचा उपवास करू शकत नाही. काही हरकत नाही. उपवासाने आरोग्य बिघडण्यापेक्षा ‘मानस पूजा’ तसा ‘मानस उपवास’ पण तुम्ही करू शकता! म्हणजे काय तर पचेल असं सात्त्विक अन्न सेवन करायचं आणि शक्य तेवढं मन प्रसन्न ठेवायचं.
उकडीचे मोदक तळलेल्या मोदकांपेक्षा चांगले. पुरणपोळीपेक्षा गूळ पोळी चांगली वगैरे वगैरे. ऋतूप्रमाणे पालेभाज्या सोडून सर्व भाज्या चांगल्या. फळ भाज्या उत्तम. पावसाळ्यात मिळणाऱ्या स्पेशल भाज्या पण छान. उदा. कण्टोर्ली. तूर/ चणाडाळ/ उडदडाळ यांच्यापेक्षा मूगडाळ कधीही चांगली.
रवा मोदक
साहित्य- २ वाटय़ा रवा, २ कप किसलेला नारळ, दीड कप गूळ (चुरलेला), अडीच वाटय़ा पाणी , ४-५ वेलचीची पूड , २ टीस्पून तेल किंवा तूप, मीठ आवश्यक म्हणून.
कृती- एक पॅन किंवा कढईत नारळ आणि गूळ एकत्र करावे. कमी आचेवर मिश्रण नीट ढवळून घ्यावे. गूळ वितळेपर्यंत शिजवावे. मिश्रण थंड होऊ द्यावे. पॅनमध्ये पाणी घ्या. त्यात तेल / तूप आणि मीठ घाला. उकळी आणा. रवा घालून मिश्रण नीट ढवळावे. ५-६ मिनिटे कमी आचेवर शिजू द्या. ५-६ मिनिटे झाकून ठेवावे. हाताला थोडे तेल लावून कणिक चांगली मळून घ्यावी. लिंबाएवढे गोळे करून हातावर पुरी थापा आणि त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. परत स्टीम करायची काही गरज नाही. गणपतीचा नैवेद्य तयार.
वयाप्रमाणे काय जमत नाही बघण्यापेक्षा काय जमतंय यातील मजा घेतली तर कोणतेही वय असू दे गणपती बाप्पाचं स्वागत जोमातच करता येईल. मंगेश पाडगावकरांची एक कविता मला नेहमीच स्फूर्तिदायक ठरते कदाचित तुम्हालाही आवडेल –
सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत, की गाणं म्हणत,
तुम्हीच सांगा कसं जगायचं?
डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना,
उन उन घास तुमच्यासाठी वाढतच ना,
दुवा देत हसायचं की शाप देत बसायचं..
तुम्हीच सांगा कसं जगायचं?आनंदाची निवृत्ती : माझे जीवनगाणे
श्रीकृष्ण लाटकर
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ३३ वर्षे नोकरी करून उपकुलसचीव या उच्चपदावरून एप्रिल १९९७ मध्ये निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतरच्या जीवनाचे नियोजन आधीच केले असल्याने नंतर वेळ कसा घालवावयाचा हा प्रश्न आला नाही. आज माझे वय ७२ आहे. लहानपणापासून संगीताचा छंद होता. त्यात वडिलांचे मार्गदर्शन मिळाले. नाटय़संगीत हा आवडीचा विषय होता. म्हणून त्यावरच लक्ष केंद्रित केले. निवृत्तीनंतर लगेचच दर सोमवारी सायंकाळी ६ ते ८ माझ्या ‘स्वर-विलास’ या निवासस्थानी संगीताची साप्ताहिक बैठक चालू केली. आपला आनंद दुसऱ्यासही द्यावा हा त्यामागचा हेतू. आज रसिक श्रोत्यांची संख्या २५/३०च्या आसपास आहे. आजपर्यंत त्यांना मनमुराद नाटय़गीते ऐकविली. त्यांच्यात संगीताची जाण निर्माण केली. दर सोमवारी गाणे ऐकल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते ते समाधान माझ्या आनंदापेक्षाही मोठे आहे अशी माझी धारणा आहे. काही श्रोत्यांमध्ये संगीताचे सुप्त गुण आहेत हे जाणवले व त्यांना मार्गदर्शन केले व ते आता त्यांच्या आनंदापुरते गाणे म्हणून शकतात हे फार मोठे समाधान वाटते व आनंद होतो.
माझा हा छंद ‘स्वांतसुखाय’ असल्याने त्याकडे मी कधी व्यावसायिक दृष्टीने पाहिले नाही. किंवा प्रसिद्धीच्या वलयापासून जाणीवपूर्वक दूर राहिलो. तरीही अनेक थोर विभूतींनी माझ्या कलेची प्रशांसा केली. आकाशवाणीवर मुलाखती झाल्या. अनेक खासगी व जाहीर कार्यक्रम झाले. वृत्तपत्रांतून संगीतविषयक लिखाण प्रसिद्ध झाले. त्यामुळे निवृत्तीनंतरचे माझे जीवन व्यग्र राहिले.
संगीताचा अध्यात्माशी निकटचा संबंध आहे. किंबहुना परमेश्वराकडे जाण्याचा तो अत्यंत जवळचा मार्ग आहे. या दृष्टीने २००० मध्ये प.पू. विष्णू महाराज पारनेकर यांचा मात्र अनुग्रह लाभला. ते संगीताचे मर्मज्ञ असल्याने त्यांची कृपा लाभली. सध्या त्यांच्या कोल्हापूर येथील आध्यात्मिक केंद्राचा मी सक्रिय सभासद आहे.
या माझ्या उपक्रमात माझी पत्नी, माझा सर्व परिवार, बंधू, भगिनी यांचा सक्रिय सहभाग असतो. यामुळे मला मोठा मित्रपरिवार मिळाला. त्यांच्या सहवासात माझा प्रत्येक दिवस आनंदात जातो. त्यामुळे लौकिक अर्थाने मी जरी सेवानिवृत्त असलो तरी मी निष्क्रिय नाही. फक्त जीवनाचा प्रवास बदललेला आहे इतकेच. त्यामुळे जीवन ही एक आनंदयात्रा झाली आहे.
ज्ञान मिळवणे हेच ध्येय
द. के. दिघे
आज मितीस माझे वय पंच्याण्णव वर्षांचे आहे. शालेय शिक्षण गिरगावातील प्रसिद्ध विल्सन हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्या शाळेचे ब्रीदवाक्य ‘नहि ज्ञानेन सद्दशं पवित्रं इह विद्यते’ माझ्या आयुष्याचे ध्येय झाले.
१९७७ साली निवृत्त झाल्यावर मात्र समाजकार्य करण्याची माझी तीव्र इच्छा उफाळून वर आली. नामदेव शिंपी समाजाचा हितवर्धक संघ या संस्थेत कार्य करण्यास आरंभ केला. १९८८ मध्ये समाजाची शिरगणती करून १९९१ साली समाज बांधवांच्या प्रचंड उपस्थितीत शिरगणती अहवाल जाहीररीत्या प्रसिद्ध केला. नंतर काही वर्षांनी वधू-वर सूचक मंडळ काढले. अनेक समाजबांधवांनी या मंडळाचा फायदा घेतला.
१९९१ साली समाजाचे ‘प्रतिनिधी मंडळ’ या दुसऱ्या संस्थेवर अध्यक्ष म्हणून निवडून आलो. १७ वर्षांच्या माझ्या अध्यक्षीय काळात मंडळाची विस्कटलेली घडी बसवली. अतिशय परिश्रम घेऊन अनेकांना हाताशी घेत गावदेवी येथे समाजासाठी ‘संत नामदेव कृपा’ हॉल बांधला.
वयाच्या साठाव्या वर्षी फलज्योतिष शास्त्र व हस्तमुद्रा शास्त्र या गूढविद्या अभ्यासून त्यात प्रावीण्य मिळवले. वयाच्या सत्तराव्या वर्षी ‘ज्योतिषशास्त्री’ ही पदवी मिळविली. वयाच्या नव्वदाव्या वर्षी कोकणस्थ नामदेव शिंपी समाजाचा ‘सामाजिक व संस्कृतिक इतिहास’ हा तीनशे पानी ग्रंथ चार-पाच वर्षे कष्ट करून प्रकाशित केला. या ग्रंथामुळे खूप प्रसिद्धी माझ्या वाटय़ाला आली. त्याची तीळमात्र अपेक्षा नव्हती. मात्र हा ग्रंथ वयाच्या नव्वादाव्या वर्षी प्रकाशित झाल्याचे कौतुक मात्र होते.
अशी ही माझी आनंदाची निवृत्ती पंच्याण्णव वर्षांपर्यंत चालूच आहे. शरीर थकले तरी मन खंबीर आहे. आयुष्यभर ज्ञान मिळवत राहणार अशी मनीषा आहे.
‘वन टच’ची किमया
कल्पना सुळे
माझ्या मुलाने आग्रह करून जेव्हा नवा मोबाइल घ्यायला लावला व त्यावर इंटरनेट, व्हॉट्स अप, गुगल हे सुरू केले तेव्हा भरपूर माहितीचा खजीना हाती आला व इंटरनेट शिकणे ही काय गंमत असते, हे मनोमन पटले.
जेव्हा सकाळी सकाळी व्हॉट्स अप वर फुलांचा गुच्छ, वाफाळत्या चहाचा/ कॉफीचा मग , सोबत सुप्रभातचा संदेश व हातात वृत्तपत्र यांनी दिवसाची सुरुवात होते तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो. मन प्रसन्न होते. हा आनंद एका ६४ वर्षे वयाच्या आजीच्या, त्यातही एकटीने जगणाऱ्या व्यक्तीच्या आनंदातला आहे.
आपण मनात ठरवले आणि प्रत्येक गोष्ट सकारात्मकरित्या घ्यायची असा निश्चय केला, तर खरेच अशक्य असे काही नाही. माझ्या एका छोटय़ा मित्राने मला स्मार्ट फोन कसा वापरायचा, हे शिकवले. मग चुकत-माकत मी फोन हाताळू लागले. आता सवयीने फोन चांगला हाताळता येतो.
आता माझ्या फेसबुक अंकाउंटवर माझ्या मुलाचे मित्र, त्यांचे मित्र-मैत्रिणी, अगदी माझी नातवंडेसुद्धा आहेत. त्यांना माझ्याशी फेसबुकवर गप्पा-गोष्टी शेअर करायला आवडतात. त्यामुळे मी तरुण पिढीशी जोडली गेले आहे. ओळखीचे डॉक्टर, प्राध्यापक, वकील अशा मान्यवर व्यक्तींशीही फेसबुकमुळे नाते जोडले गेले आहे. त्यांच्याकडून विशेष दिवस, चालू घडामोडींवरची टिप्पणी वाचायला मिळते व माहितीत भर पडते. कुणी पावसाळी ट्रिपचे फोटो, घरच्या सण-समारंभाचे फोटो अपलोड करतात तर कुणी घरी आलेल्या भाज्यांचे. धम्माल आनंद येतो हे सगळे पाहताना.
‘मला फक्त आलेला फोन घेता येतो’ किंवा ‘आता काय करायचे या वयात इंटरनेट शिकून’ अशी नाके मुरडणाऱ्यांना सांगावेसे वाटते, ‘जरा चख लो इस का भी मजा!’
या एका ‘टच स्क्रीन’ मुळे खरंच आपण दुसऱ्या दुनियेत जातो जणू. आपल्या भोवती मैत्रीचा नवा रेशीम बंध तयार होतो. आपण तरुणाईशी जोडले जातो, त्यांचा उत्साह पाहतो आणि ताजेतवाने होतो. महत्त्वाचे म्हणजे अपडेट राहतो. म्हणूनच माझे पन्नाशी पार केलेल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना आवाहन आहे, सगळे ग्रह बाजूला ठेवून एकदा बघाच किमया या ‘वन टच’ ची, त्यातल्या परिसस्पर्शाची.
‘आनंदाची निवृत्ती’ साठी मजकूर पाठवताना, निवृत्तीनंतर नवीन एखादी गोष्ट, कला-कौशल्ये शिकला असाल, तर त्याचा अनुभव पाठवावा. १५०-२०० शब्दांची मर्यादा असून पाकिटावर ‘आनंदाची निवृत्ती’ असा स्पष्ट उल्लेख करायला विसरू नका. सोबत आपला फोटो जरूर पाठवा. पत्ता- लोकसत्ता ‘चतुरंग’, प्लॉट नं. १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४०० ७१० किंवा ईमेल करा-chaturang@expressindia.com