पूर्वीच्या काळी असुरांनी येऊन यज्ञ उधळून दिल्याचे संदर्भ आपल्याला ठाऊक आहेत. असुर अर्थात दैत्य, अक्राळविक्राळ, क्रूर अशा अनेक शब्दांतून ही वृत्ती ध्वनित होते; पण ‘आसू’ म्हणजे इंद्रिये! ‘आसूसू रमन्ते इति आसुर:’ म्हणजेच इंद्रियांचे लाड करण्यामध्ये जो रमतो तो असुर. या अर्थाने पाहिले तर आपण सारे जण ‘असुर’च आहोत. इंद्रिये जन्माला घालताना ती बहिर्गामीच असतील, असा शाप ब्रह्मदेवाने दिला आहे, गरुडपुराणात तसा उल्लेख आहे. म्हणूनच आमच्यातील असुर इतरांचे दोष पटकन टिपतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही तन्मात्रांवर आपली इंद्रिये भयंकर प्रेम करतात. बाजारात विक्रीला उपलब्ध असलेल्या भोगाच्या जवळपास सगळ्या वस्तू या पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिये यांचे भरभरून समाधान करण्यासाठीच निर्माण केलेल्या आहेत. ‘गिऱ्हाईकाचे असमाधान हेच ध्येय’ असलेल्या अशा युगामध्ये नवीन नवीन आवृत्त्या पुन:पुन्हा जन्माला येतात. कल्पकता, सर्जनशीलता जरी पणाला लागली तरी परिपूर्णता, शांती, समाधान मिळत नाही. उपभोगाच्या या अग्नीला न विझविता प्रज्वलित करीत ठेवण्याचे कार्य हा आपल्यातील असुर करतो. बहिर्गामी इंद्रियांना अंतर्मुख करविण्याचे काम आपली साधना करते.
प्राणायाम साधनेमध्ये कुंभक म्हणजे काय, हा प्रश्न अनेक जणांनी विचारला. श्वास रोखण्याची क्रिया म्हणजे कुंभक. आंतरकुंभक व बहिर्कुभक असे दोन प्रकार आहेत. पूरक व रेचकाच्या मधील कुंभक तो आंतरकुंभक व रेचकानंतर करायचा तो बहिर्कुभक होय. गं्रथामध्ये दिलेल्या माहितीनुसार ‘निश्चल श्वास’ असे त्याचे यथार्थ वर्णन आहे. याशिवाय पूरक – रेचकाशिवाय होणारा कुंभक ‘केवल कुंभक’ या नावाने प्रसिद्ध आहे. कुंभक यथाशक्ती करावा, असे स्वात्माराम सांगतात.
उज्जायी प्राणायाम
उज्जायी प्राणायाम समजून घेऊ या. उज्जायी म्हणजे श्रेष्ठ प्रकारची प्राप्ती. कुठलेही सुखासन धारण करा. पाठकणा समस्थितीत, डोळे शांत मिटलेले.
आता तोंड बंद ठेवून दोन्ही नाकपुडय़ांनी श्वास आत घ्या. श्वास घेताना घशात स्पर्शजन्य आवाज येईल. आता रेचक करताना – घशातून घर्षण करून कंठसंकोच स्थितीतच श्वास बाहेर सोडा. श्वास सोडतानाही नाद होईल. त्याबाबत सजग राहा.