गदिमांचे शब्द आहेत –
‘ही एक धर्मशाळा
सारे इथे प्रवासी
दिनरात दोन दारे
येण्यास जावयासी’
आपल्या श्वासाचेदेखील असेच आहे. क्षणभर विचार करा. आपण अन्नसेवन करण्यासाठी एकच तोंड वापरतो. पण श्वासाचे सेवन करण्यासाठी मात्र दोन दारे आहेत. वास्तविक दोन्ही नाकपुडय़ांतून घेतलेली हवा घशात, श्वासनलिकेत नंतर एकत्रच होणार आहे, मग ‘दोन दारांचे’ प्रयोजन काय असावे? निर्मात्याने कोणतीही गोष्ट ‘उगीचच’, किंवा ‘दिखावा’ म्हणून निश्चितच निर्माण केलेली नाही. आधुनिक विज्ञानाने दोन्ही नाकपुडय़ांचा मेंदूच्या गोलार्धाशी असलेला संबंध सिद्ध केला आहे. उजवी नाकपुडी ‘घन’ दाब प्रभावित असते तर डावी नाकपुडी ‘ऋण’ दाब प्रभावित करत असते. उजव्या नाकपुडीला योग परिभाषेत ‘सूर्यनाडी’ म्हणतात तर डाव्या नाकपुडीला ‘चंद्रनाडी’ म्हणतात. सूर्यनाडी ऊर्जा प्रदान करते तर चंद्रनाडी शीतलता, शांतता प्रदान करते.
दिवसभरात अगदी पहाटेच्या वेळी आपल्या दोन्ही नाकपुडय़ा एका वेळी उघडय़ा असतात. त्या वेळी साधना खूप छान होते. एकाग्रता येते. दिवसभर एकाआड एक याप्रमाणे नाकपुडय़ांचे श्वसन चक्र चालू असते. त्यानुसार आपली कामे कशी पार पाडावी यांचे मार्गदर्शन करणारे ‘शिव स्वरोदय’ शास्त्र आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे.
आज आपण सूर्याभ्यास शिकूया. उत्साहाची बॅटरी चार्ज करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
सूर्याभ्यास
सुखासनात बसा. पाठकणा समस्थितीत ठेवा. डोळे मिटून घ्या. डाव्या हाताच्या अंगठय़ाने डावी नाकपुडी अलगद बंद करा. डावा हात कोपरात सल ठेवा. आता उजव्या नाकपुडीने पाच आकडे म्हणत श्वास घ्या व मनातल्या मनात पाच आकडे म्हणत श्वास सोडून द्या.
आपण सूर्यनाडीने श्वास घेणे व सोडणे या क्रियेला सूर्याभ्यास म्हणतात. ही प्राणायामाची पूर्वतयारी आहे.
सूर्यनाडीने अनुकंपी मज्जासंस्था उद्दीपित होते. नाडीचे ठोके व रक्तदाब वाढतो. म्हणून कुठलीही कृती शक्यतोवर मार्गदर्शनाखालीच करणे अपेक्षित आहे.खा आनंदाने! : सिंड्रोम
वैदेही अमोघ नवाथे – आहारतज्ज्ञ – vaidehiamogh@gmail.com
प्रिय वाचकांनो, दिवाळीची पूर्वतयारी आतापर्यंत झालीच असेल. पूर्ण उत्साहाने दिवाळीचं स्वागत करायला आपण सज्ज झालो आहोतच. गेल्या आठवडय़ात दिवाळी -आहार- याविषयी आपण बोललो आहोत. आज बोलू या थोडं ‘सिंड्रोम’ विषयी.
दिवाळी झाली की माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते- वजन कमी करायचं किंवा मधुमेह आटोक्यात आणायचा आहे म्हणून! (दिवाळीच्या आधी आले तर चकली-लाडूवर ताव मारता येणार नाही ना!) पण जर आपलं आहार-विहार-निद्रा हे गणित बरोबर असेल तर आणि चार दिवस योग्य प्रमाणात फराळ केला तर काहीच बिघडत नाही.
आता ‘सिंड्रोम’ म्हणजे काय? तर अति-वजन आणि त्याबरोबरच मधुमेह, अति-रक्तदाब आणि रक्तातील वाढलेली कोलेस्टेरोलची पातळी असा एक समूह तयार झाला तर त्याला म्हणतात, ‘सिंड्रोम’ आणि खरं सांगायचं झालं तर हे चारही आजार होतात कारण आपलं त्रिसूत्रीचं गणित चुकतं आणि हे एका दिवसात किंवा चार दिवसांत होत नाही तर हळूहळू आजार होतो. उदा. आज अभ्यास केला नाही म्हणून परीक्षेत कमी मार्क नाही मिळत, तर नियमित अभ्यास केला नाही तर प्रश्न निर्माण होतो. तसंच काल आंबा खाल्ला म्हणून साखर वाढली असं नाही तर नेहमीचं आहाराचं संतुलन सांभाळलं नाही तर समस्या निर्माण होऊ शकते. रक्तवाहिन्या कडक होणं किंवा मधुमेहामुळे किडनी खराब होणं किंवा काल तेलकट खाल्लं म्हणून आज वजन वाढलं हा समजच चुकीचा आहे.
आज आपण थोड मधुमेहाविषयी बोलू या. आपण अन्नसेवन केल्यावर त्याचं रूपांतर शर्करेमध्ये होते जी आपल्या पेशींमध्ये गेल्यावर ऊर्जानिर्मितीचं काम करते. पण पेशींचा दरवाजा उघडण्यासाठी दरवान असतो ‘इन्सुलिन’ आणि जर तोच नसला किंवा असून योग्य काम नाही केलं तर रक्तातील साखरेची पातळी वाढत जाते आणि पेशी उपाशी राहतात- मग काय – वजन कमी होणे, अति तहान लागणे, अशक्तपणा येणे आणि रिपोर्ट्समध्ये वाढलेली साखरेची पातळी दिसणे! आपल्या हातात काय तर- वजन वाढू द्यायचं नाही, आपल्या वयाच्या आणि वजनाच्या प्रमाणे अन्न सेवन करायचं म्हणजे चया-पचय योग्य होईल, शारीरिक व्यायाम आणि चिंता-मुक्त आयुष्य- गणित खूप सोप्पय- जर सोडवलं तर!
मधुमेहींना उपयुक्त अन्नपदार्थ- कारलं, मेथी दाणे, दालचिनी, कडुिनब, जांभूळ बिया वगरे. अर्थात हे जादूई पदार्थ नाहीत. संतुलित आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा. गेल्या महिन्यात माझ्याकडे एक रुग्ण आली होती जिची साखरेची पातळी खूप वाढली होती आणि वजनसुद्धा जास्त होतं. प्रमाणात आणि योग्य आहार, व्यायाम, शिळे आणि मदा- चरबीयुक्त पदार्थ पूर्ण बंद असे मी तिला सांगितले. त्याचा परिणाम म्हणजे, आज माझ्याकडे ती रुग्ण आली, ते पूर्ण नॉर्मल रिपोर्ट घेऊन आणि ५ किलो वजन घटवून. तिला जादूच वाटली, पण फक्त आपल्या तब्येतीची ‘नस’ पकडता आली आणि पचन/ चया-पचय सुधारलं की आरोग्य दूर पळत नाही. त्याचा नक्कीच फायदा होतो.
हिरवंगार सूप :
साहित्य : हिरव्या मटारची सालं : २ कप, हिरवा मटार : २ मोठे चमचे , बारीक कापलेला पालक : २ मोठे चमचे , बारीक चिरलेली कोथिंबिर : २ मोठे चमचे, बदाम : ४, नारळाचे दूध : २ मोठे चमचे , आलं : १ मोठा चमचा, काळीमिरी पावडर : १ चमचा, लाल मिरची बिया : १ मोठा चमचा मीठ चवीनुसार.
पद्धत :
हिरवे मटार , हिरव्या मटारची सालं, बदाम उकडवून घ्या.
बारीक करून गाळा .
त्यामध्ये नारळाचे दूध आणि उरलेले साहित्य घाला, त्याला गरम करा.
गरम गरम सूप प्यायला द्या.
लहानपणापासून मी पाडव्याला कडुनिंब पानं खाल्ली आहेत. त्या वेळी ‘न खाऊन सांगणार कोणाला?’ किंवा पप्पांनी सांगितलं म्हणून मी खात होते. पण त्याच ‘कडू’ चवीने आरोग्यदायी नवीन वर्षांचे ‘गोड’ स्वागत करू या. दिवाळी- पाडवा आणि नव-वर्षांच्या मनोमन शुभकामना!
आनंदाची निवृत्ती : अर्थसाक्षरता वृद्धीतला खारीचा वाटा
वंदना धर्माधिकारी -Vandana10d@yahoo.co.in
योगायोगाने एका दैनिकातच बँकिंगवरच पहिली लेखमाला लिहिली. वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘अभ्यासाशिवाय काही खरे नाही.’ हे मुलींना कायम सांगत आले होते. तेच वाक्य माझ्यासाठी घोकत राहिले. वाचनाची सवय झाली, वाचन वाढले, बँकेतला माझा अभ्यास होताच, पण तरीही लेखमाला करताना पुन्हा एकदा जाऊन प्रत्यक्ष काय व कसे होते हे समजून घेतले. वर्तमानपत्रात लिहिताना मोठी जबाबदारी असते, याची मला जाणीव आहे. वाचकांना नेमके काय हवे याचा अभ्यास करत लिखाण सुरूकेले. साध्या सोप्या शब्दात बँकिंग समजावून देणारी लेखिका अशी थोडीफार ओळख झाली. आज बँकिंग या विषयाची चार पुस्तके माझ्या खाती जमा आहेत. त्याने वेगळीच ओळख दिली मला. लेखमाला प्रसिद्ध झाल्यावर मग त्यावर बोलणे, मार्गदर्शन करणे ओघाने आलेच. वेगवेगळ्या ठिकाणाहून निमंत्रणं येऊ लागली. लेक्चर देणे सुरू झाले आणि आता तर वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी बँकिंगवर लिहिणे सुरूच झाले.
अर्थसाक्षरता वृद्धीसाठी सर्व बँका, राज्य व केंद्र सरकार मोठय़ा प्रयत्नात आहेत. त्यात माझा खारीचा वाटा आहे. समाजासाठी काहीतरी मी देऊ शकते, हे समाधान मला लिहायला लावते. बेस्ट सेलर ‘मत्री बँकिंगसे’ या पुस्तकाचे िहदीत रूपांतर केले. बँकिंग क्षेत्रातील दिग्गज लोकांनी पुस्तकांना वाखाणले. ‘मत्री बँकिंगशी’ पुस्तक भारतीय सर्व भाषांमध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे, असे अनेक मान्यवरांनी सुचविले. मलाही तसे करायला नक्कीच आवडेल. तीन वर्षांच्या काळात पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या निघाल्या. आकाशवाणी पुणे केंद्रावरून सात-आठ वेळा बँकिंगच्या विविध विषयांवर चर्चा केली. पुस्तकांनी मला अनेक माणसे भेटली. काहींशी मस्त मत्री झाली. वैचारिक देवाणघेवाण, समाजासाठीचे वेगळे विचार, मांडणी, कार्यक्रम, बैठका चालूच असतात. अंध मुलांना बँकेच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केले, ती मुलेही जवळ आली.
एकीकडे ललित, वैचारिक, कथा, कविता लिखाण सुरू आहे. कविसंमेलनात सहभाग, स्वरचित कवितांचे सादरीकरण, निवेदन, मुलाखती घेणे मधूनमधून असते. यासाठी वाचन, अभ्यास, लिखाण होते. संपन्न व्यक्तिमत्त्व स्पध्रेत भाग घेतला आणि ‘श्रीमती पुणे २००५’ हा सन्मानही मिळाला. माझीच मला आणि माझी इतरांना वेगळी ओळख झाली. वक्तृत्व, कविता, वादविवाद, संपन्न व्यक्तिमत्त्व, बचत गटातील महिलांचे लिखाण, अशा अनेकविध स्पर्धाचे परीक्षण मी करू लागले. तिथे तर मलाच खूप शिकायला मिळते. दिवाळी अंकात कथा, कविता, लेख, मुलाखती हव्याच असतात त्याची धावपळ नुकतीच संपली. आजपावेतो बँकिंगसह माझी आठ पुस्तके आहेत. त्यातील चार ब्रेलमध्ये रूपांतरित झाली आहेत. बँकिंगवरची नवीन दोन पुस्तके ब्रेलमध्ये लवकरच रूपांतरित होतील.
‘सेकंड इिनग’मध्ये लाभलेलं लेखणीचे मोठ्ठं ऐश्वर्य माझ्याकडे आहे. स्वेच्छानिवृत्तीला आता १४ वष्रे झाली, माझा पुनर्जन्म जणू. शरीर जरा हटून बसतं, सहकार नाकारतं. वय बोलणारच. दुखण्याच्या हातावर गोळी ठेवते, ते जाते पळून अंगणात खेळायला काही वेळ. मी इकडे मोकळी काहीतरी करायला. तरीही अजून खूप काही करायचे बाकी आहे. बघू, कसे जमेल ते.
संगणकाशी मत्री : उपयुक्त वेबसाइट्स
संकलन-गीतांजली राणे -rane.geet@gmail.com
आजी आजोबा, आज आपण तुमच्यासाठी काही उपयुक्त संकेतस्थळांची माहिती देणार आहोत. संकेतस्थळांचा वापर करून तुम्ही तुमच्याकरता असलेल्या योजना, उपयुक्त माहिती घरबसल्या एका क्लिकसरशी मिळवू शकता.
१) http://www.seniorindian.com – या संकेतस्थळाच्या माध्यमातून आजी-आजोबा तुम्हाला घरबसल्या अनेकविध गोष्टींची माहिती मिळू शकते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य कसे जगावे, नव्या पिढीसोबत जुळवून कसे घ्यावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, ज्येष्ठांना अर्थार्जन कसे करता येतील याचे पर्याय, ज्या ज्येष्ठांना जोडीदाराची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी खास मार्गदर्शन, व्यायाम अशा विविध गोष्टींची माहिती दिलेली आहे.
२) http://www.silverinnings.com – या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला वैद्यकीय मदत केंद्रे, हेल्पलाइन्स, वृद्धाश्रम, रक्तपेढी, आíथक नियोजन कसे करावे, याची माहिती मिळू शकते.
३)http://socialjustice.nic.in/careofperson.php – हे संकेतस्थळ सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयामार्फत चालविले जाते. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्याला भारत सरकारच्या ज्येष्ठांसाठी असलेल्या योजना, भारत सरकारमार्फत राबविले जाणारे कार्यक्रम, ज्येष्ठांचे विविध प्रश्न यावर ऊहापोह केलेला असतो.
४)http://pensionersportal.gov.in/seniorcitizencorner.asp – हे संकेतस्थळ खास निवृत्तिवेतनधारकांसाठी आहे. यामध्ये विविध पेन्शन योजना, पेन्शनसाठी लागणारे फॉर्म, सक्र्युलर्स याची माहिती दिलेली आहे.
५) http://india.gov.in/people-groups/life-cycle/senior-citizens – या संकेतस्थळाच्या माध्यमातून आजी-आजोबा तुम्हाला विविध राज्यांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांची आणि तुमच्यासाठी उपयुक्त अशी
इतर माहिती मिळू शकते.
६) http://dadadadi.org – या संकेतस्थळावर ज्येष्ठांसाठी केले जाणारे संशोधन, विविध शहरांतील हेल्पलाइन्स, ज्येष्ठांसाठी उपयुक्त अशा इतर गोष्टी उदा. प्रवास, कोर्ट केसेस, पॉलिस, विमा यांची माहिती दिलेली आहे. शिवाय ज्या आजी-आजोबांना फावल्या वेळेत काम करायचे आहे त्यांच्यासाठी ही इथे मार्गदर्शन केलेले आहे.
काय मग आजी-आजोबा, या संकेतस्थळांच्या माध्यमातून तुमच्यासमोर माहितीचा खजिनाच सापडला आहे. मग लागा कामाला!