कोणतेही आसन करण्यास वयाचे बंधन नाही. सुलभीकरण करण्यास आपल्याला निश्चितच वाव असतो. या सुलभीकरणाचा अभ्यास दीर्घकाल, निरंतर करत राहिल्यास अनेक कठीण आसनेही जमू शकतात, पण वाढत्या वयानुसार सांधे, स्नायू, पाठकणा यांमध्ये दुखणे असल्यास सुलभीकरणाचा सरावच अधिक काळ करणे चांगले. उदाहरणार्थ, मध्यंतरी आपण वज्रासनाचा सराव पाहिला. हे करताना त्रास असल्यास, (वानासनाचा) सराव करता येईल. अंतिम स्थितीत घोटय़ाखाली अथवा गुडघ्याखाली नॅपकिनची एखादी घडी ठेवता येईल अथवा सीटखाली ठेवण्यासाठी एखाद्या उतरत्या पाटाचाही उपयोग करता येईल. आसन म्हणजे ‘स्वरूपे समासन्नता’! साधना केवळ उरकल्या प्रमाणे न करता स्वरूपाशी, आनंदाशी एकरूप होण्यासाठी घेतलेला राजमार्ग आहे हे समजून घेऊनच आसने करावीत.
प्रार्थनासन
 आज प्रणामासन किंवा प्रार्थनासन करू या. दोन्ही पाय जुळवून अथवा व्यवस्थित अंतर घेऊन ताठ दण्डस्थितीत उभे राहा. सावकाश हात कोपरांमध्ये वाकवून छातीसमोर तळवे जोडा. नमस्कार मुद्रा धारण करा. डोळे मिटा. अंतिम स्थितीत आपल्या डोळ्यासमोर प्रार्थनीय, नमनीय, वंदनीय, आदरणीय असे काहीही उदा.- आपले आई-वडील, दैवत/ शास्त्र, निसर्गदृश्य
आणा आणि मनोमन त्याला वंदन करा. मनाची एकाग्रता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी, मनाचा तोल सांभाळण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.आनंदाची निवृत्ती : आणि स्कू टी चालवू लागले
शुभदा पाटकर, डोंबिवली
२५ मे रोजी माझ्यावर निवृत्त शिक्षिका म्हणून शिक्का बसला आणि एवढय़ा मोठय़ा उरलेल्या वेळाचं काय करायचं? या विचाराचा भुंगा सतावू लागला. घरातल्यांकडून इंटरनेट आधीच शिकून घेतलं होतं. पुण्यात मुलाकडे गेल्यावर आपणही ‘टू व्हीलर’ शिकू या अशी इच्छा मनात जोर धरू लागली. तसं कोणतं तरी वाहन चालवायला शिकायचं हे खूप वर्षांपासून मनात घोळत होतं, पण प्रत्यक्षात येत नव्हतं. कोणती तरी अनामिक भीती मनात होती.
  निवृत्त झाल्यावर मात्र आता काहीही होवो, भीतीवर मात करून ही इच्छा पूर्ण करायचीच, हा निश्चय केला. पण यापूर्वी ‘काय घाबरतेस! एवढय़ा बायका चालवतात!’ असे म्हणणारे, आता मात्र माझा पाय मागे ओढू लागले. ‘कशाला विषाची परीक्षा! आतापर्यंत नाही शिकलीस, काही अडले का? गाडी शिकलीस तर आणखी कामं गळय़ात येतील.’ असे अनाहूत सल्ले देऊ लागले. पण ‘टू व्हीलर’ शिकण्यामध्ये मोठा अडथळा होता तो माझ्या वाढीव वजनाचा आणि आकाराचा. त्यामुळे लाजही वाटत होती. सर्व संकोच सोडून मी जेव्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गेले तेव्हा मात्र कमालीची साशंक होते. मला नकार मिळणार असंच वाटत होतं, म्हणूनच जेव्हा तेथील प्रशिक्षकांनी ‘केव्हापासून सुरू करता? असं विचारलं तेव्हा मी स्वप्न रंगवणं सुरू केलं.
त्यांनी विचारलं, ‘तुम्हाला सायकल येते का?’
म्हटलं, ‘लहानपणी म्हणजे ५० वर्षांपूर्वी येत होती.’  ‘ठीक आहे. रोज अर्धा तास प्रॅक्टिस करता येईल. तुम्हाला कोणती वेळ जमेल!’
 ‘पण फी किती?’ ‘फीचं नंतर बघू. आधी आपण सुरू तर करू.’
‘वा! हे तर फारच छान.’ मी म्हटलं.
कदाचित त्यांना वाटलं असेल. मी एक दिवस येऊन सोडून देईन. रात्रभर मला स्वप्नं पडत होती. शिकताना बॅलन्स जाऊन मी पडले. डाव्या मांडीचं हाड मोडलंय, सगळे ओळखीचे मला बघायला आले आहेत. ‘तरी मी सांगत होतो, होते’चा जप सुरू  आहे. पण माझा निश्चय पक्का होता.
शेवटी तो दिवस आला. मी साठीची. अवाढव्य, वजनदार, शिकवणारा विशीचा अगदी किरकोळ. त्याने माझ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला बाकींच्यापेक्षा १० दिवस जास्त लागतील, असं जाहीर केलं. ठीक आहे! लागतील तर लागतील. निवृत्तीमुळे मला वेळेचं बंधन नाहीच. त्याने प्रथम गाडीच्या पार्टस्ची, त्यांच्या कार्याची माहिती दिली. हा ब्रेक, हा एक्सिलेटर, स्पीड इथे फिरवलं की वाढतो, नेहमी समोर बघा, घाबरू नका, असं खूप खूप सांगितलं. पण माझं सर्व लक्ष होतं प्रॅक्टिकलमध्ये, कधी एकदा गाडीवर बसून पुढे पुढे जातेय, असं झालं होतं. मला पहिल्याच दिवशी बॅलन्सिंग आलं. मस्त दोन-तीन फेऱ्या मारल्या. आत्मविश्वास आला, मनातली सर्व भीती गेली. अधून-मधून दोन्ही बाजूला पाय टेकवत मस्त अर्धा तास गाडी चालवली.
शिकवणाऱ्याचा चेहरा प्रथम मिश्कील, पण मग आदराने ओथंबलेला दिसला (म्हणजे अशी माझी कल्पना) दुसऱ्या दिवशी तो म्हणाला, ‘काल मी पाठी पकडलं होतं, आज नाही पकडणार.’ कोणाचा विश्वास बसणार नाही. खरंच सांगते, दुसऱ्या दिवशी मी एकटीनेच गाडी चालवली. घरी येईपर्यंत मन हलकं होऊन तरंगत होतं. लायसन्स मिळाल्याशिवाय सांगणार नव्हते. पण मला कुठचा एवढा धीर? लगेच सगळय़ांना फोनवर सांगून टाकलं. एकजात सर्वानी मला शाब्बासकी दिली. (लहानांचीच पाठ थोपटली पाहिजे असा काही नियम नाही.)
जास्त दिवस कुठे, उलट ८ दिवसांतच मला मस्त ‘टू व्हीलर’ चालवता यायला लागली. आता गाडीवरून ऐटीत जाताना, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी माझ्यावर कौतुकाचा मारा होतो. ‘या वयातही’ असे काहीसे ते कौतुकाचे शब्द असावेत. (असं मला आपलं वाटतं.) पण माझा हात माझ्या पाठीपर्यंत पोहोचत नाही म्हणून मी मनातल्या मनात मला शाब्बासकी देते.
खा आनंदाने : आषाढस्य प्रथमे दिवसे..
वैदेही अमोघ नवाथे, आहारतज्ज्ञ – vaidehiamogh@gmail.com
माझ्या लहानपणापासून बाबांकडून ऐकत आलेले ‘आषाढस्य प्रथमे दिवसे..’ हे शब्द अजूनही प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी आठवतात. आषाढ मास आजपासून सुरू झाला आहे. ऋतू बदल होत असताना आरोग्य टिकवणे  महत्त्वाचे आहे.  आषाढ महिन्यादरम्यान खालील आहार नियम पाळणे जरुरी आहे. पाणी उकळून मगच प्या, कच्च्या भाज्या खाणे टाळा, भुकेपेक्षा थोडे कमी खा. कारण पचन क्षमता थोडी कमी झालेली असते. खोकला, दमा, फुप्फुसातील आजार इत्यादी व्याधी असतील तर त्यांना आटोक्यात ठेवणे जरुरी आहे, तळलेले, आंबट आणि अती तिखट, शिळे अन्न खाणे म्हणजे अनारोग्याला निमंत्रण!
ताजे, सात्त्विक आणि गरम अन्न सेवन करा. शरीरातील वाढलेले पित्त कमी करण्यासाठी सात्त्विक अन्न (मांसाहार वज्र्य) खूप जरुरी आहे. पाऊस म्हटला की गरम गरम भजी / वडे खायला कोणाला नाही आवडणार? पण असे पदार्थ खाऊन आजार बळावले की मग भाताची पेज आलीच. अशी दोन टोकं गाठण्यापेक्षा जिभेवर ताबा  ठेवणं हे उत्तम! आषाढ महिन्याचे स्वागत नक्की करायचे पण आपल्या पद्धतीने.
कुळथाचे कढण
साहित्य : १ कप कुळीथ, ५ कप पाणी, १/२ कप गोड दह्याचे ताक, १ चमचा साखर, चिमूटभर लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, ५-६ कढीपत्ता पाने, २ हिरव्या मिरच्या, १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी १ टेबल स्पून तेल, १/४ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हिंग.
कृती : कुळीथ ८-१० तास भिजवून ठेवा. भिजवलेले कुळीथ चाळणीत झाकून उबदार जागी ठेवा. म्हणजे त्याला मोड येतील. मोड आलेले कुळीथ कुकरमध्ये ५-६ कप पाणी घालून ४-५ शिट्टय़ा काढून मऊसर शिजवून घ्या. कढणासाठी वरचे पाणी ओतून घ्या. कुळीथ नंतर उसळीसाठी ठेवून द्या. कुळथाच्या पाण्यात मीठ, साखर, चिमूटभर लाल तिखट, कोथिंबीर घालून उकळा. उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि मग २-३ मिनिटांनी ताक घाला. फोडणीच्या कढईत तेल गरम करून आधी जिरे मग हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. कढीपत्ता आणि हिंग घालून कढणाला वरून फोडणी द्या.
समस्त वाचकांना हा पावसाळा आल्हाददायी आणि आरोग्यवर्धक जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
संगणकाशी मत्री – बसचे ऑनलाइन बुकिंग
संकलन- गीतांजली राणे –  rane.geet@gmail.com
आज आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसचे ऑनलाइन बुकिंग कसे करायचे, याविषयी माहिती घेणार आहोत. परिवहन मंडळाचे अर्थात MSRTC च्या संकेतस्थळावरून हे तिकीट आरक्षण करता येते. त्यासाठी सर्वप्रथम ही लिंक संगणकावर सुरू करा- https://public.msrtcors.com/ticket_booking/index.php
१. आता आपल्यासमोर सुरू झालेल्या पानावर ’login, new user, faq असे पर्याय दिसतील. या पर्यायांपकी  new user  हा पर्याय नवीन खाते तयार करण्यासाठी निवडा.
२. आपल्याला विचारण्यात आलेली माहिती दिलेल्या रकान्यांमध्ये भरा. ज्या रकान्यांसमोर लाल रंगाचे चिन्ह असेल ते रकाने भरणे अनिवार्य असते, अन्यथा खाते तयार होत नाही.
३. नाव आणि आडनावाची माहिती भरताना अंक किंवा कोणत्याही प्रकारचे चिन्ह रकान्यात भरू नये. खाते तयार करण्यासाठी लागणारे user name हे किमान ३ ते कमाल १२ शब्दांचे असावे.
४. पासवर्ड किमान ६ ते कमाल १२ शब्दांचा असावा. ही सगळी माहिती भरून झाल्यावर proceed  च्या पर्यायावर क्लिक करावे.
५. खाते तयार झाल्यानंतर आपण नोंदविलेल्या ई-मेल पत्त्यावर जाऊन MSRTC  ने दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. आता आपले खाते आपण तिकीट काढण्यासाठी वापरू शकता.
६. खात्यात प्रवेश केल्यानंतर आगमनाचे आणि प्रस्थानाचे ठिकाण, अर्थात कुठून कुठे प्रवास करायचा त्या ठिकाणची माहिती, प्रवासाची तारीख, गाडीचा प्रकार ही सर्व माहिती भरून झाल्यावर आपल्यासमोर सर्व माहिती दिसू लागेल.
७. आता हव्या असलेल्या बसच्या पर्यायावर क्लिक करून अपेक्षित माहिती भरा आणि ऑनलाइन बँकिंगने तिकिटाचे पसे भरा.
८. या संकेतस्थळावरून तिकिटाचे आरक्षण केल्यानंतर त्या तिकिटाचा पिंट्रआउट घेणे आवश्यक आहे.
९. प्रवासाच्या काही वेळ आधी बस स्थानकावर जाऊन तिकीट खिडकीवरून ओळखपत्र दाखवून तिकीट निश्चित करून घ्या. अन्यथा प्रवास करताना अडचणी येऊ शकतात.
१०. या पद्धतीने आरक्षित केलेले तिकीट रद्द करण्याचीही सोय आहे. मात्र, त्यासाठी बसच्या वेळेआधी चार तास ही प्रक्रिया करावी लागते.
काय मग करणार ना ऑनलाइन बुकिंग!

share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
upsc exam preparation tips
UPSC ची तयारी : UPSC मुख्य परीक्षा २०२४ – प्रश्नांचे अवलोकन (भाग ३)
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
new method for elephants counting
विश्लेषण: हत्ती गणनेच्या नव्या पद्धतीतून अचूक संख्या समोर येईल?
article about upsc exam preparation
UPSC ची तयारी : २०२४ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे अवलोकन (भाग २)
Yogic treatment method with science can cure even incurable diseases says acharya upendra
आचार्य उपेंद्र म्हणतात, ‘मधुमेह, गुडघादुखी मंत्र साधना, अंतर योगातून उपचार…’
maharashtra state board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : राज्य शालेय शिक्षण मंडळाला ‘सीबीएसई’चाच अभ्यासक्रम का राबवायचाय? त्यावरून वाद का सुरू आहे?