काही दिवसांपूर्वी आमच्या एका ओळखीच्या आजींनी कमालच केली. दहावीच्या निकालानंतर पेढे द्यायला आलेल्या तीनपैकी दोन मुलींनाच बक्षीस दिले. कारण काय? तर त्या दोघी ‘माझ्या’(त्यांच्या) नातेवाइक आहेत, तिसऱ्या मुलीशी ‘माझी’ फारशी ओळख आहे ना नाते आहे? वास्तविक एक छोटेसे बक्षीस मुलांचा आत्मविश्वास वाढवू शकते, त्या बक्षिसाच्या पैशाला अथवा वस्तूला किंमत नसून त्यामागील भावना, मुलांच्या परिश्रमाचे कौतुक अभिप्रेत आहे हे कळत नाही असे नाही, पण ‘मी’ आणि ‘माझे’ या कल्पनेत आपण खूप काही हरवून बसतो. वास्तविक उपनिषदांनी सांगितलेली चार ब्रह्मवाक्ये, जीव व परमात्मा, यांतील ऐक्यच दाखवितात. ‘प्रज्ञान ब्रह्म ’, ‘तत्वमसि’, ‘अहं ब्रह्मस्मि’, ‘अयमात्मा ब्रह्म’ या महावाक्यांना अनुभूतीचे परिमाण लावायचे असेल तर साध्या साध्या गोष्टींमध्ये ‘मी’ व ‘माझे’पण टाकायला शिकलेच पाहिजे. ‘योगयुक्तात्मा’ होण्यासाठी प्रथम खरे ‘साधक’ होणे आवश्यक आहे. जेव्हा आपण फक्त आपल्या माणसांवर प्रेम करतो, तेव्हा आपण ‘परिच्छिन्न’ म्हणजे भेद करणारी ममता दाखवितो, परंतु सगळी मुले म्हणजे परमेश्वराची अभिव्यक्तीच आहेत हा भाव आला, की कौतुक करताना अगदी समोर तरी भेदाभेद होणार नाही. शेवटी ‘साधना’ म्हणजे तरी काय? आपल्याकडून कुणीही कमी दुखावले जाण्यांसाठी केलेली वर्तणूक!
तिर्यक ताडासन
आज आपण तिर्यक ताडासनाचा सराव करू या. दंडास्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. आता दोन्ही पायांत अंतर घ्या. दोन्ही हात डोक्यांच्या दिशेने वर घ्या आणि हात एकमेकांत गुंफा. आता तळवे आकाशाच्या दिशेने वर करा. आधी शरीर प्रथम उजवीकडे झुकवा. पाय गुडघ्यात सरळ ठेवा. दीर्घ श्वसनाची ४ ते ५ आवर्तने केल्यावर पुन्हा मध्यभागी या. आता डाव्या बाजूने हीच कृती पुन्हा करा. आसनाच्या अंतिम स्थितीत शरीर व श्वासाच्या एकतानतेवर लक्ष एकाग्र करा. दीर्घ श्वसनाची आवर्तने श्वसनक्षमता, पाठकण्याची ताणस्थिती सुधारण्यास मदत करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा