मैत्रेयी केळकर – mythreye.kjkelkar@gmail.com

‘पतंजली योगसूत्रा’त सांगितलेल्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी या अष्ट अंगांचा नाही, तरी त्यातली योगासनं, प्राणायाम याचा आणि जमतील तितक्या शुद्धी क्रियांचा जरी आपण रोजच्या जीवनात समावेश केला तरी शरीराला आणि मनाला एक सहज अशी आंतरिक शक्ती  मिळते. सध्याच्या ‘करोना’ काळात अनेकांनी या अभ्यासाला आपल्या जगण्यात सामावून घेतलं आहे. या योगाभ्यासाचं महत्त्व सांगणारा लेख.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

‘करोना’चं संकट हे सगळ्यांनाच हादरवून टाकणारं ठरलं . या काळात सगळीकडे व्यापून राहिलेली अनिश्चितता, अस्थिरता मनाचा तोल ढळण्यासाठी कारणीभूत होतेय. काहींना आर्थिक विवंचनेमुळे तर काहींना कुटुंब आणि आरोग्याच्या काळजीमुळे एका अनामिक भीतीनं ग्रासून टाकलंय. रुग्णसंख्येत होणारी वाढ, लादलेले र्निबध, चित्त विचलित करणाऱ्या बातम्या आणि संदेश,अतिसावधानता बाळगत करावी लागणारी जीवनावश्यक कामं हे सगळं शरीर आणि मनाची परीक्षा पाहणारं ठरतंय. यातून आपलं आत्मिक बळ टिकवून ठेवत शारीरिक बळ वाढवणं महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्या अवतीभवती असणाऱ्या अनेकांनी प्राचीन योगशास्त्राचा आधार घेत स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला.

भारत देशाला योगाभ्यासाची फार मोठी परंपरा आहे. ऋषीमुनींनी दिलेलं हे योगाचं ज्ञान अशा संकटकाळी कामी येतंय. ‘घेरंड संहिता’, ‘हठयोग प्रदीपिका’, ‘अष्टांग योग’ इत्यादी ग्रंथांमध्ये हे ज्ञान संकलित केलं आहे. या पद्धतींचा अभ्यास करून त्यातल्या उपयुक्त गोष्टींना रोजच्या जगण्यात सामावून  घेत शरीर आणि मन निरोगी राखण्यास अनेकांना मदत होते आहे. यापुढेही आणखी कितीतरी लोक त्यांचा उपयोग करू शकतात. ‘योगाभ्यास’ या शब्दातच अभ्यास आला. अभ्यासात सातत्याला महत्त्व आहे. आपल्या रोजच्या धावपळीत सातत्य राखता येत नाही ही खरी समस्या आहे. पण सध्या आपल्यापैकी अनेक जण घरात आहेत, आपल्यापाशी वेळ आहे.  अशा वेळी आसनं आणि प्राणायामचा अभ्यास सहज जमू शकतो. सध्याच्या काळात शरीर व मनाला सक्षम करणाऱ्या शास्त्राचा अभ्यास करणं हाच उत्तम पर्याय आहे.

योग म्हणजे शरीर आणि मनाची एकतानता, त्यांचा सुरेल साधलेला मेळ. ‘युज्’ धातूपासून तयार झालेल्या योग या शब्दाचा अर्थ म्हणजे जोडणं. संपूर्ण विश्वाशी सुसंगतता, एकसंधता साधणं म्हणजे योग. ते करण्यातून येणाऱ्या अनुभवानं विश्वास दृढ होतो आणि या विश्वासातून सातत्य राखलं जातं. त्यातूनच स्वयंशिस्त आकारते. सातत्य, शिस्त, चिकाटी, अभ्यास आणि निष्ठा यांचा एकत्रित परिणाम म्हणजे उत्तम आरोग्य!  पण म्हणून या सगळ्यासाठी खडतर तपश्चर्या करावी लागते का किंवा हिमालयात जाऊन तपसाधनाच करावी लागते का, तर तसं मुळीच नाही. एकदा निश्चयानं आपण आसन, प्राणायाम आदी गोष्टी शिकून घेतल्या आणि त्याचा सराव केला, की कोणत्याही व्यक्तीला त्याचे इच्छित परिणाम दिसू लागतात.

मीनल जोगळेकर या ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालया’त सहसंचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी पंचवीस वर्षांंपूर्वी योग वर्गात आसन, बंध शिकून घेतले होते. धावपळीच्या जीवनातसुद्धा काही र्वष त्या योगाचा अभ्यास करत होत्या. टाळेबंदीच्या काळात मात्र मिळालेल्या वेळेचा उपयोग करत त्यांनी आपला अभ्यास वाढवला. योगासनांच्या नियमित अभ्यासानं आता त्यांचा उत्साह दुणावलाय. व्यायाम ही आवडीची गोष्ट झाली आहे. त्या म्हणतात, की योगाभ्यासानं शरीर आणि मनावर तर सकारात्मक परिणाम दिसतोच, पण या संकटकाळी येणाऱ्या नैराश्यालाही दूर ठेवता येतं.

व्यवसायानं शिक्षिका असलेल्या नीलम कात्रे यांनीही या अडीच महिन्यांच्या कालावधीत प्राणायामचा सराव केला. काही आसनांमुळे पायाच्या दुखण्यातूनही त्यांना आराम मिळाला. आता त्या थोडा वेळ तरी जमिनीवर मांडी घालून बसू शकतात. त्या म्हणतात, की सगळं काही सुरळीत झाल्यावर जेव्हा मी कामावर जायला सुरुवात करीन तेव्हाही योगासनांचा सराव असाच चालू ठेवणार. त्यासाठी सकाळी थोडं लवकर उठायला लागलं तरी चालेल.

देवकी आणि नीता या दोघी मैत्रिणी. दोघीही जोडीनं योगासनं शिकल्या होत्या. टाळेबंदीच्या काळात जेव्हा व्यायामशाळेत काय, साधं चालायला जाणंही शक्य नव्हतं, अशा काळात योगाच्या सरावाचा त्यांना खूप फायदा झाला. रोज ठरवून आपापल्या घरी राहूनच, पण एका ठरावीक वेळी दोघीही योगासनं करतात. त्यांच्या मते योगामुळे शरीराला दिला जाणारा हवासा ताण आणि सर्वागाला होणारा व्यायाम  शरीर आणि मनाला प्रसन्न करणारा असतो. प्राणायामाच्या अभ्यासानं करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी एक प्रकारे आम्हाला मदतच झाली. साधा सर्दी-खोकलाही एवढय़ा दिवसांत जवळ फिरकला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

प्रियांका माल्कन योगशिक्षिका आहेत. त्यांच्या मते योगासनं ही प्रत्येक माणसाच्या परिचयाची असतात. रोजच्या जगण्यात अत्यंत स्वाभाविकपणे ती आपण करत असतो. पण हे विशिष्ट आसन आहे किंवा या आसनाला हे नाव आहे, हे आपल्याला माहीत नसतं. लहानपणी जमिनीवर पालथं पडून तळहाताच्या आधारानं हनुवटी तोलत, पाय गुडघ्यात वाकवून किती तरी वेळा आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा केलेल्या असतात. पण त्या वेळी हे ‘मकरासन’ आहे, याची आपल्याला जाणीव नसते. रोज मांडी घालून बसणाऱ्या लोकांना तरी कुठे माहीत असतं की ते ‘सुखासना’त बसलेले असतात. आळस आल्यावर किती तरी वेळा हात ताणत, चवडे उंचावत आपण ‘ताडासन’ केलेलं असतं.  खाण्यापिण्याच्या क्रिया जशा आपल्याला जन्मजात अवगत असतात त्याप्रमाणेच योगक्रियाही आपल्याला अवगत असतात. आपल्याला करायचा असतो तो फक्त जाणीवपूर्वक अभ्यास.

‘योग विद्या निके तन’चे ज्येष्ठ योग शिक्षक आणि अभ्यासक महेश सिनकर म्हणतात, की योगाभ्यासानं आपल्या शरीरात ऊर्जेचा प्रवाह वाढतोच, पण आपल्या स्नायूंना बळकटी येते आणि त्यायोगे शरीर आणि मनाचं आरोग्य सुधारतं.  योगसाधनेनं शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात हे विषद करताना योगतज्ज्ञ सुभाष शुक्ल म्हणतात, ‘‘योगासनं पूर्णत: एकाग्र होऊन केली, तर त्याचा शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम लवकर जाणवतो.  ‘कपालभाती’, ‘अनुलोम-विलोम’ यांसारख्या शुद्धी क्रियांचा शरीरावर सूक्ष्म परिणाम होत असतो. यामुळे अंतस्थ अवयवांना हलका मसाज  होतो आणि आरोग्य सुधारतं.’’

घेरंड संहितेत किंवा हठयोग प्रदीपिकेत विविध बंधांचं विवरण आहे. ‘त्रिबंध’ लावत ‘कुंभका’चा अभ्यास करण्यानं शरीरातील छोटय़ात छोटय़ा पेशीला प्राणवायूचा पुरवठा होतो. त्यायोगे ऊर्जा प्रवाहित होऊन श्वसन,पचन, उत्सर्जनादी  क्रियांमध्ये सुधारणा होते, शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारतं.

‘पतंजली योगसूत्रा’त सांगितलेल्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी या अष्ट अंगांचा नाही, तरी त्यातली योगासनं, प्राणायाम याचा आणि जमतील तितक्या शुद्धी क्रियांचा जरी आपण रोजच्या जीवनात समावेश केला तरी शरीराला आणि मनाला एक सहज अशी आंतरिक शक्ती  मिळेल.

ज्ञानदेवांनी आपल्या ओजस्वी शब्दांत ‘योगीया’चं  सुंदर वर्णन केलंय-

‘तो कनकचंपकाचा कळा

की अमृताचा पुतळा

नाना सासिंनला मळा

कोवळिकेचा’

ज्ञानदेवांनी वर्णिलेल्या अनुपम तेजाचं रूप साधण्यासाठी जरी अधिक साधनेची गरज असली तरी आपण थोडं तरी तेज योगाभ्यासानं नक्कीच प्राप्त करू शकू शकतो.