सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
ध्येयनिश्चिती जीवनाला दिशा प्राप्त करून देते. एवढेच नव्हे तर आपण करत असलेल्या प्रत्येक हालचालीला योग्य किंवा अयोग्यतेचे परिमाण देते. ते जर नसेल तर आपण जे करत आहोत ते चूक का बरोबर याचा निर्णय घेता येत नाही. पालक म्हणून आपल्या पाल्याची ध्येयनिश्चिती होण्यासाठी त्याला मदत करणे हे माझे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे.
यासुंदर कवितेत खलिल जिब्रानने पालकत्वाची काव्यात्म व्याख्याच दिलेली आहे. आपण सगळे पालक म्हणजे धनुर्धारी आहोत. आपल्याकडे असणारे बाण फार काळ आपले राहणार नाहीत. कारण धनुर्धारी म्हणून त्या धनुष्याची प्रत्यंचा ओढून त्या बाणांना दिशा व वेग देऊन सोडण्यापलीकडे आपल्याला गत्यंतर नाही. या बाणांचा प्रवास दिशाहीन भरकटलेल्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे व दिशेप्रमाणे वळणाऱ्या पिसाप्रमाणे होऊ द्यायचा की आपण सुनिश्चित केलेल्या योग्य अशा लक्ष्याचा अचूक भेद करण्यासाठी वापर करायचा हे आपल्या हातात आहे.
या संदर्भात मला एक उदाहरण येथे द्यावेसे वाटते. मी पोस्टग्रॅज्युएट करत असताना आमच्या वसतिगृहात एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि म्हणाला की, ‘मी युनिव्हर्सिटी सीनेटर विद्यार्थी प्रतिनिधी होण्यासाठी निवडणूक लढवतो आहे. तेव्हा तू तुझे मत मला दे. त्या काळात, मुख्यत: राजकीय पक्ष या निवडणुकीत भाग घेत असत. त्यामुळे मी त्याला आश्चर्याने विचारले, तू कशाला या घाणेरडय़ा राजकारणात पडतोस? तो म्हणाला, ‘‘माझ्या आयुष्यात मी जे काही करतो त्यामागे निश्चित उद्दिष्ट असते.’’
‘तुझ्या आयुष्याचे उद्दिष्ट काय?’ तर तो उत्तरला, ‘मला एक मल्टिनॅशनल फार्मास्युटिकल कंपनीचा सरव्यवस्थापक व्हावयाचे आहे.’ त्याचे उत्तर ऐकून मी चकित झालो. त्याला सहज विचारले, ‘हे तू केव्हा ठरवलेस?’ तो म्हणाला, वयाच्या ७ व्या वर्षी. मला हसू आलं. मी त्याला म्हटलं की त्या वयात या शब्दांचा अर्थदेखील कळत नाही. त्यावर तो म्हणाला, ‘‘अगदी बरोबर. या शब्दांचा अर्थ तेव्हा मला माहीत नव्हताच!’’ ‘मग तू हे कसे ठरवलेस? त्यावर तो म्हणाला, ‘‘मी ७ वर्षांचा असताना आमच्याकडे रात्रीच्या जेवणासाठी माझ्या वडिलांनी एका गृहस्थाला आमंत्रित केले होते. लहान असल्यामुळे मी फारच उत्सुक होतो हे जाणून घेण्यासाठी की कोण येत आहेत? संध्याकाळी बरोबर ५ वाजता आमच्या दारासमोर एक पांढरी सफेद रंगाची मर्सिडीज बेंझ गाडी उभी राहिली. त्यातून पांढराशुभ्र युनिफॉर्म घातलेला ड्रायव्हर बाहेर पडला. त्याने अदबीने मागचे दार उघडले. आतून एक भारदस्त व्यक्तिमत्त्वाची एक सुटाबुटातली व्यक्ती बाहेर आली. माझ्यावर त्या व्यक्तीचा फारच प्रभाव पडला. मी बाबांना विचारले, ‘हे कोण?’
‘अरे हेच ते मि. बॅनर्जी, ज्यांना आपण जेवायला बोलावले आहेत ते.’
मी बाबांना विचारले, ‘हे काय करतात?’
ते म्हणाले, ‘ते सरव्यवस्थापक आहेत एका कंपनीचे.’
‘कोणती कंपनी?’
‘सीबा गायगी.’ ते उत्तरले.
मी विचारले, ‘म्हणजे काय?’
ते म्हणाले, ‘ ती मल्टिनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी.’
मला त्यातून काहीही बोध झाला नाही. पण आपण आयुष्यात काय करावयाचे ते ध्येय निश्चित झालं. त्यानंतर माझे प्रत्येक पाऊल त्या दिशेने पडत आहे. उदा. मी जेव्हा १० वर्षांचा होतो. तेव्हा राजकीय हिंसाचार सुरू असल्यामुळे दोन वर्षे कलकत्त्यातल्या शाळा व कॉलेजेस् बंद होती. मी वडिलांना लगेच सांगितले की मला दिल्लीला पाठवा. दिल्लीत मॅट्रिक्युलेट केल्यानंतर मी मुंबईत आलो. कारण शेवटी हीच माझी कर्मभूमी होती. इंटरसायन्सनंतर मेडिकल की इंजिनीयर असा प्रश्न मला पडलाच नाही. माझी दिशा स्पष्ट होती. त्यानुसार मी बी.फार्म. आणि नंतर एम. फार्म. केले. ज्या कंपनीत मी जनरल मॅनेजर होणार त्या विषयातली अत्युच्च डीग्री म्हणजे पीएच. डी. फार्माकालॉजीमध्ये सध्या करत आहे. पण जरी मी डॉक्टरेट मिळवली तरी माझा बायोडेटा असा असला पाहिजे की तो पाहताच मला मुलाखतीचे आमंत्रण आले पाहिजे. तसे होण्यासाठी दोन अशा व्यक्तींची शिफारस हवी आहे की ते बघून वाचणारा चकित होईल. त्या दोन व्यक्ती मी निवडल्या आहेत. एक माझ्या इन्स्टिटय़ूटचे डायरेक्टर. ती शिफारस मी आधीच मिळवलीय. दुसरी व्यक्ती म्हणजे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू. ते मिळवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय. ज्यायोगे त्यांची आणि माझी ओळख होईल आणि माझ्या भाषणचातुर्याने त्यांचे मन जिंकेन आणि मला हवे ते मिळवेन. बऱ्याच वर्षांनंतर मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा तो सिंगापूरला एका अमेरिकन कंपनीचा सरव्यवस्थापक होता. २७ देशांतल्या कंपन्या त्याच्या हाताखाली होत्या. मला भेटायला तो त्याच्या मर्सिडीज बेंझमध्ये बसून आला होता. हे तर होणारच होते. त्याचे विधिलिखित त्याने स्वत: लिहिले होते. त्या दृष्टीने त्याची प्रत्येक हालचाल व वाटचाल अचूक व लक्ष्यवेधी होती.
शिक्षक म्हणून मला आलेला अनुभव असा की ९० टक्के मुलांना आपल्याला काय करायचे हेच माहीत नसते. त्यांची रोजची दिनचर्या बाघितली तर ते खूप काही करताना दिसतात. परंतु त्यातून फारसे काही साध्य होत नाही. मी जर उद्या पी. टी. उषाला बोलावले व सांगितले की या वर्तुळात गोल-गोल फिरत राहा. तू धावपटू आहेस ना? जरा वेगाने पळ. ती कितीही वेगाने पळाली तरी ती आहे तिथेच राहणार. कुठेही दुसरीकडे पोहोचणार नाही. याउलट तुम्हाला जर दिशा माहीत असेल तर तुम्ही धावपटू नसलात तरी हव्या त्या लक्ष्यापर्यंत जरूर पोहोचाल.
ध्येयनिश्चिती जीवनाला दिशा प्राप्त करून देते. एवढेच नव्हे तर आपण करत असलेल्या प्रत्येक हालचालीला योग्य किंवा अयोग्यतेचे परिमाण लाभते. ते जर नसेल तर आपण जे करत आहोत ते चूक का बरोबर याचा निर्णय घेता येत नाही. पालक म्हणून आपल्या पाल्याची ध्येयनिश्चिती होण्यासाठी त्याला मदत करणे हे माझे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. परंतु असे करताना खलिल जिब्रानची कविता लक्षात ठेवून काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. पहिले म्हणजे माझी मुले माझ्या आयुष्यात अपुऱ्या राहिलेल्या माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे साधन नव्हे. यशस्वी होण्याच्या तुमच्या कल्पना कितीही योग्य वाटत असल्या तरीही त्याच्या दृष्टीने त्या तशाच असतील असे नाही. एक लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक जीव हे सृष्टीने निर्माण केलेले अद्वितीय असे रसायन असते. त्याच्या या अद्वितीयत्वाची त्याला जाणीव करून देणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या बलस्थानांची त्यालाच ओळख करून देणे आणि त्यालाच त्याची ध्येयनिश्चिती करण्यासाठी योग्य अशी माहिती उपलब्ध करून देणे. जर तो चाचपडत असेल तर त्याला चाचपडण्याचे, चुकण्याचे स्वातंत्र्य देणे, परंतु काही झाले तरी तुम्ही दिशा तुला ठरवता आली पाहिजे. ते करताना चुका होतील, पण प्रत्येक चूक ही पुढे मिळणाऱ्या यशाची पायरी आहे, अशी त्याला जाणीव करून देणे व त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे आपल्याला पालक म्हणून करावयाचे आहे.
आत्मविश्वासांचा अभाव हे प्रमुख कारण ध्येयाच्या अनिश्चिततेमागे असते असे शिक्षक म्हणून माझ्या लक्षात आलेले आहे. तेव्हा केवळ १६/१७ वर्षे वयाची ही मुलं ज्यांचे संपूर्ण आयुष्य अजून घडायचे आहे ते अशा डगमगणाऱ्या पायावर अत्युच्च ध्येय कसे ठरवू शकतील? मी मागे म्हटल्याप्रमाणे ध्येयनिश्चिती ही स्वप्रतिमेवर अवलंबून असते. स्वप्रतिमेत जर बदल घडवून आणले नाहीत तर उच्च ध्येयप्राप्ती शक्य नाही. स्वप्रतिमेत बदल घडवण्यासाठी स्ककर्तृत्वावरचा विश्वास वाढला पाहिजे. ते घडवण्यासाठी स्वत:ने स्वत:वरच प्रयोग करण्याची तयारी दाखवली पाहिजे. आत्मविश्वास हा नेहमीच तीन पायऱ्यांच्या विशिष्ट कार्यक्रमाची निर्मिती असते. त्या तीन पायऱ्या म्हणजे,
१) छोटेसे का होईना पण कालबद्ध उद्दिष्ट निर्माण करणे. २) ते साध्य करण्यासाठी नियोजन करणे. ३) आणि ते नियोजन न चुकता प्रत्यक्षात आणणे या तीन पायऱ्यांनंतर आपल्याला स्वत:विषयी खात्री पटू लागते. की मी निश्चित काही चांगले करू शकतो. त्याबद्दल कालबद्ध योजना आखू शकतो. आणि ती योजना ठराविक काळात पार पाडण्याची क्षमता माझ्यात आहे. जोपर्यंत स्वत:ला स्वत:विषयी असा अनुभव येत नाही तोपर्यंत आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर त्यांना त्यांच्याच संमतीने व आवडीने छोटेसे एक उद्दिष्ट द्या. ते कसे प्राप्त करता येईल याचा कार्यक्रम आखायला सांगा. हा कार्यक्रम ठरविताना येऊ शकणाऱ्या सगळ्या अडचणींचा समर्पक अभ्यास करायला लावा आणि त्या कशा दूर करता येतील, याचादेखील त्या योजनेत अंतर्भाव करायला लावा आणि ती योजना यशस्वी रीतीने पार करण्यासाठी त्याला दूर राहून मदत करा. यातून त्याचा स्वक्षमतेविषयी विश्वास वाढीला लागेल. एकदा त्याला हे कळेल की मी हवे ते ध्येय ठरवू शकतो ते साध्य करण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखू शकतो आणि हे कितीही अडचणी आल्या तरी यशस्वीरीत्या पार पाडू शकता. हा जो दुर्दम्य आत्मविश्वास त्याला लाभेल त्याचा इंधनासारखा उपयोग तो उर्वरित आयुष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वापरू शकतो. एका अर्थाने अशा तऱ्हेच्या प्रयोगातून एक सामथ्र्यशाली आत्मविश्वासपूर्ण व्यक्तीची निर्मिती आपण करू शकतो. आणि पालक म्हणून आपल्यावर जी निसर्गदत्त जबाबदारी आहे तिचे पालन करू शकतो. कारण खलिल जिब्रानने म्हटल्याप्रमाणे निसर्गाला फक्त बाणात स्वारस्य आहे असे नव्हे तर ज्या धनुष्यातून हे बाण सुटणार आहेत त्या धनुष्यावरही त्याचे खूप प्रेम आहे.
तुमची मुलं.. फक्त तुमची नसतात कधी ती असतात
एका फोफावणाऱ्या वैश्विक जीवनवृक्षाचे कोवळेसे अंकुर..
जे उगवतात तुमच्यामुळे.. पण नसतात तुमच्यामधून अंकुरलेले.
जे असतात तुमच्याबरोबर, पण नसतात फक्त तुमच्याशीच बांधलेले..
तुम्ही त्यांना प्रेम देता.. पण नाही देऊ शकत तुमचे विचार
कारण ते असतात त्यांचे स्वत:चे.. तुम्ही घरं देता त्यांच्या शरीरांना
पण नाही देऊ शकत त्यांच्या अंतरात्म्यांना. कारण ते राहतात काळाच्या दूरस्थ वास्तूत..
जिथे तुम्हीच नव्हे.. तुमची स्वप्नंही पोहोचत नाही.
तुम्ही फक्त प्रयत्न करू शकता त्यांच्या कल्पनेप्रमाणे बनण्याचा.
पण कधीच विचारही करू नका..
त्यांना तुमच्या कल्पनेप्रमाणे बनवण्याचा, कारण हे आयुष्य मागे जात नाही..
निघून गेलेल्या कालच्या दिवसांमध्ये रेंगाळत नाही तुम्ही ती धनुष्ये आहात ज्यातून सोडले गेलेत..
तुमची मुले असलेले हे जिवंत धगधगीत बाण..
आणि ती कुणी धनुर्धारी..
जो अनंतत्वाच्या मार्गावर आपली मुद्रा
अचूक उमटवण्यासाठी, आपल्या सर्वाना
तुमच्याच ताकदीने वाकवून त्याचे हे बाण..
सुसाट आणि सर्वदूर सोडतोय..
त्याच्या हातातली आनंदाचा झंकार करणारी
भक्कम धनुष्ये आपण होऊयात..
कारण त्यालाही आवडतात हे सुसाट बाण.. आणि त्यांना सोडणारी स्थिर भक्कम धनुष्ये..
(मूळ कवी खलिल जिब्रान यांच्या काव्याचा स्वैर अनुवाद उदय नानिवडेकर यांनी केलेला.)