समानता काय आपण मानतोच, असे गुळमुळीत उत्तर सर्वच देतात. पण किती लग्न ठरविण्याच्या बठकीत समानतेची व्यावहारिक व्याख्या सर्वसंमतीने केली जाते?  किती लग्न ठरवलेली जोडपी लग्नाआधीच्या व नंतरच्या गप्पांमध्ये समानतेबाबत चर्चा करतात? कारण अजूनही आपल्याला त्याची गरज वाटत नाही, म्हणूनच समाज- समानतेच्या कोणत्या वर्गात आपण आहोत, हे आपण ओळखायला हवे. समाजात समानता हवी असेल तर सोबत दिलेली प्रश्नावली सोडवायला हवी आणि स्वत:लाच विचारायला हवे, ‘तुही यत्ता कंची ?’ ..
बदलत्या काळाच्या कसोटीवर समान आणि निरोगी समाजनिर्मितीसाठी सगळ्या समाजाची वैचारिक प्रगती काय आहे, याचा आपण आढावा घ्यायला हवा. संपूर्ण वर्गाची प्रगती ठरवताना जसे वर्गातील सर्वात कमी गुण मिळवणाऱ्या मुलाचे गुणसुद्धा विचारात घ्यावे लागतात तसे समाजातल्या समानतेबाबत लोकांचा वर्ग वा यत्ता कोणती आहे, याचे प्रामाणिक उत्तर आपल्याला मोकळ्या मानाने स्वीकारावे लागेल.
 ‘पुरुष संवाद केंद्रा’च्या निमित्ताने जेव्हा अनेकांशी- त्यात अनेक स्त्रियाही येतात आणि पुरुषही, बोलण्याचा प्रसंग येतो तेव्हा काही पुरुष समानतेसाठी धडपडताना दिसतात खरे. मात्र त्यातले अनेकजण यासाठी आपल्या पत्नीला जबाबदार धरतात आणि स्वत: मात्र खंतावून म्हणतात, ‘समानता तर मानायला हवी, असे मला वाटते, पण प्रत्यक्ष संसारी जीवनात तिचे सहकार्य मला हवे तसे मिळत नाही.’  त्या मानाने पारंपरिक पुरुषप्रधान मूल्ये असलेल्या घरात स्त्रीप्रधानतेचे काही लाभ क्षणिक का होईना मिळतात. अर्थात तीही अनेकदा सुखाची सावली असते.
समाजातल्या पुरुषांचे साधारणपणे तीन प्रकार असावेत असे मला वाटते.
१) स्त्री-पुरुष समानतेचे आपल्या रोजच्या जगण्यात यशस्वीपणे आचरण करणारे.
२) समानतेचे आचरण करावे, असे वाटूनही जोडीदाराची साथ मिळत नाही, असे म्हणणारे.
३) स्त्री-पुरुष समानता हे मूल्यच उघडपणे व छुपेपणाने अमान्य करणारे.
या तीन प्रकारांतले सर्वात कठीण आणि निसरडी परिस्थिती असणारे पुरुष हे क्रमांक दोनवर असतात. कारण त्यामध्ये समानता मानण्याचे नाटक करणारेही असू शकतात, ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा म्हणून तो सन्मान हवा आहे. मात्र प्रत्यक्षात ही प्रधानता सोडणे त्यांना अजिबात मंजूरच नाही. माझे एक नातेवाईक आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नीचा चांगला चाललेला व्यवसाय घरात तिचे दुर्लक्ष होते असे म्हणून बंद केला. मात्र कोणी पाहुणे आले आणि पत्नी भाजी चिरत असली की ते लगेच ‘दे मी चिरतो भाजी ’ म्हणतात आणि चिरून देतात. त्यांना कधीच असे वाटत नाही की हे खोटे वागणे लोकांना दिसत असेल, जाणवत असेल.
मी स्वत:सुद्धा पुरुषप्रधानतेच्या संस्कारांतून आलेलो आहे. त्यामुळे ते संस्कार आणि ती सत्ता सोडणे पुरुषांसाठी जास्तच कठीण आहे, हे मी समजू शकतो.
पुरुषांचा एक गट असा आहे जो अशा मानसिक झगडय़ामध्ये अडकलेला आहे..
आणखी एक सत्य आपण मान्य केले पाहिजे की जेव्हा स्वातंत्र्य पहिल्यांदा मिळते तेव्हा त्याचा थोडाफार गरवापर होतो. पुरुषांनी इतके दिवस प्रधानतेचे फायदे घेतले. आता स्त्रियांनी आíथक स्वातंत्र्यामुळे स्वत:ची आवडनिवड स्पष्टपणे मांडली तर ते स्वीकारणे पतीला कठीण का जाते आहे?
लग्नाची बोलणी करण्याच्या, पाहण्याच्या कार्यक्रमात एका उच्चशिक्षित मुलीने मी भांडी घासणार नाही, मी कपडे धुणार नाही, मी केर काढणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. तिने जे म्हटले त्याचे मी कौतुक करीत नाही, पण जर ती पशाने कोणावर अवलंबून नाही तर माझे जीवन कसे असावे, हे मी ठरवणार, असे तिने म्हटले तर वावगे का ठरावे? मला वाटतं, असे स्पष्टपणे आपले मत मांडणे हे मध्यमवर्गीय स्त्रियांच्या पिढीत प्रथमच आले आहे. आता प्रश्न असा की, पारंपरिक अपेक्षा बाळगणाऱ्या मुलाला ही आधुनिकता झेपेल का? मिळवती मुलगी म्हणेल की मी समानता मानते आणि माझ्या जोडीदारानेही मानायला हवी. मी जेवणाची इतर सगळी तयारी करेन; मात्र नवऱ्याने मला तितकीच मदत केली पाहिजे, असं म्हटलं तर ते किती पुरुषांना मान्य होईल?
म्हणून यापुढचा काळ नक्कीच वेगळा असणार आहे. पुरुषी सत्तेला हळूहळू धक्के बसणार आहेत किंवा बसायला लागलेच आहेत. पुरुषांनी त्यासाठी मनाची तयारी ठेवायला हवी आणि जे ही तयारी करणार नाहीत त्यांना हा बदलाचा झंझावात झेपणार नाही. मुंबई परिसरातील एका शहरात अनेक जोडपी डॉक्टर आहेत. या जोडप्यांमधील केवळ पंचवीस टक्के पुरुष डॉक्टरांच्या पत्नी पॅ्रक्टिस करतात, हे सत्य मला माझ्याच एका डॉक्टर मित्राने सांगितले. म्हणजे समानतेच्या कोणत्या वर्गात आपण आहोत हे आपण ओळखायला हवे.
समानता कशा कशामध्ये मानायची याची यादी करायला घेतली की पुरुषप्रधानतेचे सत्तास्थान किती विस्तारलेले आहे हे आपल्या लक्षात येईल. आता मुद्दा येतो की, पुरुषांना छळणाऱ्या स्त्रियांचे काय? कल्पना करा की, एका घरात पत्नी पतीला बेदम मारहाण करते आहे आणि तो पुरुष ओरडतो आहे. मग शेजारचे सर्व लोक येऊन दार ठोठावतात आणि त्या पुरुषाची सुटका करतात. नाही हो, असे चित्र डोळ्यासमोर उभेच  राहात नाही. कारण पुरुषप्रधान समाजात असे कल्पनाचित्र कुणी मनासमोर आणूच शकत नाही. मात्र तरीही अपवाद असणारच, त्यामुळे असा शारीरिक वा मानसिक छळ सहन करणारा कुणी असेल तर मी त्याला म्हणेल की, आपल्या हक्कांची जपणूक करण्याची जबाबदारीही पुरुषांनाच घ्यावी लागणार आहे.
समानता काय आपण मानतोच, असे गुळमुळीत उत्तर सर्वच देतात. किती लग्न ठरविण्याच्या बठकीत समानतेची व्यावहारिक व्याख्या सर्वसंमतीने केली जाते?  किती लग्न ठरवलेली जोडपी लग्नाआधीच्या व नंतरच्या गुळमुळीत गप्पांमध्ये आपण समानता कोणकोणत्या बाबतीत आणि किती मानायची याची चर्चा करतात? कारण अजूनही आपल्याला त्याची गरज वाटत नाही, समानतेबाबत एक छोटी आणि प्रातिनिधिक प्रश्नावली उदाहरण म्हणून आपल्यासमोर ठेवतो आहे. ही प्रश्नावली आजी- आजोबा असलेल्या, आई-बाबा असलेल्या आणि आता लग्नाचा विचार करणाऱ्या तरुण-तरुणींनी सोडवून याची प्रामाणिक उत्तरे स्वत:लाच सांगावीत.
१) घरातली कोणती कामे पुरुष स्वत:ची जबाबदारी म्हणून करतात? धुतलेल्या कपडय़ांच्या घडय़ा घालणे, रोजचा केर काढणे, घासून आलेली भांडी जागेवर मांडणे, जेवणे झाली की मागचे आवरणे.
२) बँकेत दोघांचे एकत्र खाते हवेच की दोघांचे वेगवेगळे खाते हवे. एकत्र खात्यामधून कोणते खर्च करायचे. नवऱ्याला/बायकोला दारूसाठी, सिगरेटसाठी वेगळे पसे ठेवता येतात का ?
३) बायकोच्या कपाटभर साडय़ा असतात तसे नवऱ्याचे कपाटभरून शर्ट -पँट्स असतात का ?
४) किती मोठय़ा वयाचे पुरुष- मुलगे आपल्या बायकोची/ आईची अंतर्वस्त्रे धुऊ शकतात?
५) किती वडिलांना (ज्यांचे तारुण्य नाक्यावर उभे राहून सत्कारणी लागले आहे) आपल्या मुलींनी नाक्यावर जाणे पसंत आहे.
६) किती मुलींच्या वडिलांना मुलींनी दंगामस्ती, आरडाओरडा करणे, मारामारी करणे ही त्यांच्या विकासाची गरज आहे, असे वाटते?
७) किती स्त्रिया आपल्या नवऱ्या /मुलांच्या जेवणाची अजिबात काळजी न करता मोकळ्या मनाने आठ दिवस चन करायला (स्वत:च्या वा नवऱ्याच्या पशाने) जाऊ शकतात.
८) किती वडील आपल्या लहान मुलांची शी धुतात ?
९) किती स्त्रिया आपल्या आवडीची मासिके, पुस्तके स्वत:च्या आवडीने विकत घेऊ शकतात ?
(यात मार्गशीर्षांतल्या गुरुवारच्या पोथ्या मोडत नाहीत.)
या प्रश्नांवरून आपण सांस्कृतिकदृष्टय़ा कसे घडलो आहोत, घडत आहोत हे आपल्या लक्षात येईल. आपण आई-वडील असू, तर नवी पिढी समानता कशी चहू -बाजूंनी पाहत आहेत हे बघू शकतील. आपण तरुण मुलं मुली असू, तर हे प्रश्न आपल्याला पडले होते का हे स्वत:ला विचारतील. त्याला आपण दिलेली उत्तरे आणि पालकांनी दिलेली उत्तरे स्वत:शी ताडून पाहतील.
हे प्रश्न पाहून काही वडील, पती म्हणतील कशासाठी हे प्रश्न काढलेत? आमचे बरे चालले होते ना. पण समानतेच्या वर्गात प्रवेश मिळण्यासाठी ही प्रश्नावली आपण सोडवू या आणि ‘तुही यत्ता कंची’ या प्रश्नाला हे उत्तर देऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा