लक्ष्मणा, तू आखलेली रेषा ओलांडली म्हणून सीतेचं हरण झालं. त्यानंतर अग्निपरीक्षा देऊनही रामानं तिचा त्यागच केला. यातनं मी काय शिकायचं? रेषा ओलांडली की संपलं का? त्या इतक्या वर्षांमध्ये तुझ्या भावाबरोबर आणि वहिनीबरोबर फिरत असताना तुझ्या स्वत:च्या भावभावनांचं नेमकं काय होत होतं? त्या इतक्या वर्षांमध्ये ऊर्मिला तुझ्या संगाविना राहिली. तूही राहिलास. मनाच्या पातळीवर खरंच तुला कधीच कुणाविषयीच आकर्षण वाटलंच नाही? ..
लक्ष्मणानं ‘ती’ रेषा आखली तेव्हा सीतेला निक्षून बजावलं होतं, या रेषेपलीकडे पाऊल टाकू नकोस. मी जेव्हा याचा विचार करते तेव्हा मला नेहमी वाटतं, ही रेषा लक्ष्मणानं वेळोवेळी त्याच्या मनातही आखली होती. रामाच्या वनवासात स्वत:लाही लोटून पत्नी ऊर्मिलेला मागे टाकून तोही वनात निघाला तेव्हा ती त्यानं ऊर्मिलेच्या आणि त्याच्या मध्ये आखली. वनात असताना त्यानं आपली वहिनी सीता हिच्या एकदाही डोळ्यांत पाहिलं नाही, त्याची दृष्टी फक्त तिच्या पायांवर असायची. त्या अर्थानं राम-सीता एका बाजूला आणि तो दुसऱ्या, यामध्येही त्यानं त्याची ती काटेकोर रेषा आखली आणि पाळली. मूळ शूर्पणखेच्या गोष्टीत वरवर पाहता ती दिसली नाही तरी मला ती सरळसोट शिस्तीची रेषा तिथेही दिसते. शूर्पणखा आधी रामावर भाळली. त्यानं ‘मी सीतेशी विवाहबद्ध आहे, तू लक्ष्मणाला का नाही लग्नाचं विचारत?’ अशी तिची थट्टा सुरू केली. त्यानंतर जे घडलं त्याविषयी अनेक वदंता आहेत. वेगवेगळ्या कवींनी तिच्याविषयी वेगवेगळं लिहिलं. ती मायावी असण्याबद्दल, कुरूप असण्याबद्दल, अतिशय सुंदर असण्याबद्दल.. तिनं राम, लक्ष्मणाने केलेल्या थट्टेने चिडून जाऊन सीतेवर हल्ला केला आणि लक्ष्मणानं तिचे नाक, कान कापून टाकले, असं मूळ गोष्टीत असलं तरी ‘तिचं नाक कापलं गेलं’ या वाक्याला तिची लाज जाण्याचा संदर्भ माझ्या मनात असल्याने असेल कदाचित, माझ्या मनात ती गोष्ट ‘शूर्पणखेनं विवाहित माणसावर भाळून एका अर्थानं विवाहित पुरुषानं त्याच्या आणि इतर स्त्रियांच्या मध्ये ओढलेली असते ती लक्ष्मणरेषाच ओलांडली आणि त्याची शिक्षा म्हणून लक्ष्मणानं तिचं नाक कापून टाकलं’ या अर्थानं राहून गेलेली आहे. कुठलीही लक्ष्मणरेषा ओलांडली की, नंतर एक वादळ वाट पाहात असतं, असं मला कळलेलं ‘लक्ष्मणायन’ सांगतं. सीतेसमोर लक्ष्मणानं ती रेषा आखली तेव्हा त्या वादळाची कल्पना स्पष्टपणे दिली होती खरं तर; पण जे ओलांडू नको हे निक्षून सांगितलेलं असतं ते ओलांडावंसं वाटतंच वाटतं. या बालसुलभ वाटण्यातनं ती सीतामाईही सुटली नाही आणि रेषा ओलांडून ‘रावण’ नावाचं आयुष्यभराचं वादळ मागून बसली. तेच बालसुलभ वाटणं माझ्याही आत आहे. त्या वाटण्यातनं मला लक्ष्मणाच्या आत त्यानं आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडायची आहे आणि त्याच्या ‘आत’ पाहायचं आहे, कारण मलाही त्या रेषेचं अप्रूप आहे, भीती आहे, माहात्म्य आहे. मला ते माहात्म्य तपासायचं आहे. त्या माहात्म्यानं मीही ती रेषा माझ्याही आतमध्ये नुसती आखलेलीच नाही, तर कोरलेली आहे. मीच काय, माझ्या आसपासच्या जवळजवळ प्रत्येकानं आणि प्रत्येकीनं ती तशीच मनोमन कोरल्याचं मला स्पष्ट दिसत आहे. लहान असताना वाटायचं, ती रेषा म्हणजेच बरोबर, त्याच्या आत राहण्यानं खूप काही चांगलंच साध्य होतं; पण वय आणि समजूत वाढता वाढता एक गोष्ट स्पष्ट जाणवते आहे. माणूस म्हणून माझ्या आणि इतरांच्या आत त्या रेषेपलीकडे उतू जाऊ पाहणारं खूप काही आहे. ते उतू जाऊ पाहणारे मी रेषेआत कोंबू पाहते आहे. तरीही माझ्या आत उसळू पाहणारी अनेक आकर्षणं मला सतत त्या रेषेपलीकडे चालण्याचा आग्रह धरत असतात. मी त्या आग्रहाला बळी न पडायचा आटोकाट प्रयत्न करते, कारण मला माझ्या आतल्या त्या कुठल्याशा काल्पनिक लक्ष्मणाला दाखवायचं असतं, ‘तू सांगितलं होतंस ना, मी नाही ओलांडली बघ रेषा!’ पूर्वी तर मला बिनदिक्कत वाटलेलं आहे, मी रेषेच्या आत ना, म्हणजे मी वरचढ, मी चांगली, माझंच नाक शाबूत! परिस्थितीनं किंवा अजून कशानं रेषा ओलांडलेले जेव्हा जेव्हा दिसले तेव्हा माझ्या आतल्या लक्ष्मणानं त्वेषानं नाकं उडवली आहेत त्यांची मनातल्या मनात..
त्या त्वेषावरनं मला एक सिनेमा आठवतो आहे- ‘अमेरिकन ब्यूटी’. त्यातल्या एका पात्राचा बाप ‘गे’ असतो; पण त्याचं ‘गे’ असणं त्यानं त्याच्या आत दाबून टाकलेलं असतं. तो लग्न करतो खरा, मुलाला जन्मही देतो;  पण नंतर नंतर आत दाबलेलं त्याचं ‘गे’ रूप त्याला हिंसक बनवत जातं. सुरुवातीला त्याचा ‘गे’ लोकांवर खूप राग असतो, असं दाखवलं आहे. जरा जास्तच राग. शेवटी आपल्याला कळतं की, तो स्वत:च ‘गे’ आहे. त्याला त्याच्या ‘गे’ असण्याचा राग आहे, कारण त्या असण्याला समाजमान्यता नाही. तो राग इतर ‘गे’ लोकांवर रागावून, मुलाला मरेस्तोवर बडवून आणि बायको वेडी होईपर्यंत तिच्याशी काय काय वागून किंवा ‘न’ वागून काढतो आहे. मला राग समजतो; पण जिथे जिथे तो जरुरीपेक्षा खूप जास्त दिसतो, माझ्यातही, तेव्हा जाणवतं, हा फक्त राग नव्हे. हे दुसरं काहीसं रागाच्या वेशात मला भुलवतं आहे. मी रेषेबाहेर गेलेल्यांसाठी जेव्हा त्वेषानं नाक उडवते तेव्हा माझ्या त्या त्वेषाच्या मुखवटय़ामागे नक्की काय उभं असतं ते मला उघडय़ा डोळ्यांनी पाहायचं आहे, सगळंच्या सगळं. ‘अमेरिकन ब्यूटी’तल्या ‘गे’च्या मनातपण मला एक कोरलेली लक्ष्मणरेषा दिसते, जिच्या आत स्वत:ला कोंबण्यात तो हिंसक होत चालला आहे. मला हिंसक व्हायचं नाही. आपल्यातलं आपलं आपल्याला न सामावता येणारं काहीसं दुसऱ्यावर, आपल्या माणसावर हिंसा बनून उतू जाणं हे मला उघडय़ावर विष्ठा करण्याइतकंच बेजबाबदार वाटतं. म्हणूनच माझ्या रेषेपलीकडे उतू जाणारं घाईनं रेषेच्या आत ढकलण्याआधी ते हातात उचलून पाहावंसं वाटत आहे, कारण ती ही मीच आहे. त्या रेषेबाहेरच्या उतू जाण्यात माझी अनेक ‘अनौरस’ वाटणी आहेत. अनौरस अशासाठी की, माझा मला हवा तो चेहरा सगळ्यांना दिसण्यासाठी मला ती ‘वाटणी’ लपवावी लागतात. मला ऊर्मिलाच असावं लागतं. लक्ष्मण गेल्यानंतर सगळ्या भावभावनांना आवर घालून पतिव्रत्याला जागणारी. शूर्पणखेला नेहमी शिव्याच बसलेल्या आहेत. लहानपणी तिचं नाक कापलेलं पुस्तकातलं चित्र बघून तिला खदाखदा हसण्यात मलाही बराच आनंद मिळाला आहे. आता जरा त्या आनंदापलीकडे जाऊन स्वत:त बघावंसं वाटतं आहे. रेषा अनेक आखल्यात मी. एक लग्न झालेली स्त्री म्हणून मला आत काय काय वाटलं पाहिजे, काय नाही वाटलं पाहिजे, माझ्या नवऱ्याला काय वाटलं पाहिजे, काय नाही वाटलं पाहिजे, मी पैसे मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, भूमिकेची गरज म्हणून काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसे सिनेमे केले पाहिजेत, कसे नाही केले पाहिजेत, कधी उठलं पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीसाठी कळत-नकळत आखली गेलेली एक रेषा. त्या प्रत्येक रेषेअलीकडचं एक ‘शहाणं’ वाटणं आणि रेषेपलीकडे उतू जाणारं ‘वेडं वाहावणारं’ वाटणं, ही दोन्ही मीच आहे. नवऱ्याशी एकनिष्ठ वाटणारी असणारी जशी मी आहे तशी कधी कधी दुसऱ्या पुरुषाचं आकर्षण वाटणारीही मीच आहे. प्रगल्भ भूमिका करणारी जशी मी आहे तशी व्यावसायिक नाच-गाण्यांच्या भूमिकांविषयीही प्रचंड आकर्षण वाटून त्याही करायला मिळाव्यात म्हणून वाट बघणारीही मीच आहे. प्रायोगिक नाटकासाठी पदरचे पैसे खर्चून धडपडून नाटक करणारी जशी मी आहे तशी एखाद्या गणपतीच्या आरतीला किंवा दहीहंडीला काही मिनिटांसाठी उपस्थित राहण्यासाठी गडगंज पैसे घेणारीही मीच आहे. या सगळ्याच्या सगळ्या ‘मला’ हातात घेऊन खुळखुळवून दान टाकल्यासारखं विखरून टाकलं, तर सगळे कसे लक्ष्मणरेषेआड पडणार नाहीत. माझे काही तुकडे रेषेबाहेर पडतील याची खात्री आहे. माझेच नाही, प्रत्येकाचे पडतील, खात्री आहे, कारण आतली रेषा खूप कडेकोट शिस्तीची आहे. मनातल्या आकर्षणाला मनातच ठेवलं काय आणि त्याचा हात धरून पुढे गेलं काय, आकर्षण वाटलं ना? मग झालं तर, मनातल्या लक्ष्मणाच्या दृष्टीनं मी रेषेपलीकडचीच! मला विचारायचं आहे, रेषेपलीकडच्या सगळ्याचं नाक कापलं गेलंच पाहिजे का? वाहवत जायचं नाही, स्वत:ला सांभाळून असायचं, सगळं मान्य; पण वहावल्याची शिक्षा नाक कापण्याइतकी क्रूर हवी का? मला हे शोधायचं आहे, कारण माझ्या आत मी जोपासलेल्या लक्ष्मणाकडून होत असलेली माझी कुचंबणा आता मला त्रास देते आहे. माझा नवरा समोर असताना माझ्या मित्राचा फोन आला, त्याच्याशी मी निखळ मजेत गप्पा मारल्या, तर माझ्या नवऱ्याला नाही काही वाटत; पण मला चक्क अपराधी वाटतं. मी वाईट मुलगी आहे असं वाटतं. मला कळत नाही माझे नियम तरी नक्की काय आहेत? एक साधा मित्राचा फोनसुद्धा जर लक्ष्मणरेषेपलीकडचा वाटणार असेल तर रेषेअलीकडचं नेमकं आहे तरी काय? व्यभिचार वगैरे फार पुढच्या गोष्टी, त्यावरचं माझ्या आतल्या लक्ष्मणाचं मत ऐकण्याची कल्पनासुद्धा मला धडकी भरवते; पण एक साधा फोनसुद्धा जर मला स्वत:ला धारेवर धरायला भाग पाडणार असेल तर जरा गडबड आहे. याचा अर्थ मी फोनवर मित्रांशी बोलत नाही का? तर बोलते; पण असं एका बाजूनं स्वत:ला कोसत कोसत. गडबड आहे. खूप काही शिकलेलं, शिकवलेलं, गोष्टीमधलं, संस्कारांमधलं, आतलं, बाहेरचं, आसपासचं, तपासून बघण्याची वेळ आली आहे. मी स्वत:ला सुदैवी समजते की मला ते तपासून बघण्याची मुभा आहे. ऊर्मिलेला पर्याय नव्हता, बोलायला कुणीच नव्हतं. मला हे सगळं बोलायला जवळचा मित्र म्हणून माझा नवरा आहे. मी त्याच्याशी कुठल्याही विषयावर मोकळेपणानं बोलू शकते. अगदी मला आवडलेल्या दुसऱ्या पुरुषाबद्दलही. मोकळेपणानं.. त्या मोकळेपणानं मला ही मुभा दिली आहे, रेषेपलीकडचंही ‘माझंच’ म्हणण्याची. तो त्या सगळ्याकडे समजुतीनं पाहतो, त्यासाठी मी त्याची ऋणी आहे; पण माझे प्रश्न तिथे सुटत नाहीत. माझा प्रश्न आहे, त्याच्याइतक्या मोकळेपणानं मी त्या सगळ्याला पाहू शकते का? त्याचे उत्तर माझ्यातला लक्ष्मण जर ‘नाही’ देत असेल, तर आत जोपासलेला तो माझा माझ्या गोष्टीतला लक्ष्मण खरंच आता मला माझ्या आत हवा आहे का? त्याला विचारायचं आहे मला, तू नसताना, एकटी एकाकी असताना जर ऊर्मिलेच्या मनात केवळ मनात जरी दुसऱ्या कुणाविषयी आकर्षण निर्माण झालं असतं, तर तू काय केलं असतंस? तू आखलेली रेषा ओलांडली म्हणून सीतेचं हरण झालं. त्यानंतर अग्निपरीक्षा देऊनही रामानं तिचा त्यागच केला. यातनं मी काय शिकायचं? म्हणजे ती परपुरुषाकडे राहिली इतके दिवस; पण तिनं त्याच्याकडे पाहिलंही नाही, असं ती सांगते आहे, परीक्षा देते आहे; पण तिला क्षमा नाही. यातनं मी माझ्यासाठी नेमके काय नियम घालून घ्यायचे? रेषा ओलांडली की संपलं का? पुढं तिनं ठेवलेल्या संयमाचं काहीच माहात्म्य नाही का? लहानपणी लक्ष्मणा तुझ्या वागण्याची काही गृहीतकं गोष्टीत ऐकून मी स्वीकारली. म्हणजे ऊर्मिलेपासून दूर असताना तू सीतेकडे मान वर उचलून पाहिलंही नाहीस हे गृहीतक. आता मोठं झाल्यावर या गृहीतकाच्या पलीकडे जाऊन मला तुझ्याकडून खरं उत्तर हवं आहे. त्या इतक्या वर्षांमध्ये तुझ्या भावाबरोबर आणि वहिनीबरोबर फिरत असताना तुझ्या स्वत:च्या भावभावनांचं नेमकं काय होत होतं? त्या इतक्या वर्षांमध्ये ऊर्मिला तुझ्या संगाविना राहिली. तूही राहिलास. मनाच्या पातळीवर खरंच तुला कधीच कुणाविषयीच आकर्षण वाटलंच नाही? खरंच? तू प्रत्यक्ष ओलांडली नसशील; पण तुझ्या नावानं ओळखली जाणारी ‘लक्ष्मणरेषा’ निदान एकदा तरी ओलांडायचा निदान विचार तुझ्या मानवी मनात एकदाही आलाच नाही? खरंच? नाहीच?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा