– डॉ. राधिका टिपरे
तरुणांचं उच्च शिक्षणानंतर नोकरीसाठी परदेशी जाणं आणि नंतर तिथंच स्थायिक होणं आता नवीन राहिलेलं नाही. मात्र त्याचं हे जाणं त्यांच्या पालकांना अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात टाकतं. सुरुवातीला उत्साहाने जाणं होतंही, परंतु हळूहळू तोच तोचपणा, एकटेपणा सतावायला लागतो. महागडे वैद्यकीय उपचार डोक्यावर टांगती तलवार ठेवतात, तर महागड्या घरकाम सेवा कितीही बरं नसलं तरी आराम करू देत नाहीत. वय वाढत गेलं की नको ते परदेशी जाणं असं वाटू लागतं. मुलं हवी आहेत, परंतु इतक्या दूर सतत जाण्याची पालकांची तयारी होत नाही, त्यामुळे या पालकांसाठी परदेशगमनाची वाट अवघड वळणांची होऊ लागली आहे…
सकाळी घराबाहेर पडले तर इमारतीच्या लिफ्टजवळच नेने आजी भेटल्या. बाहेरून खरेदी करून आल्या होत्या. वय वर्षं ऐंशी, पण अजूनही बऱ्यापैकी टुकटुकीत. ‘‘आज इतक्या सकाळीच बाहेर गेला होतात? काही विशेष?’’
‘‘अगं, मुलगा येणार आहे ना अमेरिकेतून. त्याला आवडतात त्या भाज्या घेऊन आले. आता मला घेऊनच जायचं म्हणतोय अमेरिकेला.’’
‘‘जाणार आहात का?’’
‘‘छे गं, आता या वयात कसली जातेय… पंधरा दिवस मुलीकडे आणि पंधरा दिवस माझ्याकडे राहा आणि परत ये, असं म्हणतोय. पण तू सांग, आता एवढा मोठा प्रवास झेपणार आहे का मला? मला कुठंही जायचं नाहीए आता. आपल्या देशातच डोळे मिटायचेत.’’
अलीकडेच माझी मैत्रीण, एका परदेशस्थित मुलाची आई, रत्ना भेटली होती. नुकतीच ती अमेरिका आणि कॅनडामध्ये राहून परत आली होती. बोलता बोलता तिनं, तिला आणि तिच्या पतीला कॅनडाचा पी.आर.(परमनंट रेसिडेन्सी) मिळाल्याचं सांगितलं.
‘‘अरे वा, अभिनंदन. आता कधीही जा, कितीही दिवस राहा.’’
‘‘अभिनंदन कसलं करतेस? कुणाला जायचंय पुन्हा पुन्हा? जवळ का आहे ते?’’ एकूणच तिच्या सुरांवरून तिला ‘पीआर’ मिळाल्याचा आनंद झालाय असं अजिबात वाटत नव्हतं. ‘पीआर’ मिळाल्यामुळे आता त्यांना हवं तितके दिवस तिकडे राहाता येणार होतं. पण या गोष्टीचा आनंद मानायचा की खेद तेच रत्नाला कळत नव्हतं. मात्र मुलाच्या इच्छेखातर त्या उभयतांना दरवर्षी काही महिने कॅनडात राहावं लागणार होतं. जवळपास तीन वर्षं कॅनडात वास्तव्य केलं तरच ‘पीआर’ कायम होतो, असा तिथला कायदा आहे असं ती सांगत होती. या विचारानेच रत्ना खरं तर अस्वस्थ झाली होती. आपला अस्वस्थ पीळ सांगताना ती म्हणाली, ‘‘इथं भारतात असल्यावर घरात एकटं असलो तरी एकटं वाटत नाही, पण तिथं माणसांच्या गर्दीत असलो तरी एकटं वाटत राहतं, कारण तिथली माणसं आपल्याशी बोलत नाहीत. इथं रोज घरी कामाला येणाऱ्या मुलींशीसुद्धा आपण मन:पूत गप्पा मारतो. कुणी तरी भेटलं, बोललं याचं समाधान मिळतं. तिथं गेल्यावर ‘आळी मिळी गुप चिळी.’ घरातल्या माणसांनाही वेळ नसतो, कारण ते कायम कामात आणि बाहेरच्यांना तर आपल्याशी देणंघेणं नसतं.’’
रत्नाच्या मुलाने जेव्हा कॅनडाच्या ‘पीआर’साठी अर्ज करायचं ठरवलं तेव्हाच खरं तर ती धास्तावली होती. न राहवून ती मुलाला म्हणालीसुद्धा, ‘‘वर्षातून एकदा तिकडे भेटायला येतो, त्यातच आनंद आणि समाधान वाटतं रे आम्हाला.’’ पण त्यानं ऐकलं नव्हतं. आईबाबांना ‘पीआर’ मिळाल्याचा त्याला खरोखरच खूप आनंद झाला होता. कारण आता कॅनडात गेल्यानंतर आईबाबा आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात सहज घेऊन जाता येणार होतं. असो, ‘पीआर’साठी खूप साऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागली. मेडिकल, पोलीस व्हेरिफिकेशन, अमुकतमुक. मग कॅनडाच्या ‘कॉन्सुलेट’चं पत्र हाती पडलं आणि मगच ते उभयता अखेरीस कॅनडाला पोहोचले होते.
त्या वेळीही रत्नाने मुलाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ‘‘अरे बाबा याची गरज नाहीए रे. आम्ही भारतातच सुखी आहोत.’’ यावर तो खूप रागावला. किती तरी दिवस तिच्याशी नीट बोलला नाही. मग एके दिवशी कळवळून म्हणाला, ‘‘आई, तुला कळत कसं नाही. अगं, तू आणि बाबा दोघं आहात म्हणून तुला वाटतंय की तुम्ही तिथं आनंदात राहू शकाल. पण पुढे जेव्हा दोघांपैकी कुणी तरी एक जण मागे राहाल तेव्हा काय होईल? कसं राहाल एकटे? तुम्ही एकटे असताना, आजारी पडलात, काही झालं तर मी चटकन येऊ शकणार नाही. धडपड करून आलो तरी कसंबसं दहा दिवस राहता येईल मला. मग कोण घेणार तुमची काळजी? आता ‘पीआर’ असल्यामुळे मी कधीही तुम्हाला इकडे घेऊन येऊ शकतो. इथं उपचार घेऊ शकतो. मला कसलंही दडपण राहणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागेल ना? तुला कसं समजत नाही?’’ त्याच्या भावना कळत होत्या. त्याचं म्हणणं अगदी योग्यच आहे हे कळत होतं, फक्त वळत नव्हतं. कारण तिथल्या एकटेपणाचं आणि इतर प्रश्नांचं काय करायचं याचं उत्तर तिच्यापाशी नव्हतं.
या ना त्या निमित्ताने पालक मुलांच्या पाठोपाठ परदेशगमन करतात. कधी मुलीचे बाळंतपण, कधी सुनेचे बाळंतपण. कधी सून नोकरी करते म्हणून कधी मुलांना भेटायला म्हणून. कधी दुसरी कसली अडचण आली म्हणून. पण तिथं गेल्यानंतर तेथील वास्तव्यात येणारा तोच तोपणा, पूर्णपणे मुलांवर अवलंबून राहावं लागणं, तिथल्या जीवनपद्धतीप्रमाणे स्वत:ला ‘अॅडजस्ट’ करता न येणं यामुळे मुलांकडे असूनही मन रमत नाहीच. उलट मुलांना आपली अडचण होतेय की काय हीच भावना मनात घर करू पाहते. अशा वेळी आपली मायभूमी बरी असं वाटत राहतं. त्यामुळे हल्ली परदेशात राहणाऱ्या मुलांकडे जाण्यातील उत्कंठा कमी झालीय असं जाणवू लागलंय.
याची दुसरी बाजू म्हणजे, अनेक कुटुंबांतील मुलं परदेशात वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांनाही मुलांशिवाय भारतात एकटं राहण्याची हळूहळू सवय होत जाते. बहुतेक पालक आयुष्यातील न टाळता येणारं वास्तव म्हणून याचा शांतपणे स्वीकार करतात. दोघांनीच राहायचं असल्यामुळे आयुष्याला एक प्रकारचा संथपणा येतो. शांत क्षण उपभोगता येतात…! मुलं लहान असताना आणि पालकांच्याही नोकऱ्या चालू असताना होणाऱ्या धबडघाईचं निवांतपणात रूपांतर झालेलं असतं. बहुतेकांच्या घरी
आर्थिक स्थैर्य असल्यामुळे तडजोडींचं आयुष्य संपलेलं असतं. त्यामुळे कधी कधी पालकांना वाटतं, उतारवयात आपल्या मनाप्रमाणे, हवं तसं जगण्याची संधी मिळतेय हे एका परीने बरंच आहे म्हणायचं. आपल्या आवडीनिवडी जपण्याची संधी मिळते. कुणाचंही कसलंही बंधन नाही. मात्र एखादा क्षण असाही येतो, जेव्हा मुलांच्या आठवणीने मन व्याकूळ होतं, पण हळूहळू त्याचीही सवय होऊन जाते.
अशा वेळी एक मन म्हणत राहतं की, एकत्र कुटुंबं तरी कुठं आनंदी असतात? बऱ्याचदा मन मारून राहावं लागतं. अनेक गोष्टींत तडजोड करावीच लागते. कधी मुलांना, तर कधी आईवडिलांना. त्यापेक्षा हे बरं. नीला आणि अजयचा अनुभव होताच समोर. दोघेही अमेरिकेला मुलीकडे गेले होते. नातवाचा पहिला वाढदिवस होता म्हणून. घरात आठ तासांसाठी नॅनी यायची. नातू तिच्याकडे न राहता आजीकडेच यायला लागला. मग त्याच्यावरून वाद व्हायला लागले. जावई आणि मुलीनं सांगितलं, ‘आम्ही तिला एवढे पैसे देतो. त्याला तिच्याकडेच राहू दे. ती असेपर्यंत तुम्ही खोलीतच थांबा.’ मग काय, आठ तास दोघांनाही खोलीत बसून राहण्याची शिक्षा भोगावी लागत होती. नातवाला घेऊन नॅनी बाहेर गेली की मगच ते दोघे बाहेर येऊन स्वयंपाक, जेवण करत. दोघेही वैतागले. सरळ तिकिटं ‘प्रीपोन’ करून भारतात परत आले. मीनाच्या बाबतीत तसंच. तिथल्या सुनेलाच नाही तर मुलीलाही काही सूचना द्याव्यात तर दोघी ऐकायला तयार व्हायच्या नाहीत. ‘इथं असं चालत नाही…’ हे उत्तर ऐकून घ्यावं लागतं. त्यापेक्षा नकोच ना तिकडे जाणं, अशी भावना आई किंवा सासू यांच्या मनात निर्माण झाली तर त्यात नवल ते काय?
मुलं एकदा परदेशी गेली की तिथंच राहतात, परतून येत नाहीत, हे सत्य सर्वांनी स्वीकारलं आहेच, पण म्हणून त्यांना आपल्या आईवडिलांची काळजी नसते असं अजिबात नाही. जसं भारतात राहणाऱ्या आईवडिलांना पदोपदी मुलांची कमतरता जाणवत राहते. ‘आपण आईबाबांना सोडून स्वत:च्या स्वप्नांच्या मागे इथं परदेशात आलो, चूक तर नाही ना केली?’ असा विचार करत बरीच मुलं मनातल्या मनात झुरत, कुढत राहतात. आपल्या आईबाबांनी आपल्याबरोबर राहावं असं त्यांनाही वाटत असतं, पण बऱ्याचदा व्हिसा मिळत नाही. सहा महिन्यांपेक्षा जास्त राहता येत नाही. विमानाच्या तिकिटांचा खर्च झेपत नाही. एक ना दोन, अनेक कारणं असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेशात गेल्यानंतर, विशेषत: अमेरिका, कॅनडा, युरोप या देशांत आजारी पडलं तर प्रचंड वैद्याकीय खर्चाला तोंड द्यावं लागतं. दुर्दैवाने, जर कधी पालकांपैकी कुणी गंभीर आजारी पडलं आणि दवाखान्यात दाखल करावं लागलं तर त्या मुलांचं आर्थिक दिवाळं निघाल्याशिवाय राहत नाही. आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन झालं असल्याने वय वाढल्यानंतर पालकांना अमेरिकेत किंवा कॅनडात जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागतो. बरेच पालक परदेशात जाण्यापूर्वी पूर्ण चेकअप करूनच जाण्याची तारीख ठरवतात. प्रत्येक वेळी प्रत्येकी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च करून मेडिकल विमा काढावा लागतो. गंमत म्हणजे भारतातील विमा कंपन्यांकडून घेतलेल्या या विमा पॉलिसीचा तिकडे आजारी पडल्यास फारसा उपयोग होत नाही. तिथं पैसे भरावेच लागतात. कालिंदीची दोन्ही मुलं बऱ्याच वर्षांपासून अमेरिकेत आहेत. नातवंडंही आता तरुण झाली आहेत. अलीकडेच ती आणि तिचा नवरा मुलाकडे गेले होते. गडबडीत कालिंदी पाय घसरून बाथरूममध्ये पडली. कमरेचं हाड मोडलं. रुग्णालयामध्ये दाखल व्हावंच लागलं. त्या खर्चापायी तिच्या दोन्ही मुलांना प्रचंड आर्थिक फटका बसला. यापुढे कधीही अमेरिकेत जायचं नाही असं त्या दोघांनी ठरवलंय. धसकाच घेतलाय.
वय वाढत जातं तसा आणखी एक प्रश्न सतावतो तो म्हणजे कामांचा आणि ते करण्यासाठी लागणाऱ्या शारीरिक क्षमतेचा. परदेशात गेल्यानंतर सर्व कामे तुमची तुम्हालाच करावी लागतात. कारण तिथं कामाला येणाऱ्या लोकांचे पैसे, अनेकदा तासाप्रमाणे असतात ते आपल्याला परवडत नाहीत. आपल्याकडे पैसे दिले की कुठलंही काम प्रेमाने करणारी माणसं सहज मिळू शकतात. त्यामुळे वयस्क लोकांचं आयुष्य बऱ्यापैकी सुखाचं होऊ शकतं. तिथं मात्र काही झालं तरी घरच्या कामातून सुटका नसते, कितीही थकवा आला तरी! त्यामुळेही परदेशी जायचं तर धडधाकटच असायला हवं, हाच विचार पालकांना सतावतो.
अशा वेळी रत्नासारख्या व्यक्तीला आजूबाजूला माणसं असण्याची, स्वतंत्र जगता येण्याची झालेली सवय मोडून वेगळ्या देशात राहण्याचं आव्हान नकोसं वाटत असलं तरी भवितव्यात जेव्हा म्हातारपण सोसवण्यापलीकडे गेलं असेल, तेव्हा मुलांच्या आधाराची गरज पडेलच. अशा वेळी मुलांकडे जाण्याचा पर्याय नजरेसमोर असेल तर केव्हाही चांगलंच आहे. त्यामुळेच वर्षांतील काही महिने कॅनडामध्ये जाऊन राहण्याचा पर्याय स्वीकारावा लागला तर तो चुकीचा ठरणार नाही, अशी मनाची समजूत घालते. नाण्याला दोन बाजू असतातच नाही का?
थोडक्यात काय, परदेशात असलेल्या मुलांना भेटायची, नातवंडांना पाहण्याची ओढ कमी होत नसली तरी मुलांकडे राहायला जाण्याचा उत्साह जसं जसं वय वाढत जातं तसतसा कमी होत जातो. त्यातली नवलाई कमी होत जाते. उलट आपलं घर आणि आपला देश बरा, हीच भावना सरतेशेवटी अनेकांच्या मनात रुजायला लागते.