अनेक पुरुषांना असं ठामपण वाटतं की संताप/ क्रोध / राग या खास पुरुषांसाठीच्या निसर्गदत्त देणग्या (?) आहेत आणि ते ब्रह्मास्त्र म्हणून वापरण्याऐवजी झाडूसारखे वापरणे यातच पुरुषार्थ आहे. जिथे पदोपदी क्रोध आहे, संताप आहे, शाब्दिक हिंसाचार आहे, त्या व्यक्तीच्या करिअर आणि कौटुंबिक जीवनात आनंद येणार तरी कुठून? खरे तर आम्ही ‘रागाला आवरा’  हे एक दिवसाचे शिबीर घेत असू. दुर्दैवाने प्रत्येकालाच राग हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे वाटत असल्याने किंवा ‘पैसे भरून हे काय शिकायचे?’ या वृत्तीमुळे आमचे शिबीर घेणे बंद झाले ते कायमचे.
अजचा युगंधर अर्थात पूर्ण पुरुष कसा असेल किंवा कसा असावा याचा विचार करताना मला इंग्रजीतील CAGE  (केज) हा शब्द अत्यंत सहजपणे सापडला. त्यातल्या प्रत्येक अक्षरात काही वृत्ती आणि काही कृती दडलेल्या आहेत. आणि या केजमध्ये किंवा शब्दश: पिंजऱ्यात जो पुरुष स्वत:ला ठेवत संयमाने, स्वहित जपत, परहित जाणून घेत जगत असेल तर तो खरा पूर्ण पुरुष असेल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हा पिंजरा म्हणजे कैद नसून विचार-भावना आणि वर्तन यांच्यावर आपणहून घातलेले बंधन आहे. या बंधनात तीन गोष्टींचा विचार आहे-सदसद्विवेकबुद्धी, सभ्यता आणि सदाचार. मानवी मेंदू जसजसा प्रगत होऊ  लागला तसा  मेंदूचा निओ-कोर्तेक्स हा भाग विकसित झाला आणि त्यातून विवेकाचा जन्म झाला. माणसाला प्रत्येक क्षणी निर्णय घ्यावे लागतात. हे घेताना विवेक जागरूक असेल, सभ्यतेचे संस्कार असतील तर सदाचार घडून येतोच.
इथे अजून एक गंमत आहे बरं का! कोणताही माणूस म्हणजे पूर्ण पुरुषसुद्धा चुकण्याचा जन्मसिद्ध हक्क घेऊन जन्माला येतो. म्हणजे पूर्ण पुरुषसुद्धा १०० टक्के परिपूर्ण नसतो; तर पूर्वी केलेल्या चुका पुन्हा घडू न देण्याची काळजी घेत आणि झालेल्या चुकांची जबाबदारी घेत तो आपल्या जीवनध्येयाकडे उचित गतीने मार्गक्रमणा करीत असतो. हे एकदा मनाशी पक्कं केलं की पुढील गोष्टी लक्षात घ्यायला सोप्या जातील.
सर्वसामान्यपणे माणसाला बंधने नको असतात आणि पूर्ण पुरुषाला बंधनात राहण्याशिवाय पर्याय नाही. बंधन नसणे म्हणजे मनात येईल असे वागणे. माझ्याकडे माझा एक मित्र वय ५० आणि त्याची मैत्रीण वय ४० समुपदेशनासाठी आले होते. तो विवाहित होता. नोकरीत उच्च पदावर होता. त्याची मैत्रीण घटस्फोटिता होती. त्याच्याकडे लौकिकार्थाने पुरुष म्हणून आवश्यक असणारे तिन्ही ह (वेल्थ, वुमन आणि वर्क) होते. बऱ्यापैकी पैसा, सुंदर पत्नी, आणि भरपूर जबाबदाऱ्या असे सारे होते. त्याची मैत्रीणही दिसायला चांगली, आर्थिकदृष्टय़ा सक्षम होती. तीन ‘डब्लू’ असल्यामुळे तो लौकिकार्थाने पूर्ण पुरुष होता. तो कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या त्याच्या म्हणण्यानुसार घेत होता. तरीही त्याचे व त्याच्या मैत्रिणीचे नियमित संबंध घडून येऊ लागले होते, आणि असे संबंध राखण्यात आपण काही चूक करीत आहोत असे त्याला अजिबात वाटत नव्हते. त्याला वाटायचे, विविध स्त्रियांशी मैत्री करणे किंवा क्वचित कधी तरी शरीरसंबंध ठेवणे यात गैर काही नाही. शतकानुशतकांची पुरुषांची ती परंपरा आहे.
त्याच्या अशा वागण्याचा त्याच्या पत्नीला अतोनात त्रास होत असे. त्याचे म्हणणे एकच, ‘तुला काही कमी पडतंय का?’ तिने दिलेले उत्तर त्याला निरुत्तर करणारे होते. ‘तू तुझ्या करिअरसाठी अनेक वर्षे घातलीस आणि आता मुलेही कर्तीसवरती झाली आहेत. पैसाअडका बक्कळ आहे. आता या पुढील आयुष्यात आपणच दोघे एकमेकांसाठी असणार आहोत. पण नेमक्या याच वेळी माझ्या वाटय़ाचा वेळ, माझ्याबद्दल तुला वाटणारी आपुलकी याच्यात दुसरी कुणी स्त्री येणं, म्हणजे माझा वेळ आणि माझं प्रेम तू चोरून नेत आहेस आणि ही चोरी म्हणजे आपल्या २५ वर्षांच्या सहजीवनाचा अपमान आहे. पूर्वीही तू अनेकदा छोटय़ामोठय़ा चोऱ्या केल्यास. त्याकडे मी दुर्लक्ष केलं. पण आत्ताच्या माझ्या रजोनिवृत्तीच्या काळात मला हवं असलेलं काळजी घेणं तू साफ विसरला आहेस. तुझे ते तीन डब्ल्यूच तत्त्वज्ञान विसर आणि काळजी घेणारा पुरुष हो.’
या कहाणीत, मला ‘उअ‍ॅए’मधलं पहिलं मुळाक्षर सी- करियर अँड केअरिंग सापडला. यात करिअर करणे हे जवळपास सर्वच पुरुषांचे ध्येय असते. पैसा आणि अधिक पैसा, चैनीच्या वस्तूंना गरज बनवणं, ही एकविसाव्या शतकाची जीवनशैली बनली आहे. आणि पैशाने सारे काही खरेदी करता येते असा सार्वत्रिक गैरसमज आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. अजूनही प्रत्येक माणसाला त्याची आपुलकीने काळजी घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. त्यामुळे पुरुषाला जीवनभर साथ देणारी त्याची पत्नी  ही कदाचित अनेकदा करिअरपेक्षाही महत्त्वाची ठरते आणि तिच्या मनात आपली काळजी तिने घ्यावी अशी अपेक्षा असेल तर महागडय़ा वस्तू, कपडे, दागिने यापेक्षा तिला आदराने वागवणे, तिच्या शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी घेणे, तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या इच्छेनुसार फुलायला मदत करणे, तिचे म्हणणे कण न् कण ऐकणे या गोष्टी हिऱ्याच्या नेकलेसपेक्षा शतपटीने-तिच्या दृष्टीने मौल्यवान असतात.
‘केज’मधले दुसरे मुळाक्षर येते ए अर्थात ‘अ‍ॅम्बिशन अँड अँगर रेग्युलेशन.’ प्रत्येक पुरुषाने  योग्य आहार-व्यायाम यासह कोणत्याही प्रकारच्या शरीराला हानिकारक गोष्टींपासून (उदा.सिगरेट,मद्यपान) शेकडो कोस दूर राहाणं याला पर्याय नाही. जर आरोग्य उत्तम असेल तर कार्यक्षमता वाढते. कार्यक्षम पुरुष आपले करिअर चांगली व्हावी म्हणून निरनिराळी कौशल्ये आत्मसात करतात. म्हणजे एक प्रकारे त्यांचे विद्यार्थीपण अखंड चालू असते.
अनेक पुरुषांना असे ठामपणे वाटतं की संताप/ क्रोध/राग या खास पुरुषांसाठीच्या निसर्गदत्त देणग्या (?)आहेत आणि ते ब्रह्मास्त्र म्हणून वापरण्याऐवजी झाडूसारखे वापरणे यातच पुरुषार्थ आहे. ‘मुक्तांगण’मध्ये समुपदेशक म्हणून काम करताना ही निसर्गदत्त देणगी त्यांच्या व्यसनाला उद्युक्त करते असा माझा गेल्या २० वर्षांचा अनुभव आहे. आता मला सांगा, जिथे पदोपदी क्रोध आहे, संताप आहे, शाब्दिक हिंसाचार आहे त्या व्यक्तीच्या करिअर आणि कौटुंबिक जीवनात आनंद येणार तरी कुठून? खरे तर आम्ही काही मित्र मिळून दर तीन महिन्यांनी -‘रागाला आवरा’  हे एक दिवसाचे शिबीर घेत असू. दुर्दैवाने प्रत्येकालाच राग हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे वाटत असल्याने किंवा ‘पैसे भरून हे काय शिकायचे?’ या वृत्तीमुळे आमचे शिबीर घेणे बंद झाले. आजकाल ‘एच.आर.’ मंडळी ताण-तणावांचे नियोजन या विषयावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम घेतात. त्याच्या बरोबरीने कंपन्यांनी भावनांचे नियमन या विषयावर प्रशिक्षण द्यावे इतकेच नाही तर किशोरवयीन मुलामुलींना शाळेतच हे शिकवण्याची नितांत गरज आहे, असे मला वाटते.
‘केज’चं तिसरं मुळाक्षर जी म्हणजे ‘गोल्स अँड ग्रोथ’ अर्थात उद्दिष्टे आणि प्रगती. माझे वडील रोज सकाळी आज करायची कामे अशी यादी रोजनिशीच्या डाव्या बाजूला लिहीत. आणि रात्री न चुकता ठरवलेल्या प्रत्येक दिवशी रात्री सकाळी झालेल्या कामाचा आढावा लिहीत. मला त्यांच्या नियमितपणे वर्षांनुवर्षे उद्दिष्ट ठरवण्याचे आणि त्याची पूर्तता कशी झाली याचा आढावा घेण्याचे प्रचंड कौतुक वाटते. त्यांचे काहीतरी मोठे उद्दिष्ट असणारच. पण ते त्यांनी एक दिवसापुरते मर्यादित केले. आज ‘अनामिक मद्यपी’ ही संघटना व्यसनमुक्ती हा दीर्घ पल्ल्याचा कार्यक्रम असला तरी फक्त आजचा दिवस व्यसनापासून दूर राहात जा, असा संदेश देते. माझ्या वडिलांनी हा संदेश ही संघटना भारतात येण्यापूर्वीच अमलात आणायला सुरुवात केली होती आणि अखंड ४० वर्षे तो चालू होता. अल्बर्ट एलिस म्हणतात, ‘जेव्हा माणसं आपले जीवनाचे उद्दिष्ट ठरवतात आणि ते साध्य करण्यासाठी निकराने आणि निर्धाराने प्रयत्न करतात त्यातच आनंद असतो. भले त्यात अडथळा येईल, वाट चुकेल, पण जर उद्दिष्टाशी प्रामाणिक राहाल तर ते अपयशसुद्धा प्रेरणादायी ठरते.’ आजकाल अनेक स्व-मदत पुस्तकात याबद्दल बरीच माहिती मिळते.  
ग्रोथ हा पुरुषार्थाचा पाया आहे, असे मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटते. माणसाने प्रत्येक दिवस विद्यार्थी म्हणून जगणं शिकायला हवं. ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ ही संत रामदासांची उक्ती असू दे वा ‘नित्य नवा दिवस जागृतीचा’ ही तुकाराम महाराजांची ओवी असू दे, सारी प्रगतीची लक्षणे आहेत.
शेवटचे मुळाक्षर म्हणजे ई- एम्पथी- सहसंवेदना. हा एक अतिशय सुंदर शब्द आहे. माणसे नेहमी अशी तक्रार करत असतात की ‘मला कुणी समजूनच घेत नाही’, परंतु स्टीफन कोवे म्हणतो, आधी तुम्ही त्यांना समजून घ्या आणि बघा काय होतंय ते. खरं तर ‘एम्पथी’ हा शब्द समुपदेशन शास्त्रातला आहे. परंतु जर प्रत्येकाने तो नीट समजून घेतला तर इतकी माणसं जोडली जातील की बस्स! आपण नेहमी असं म्हणतो, मी जर तुझ्या जागी असतो तर असे केले असते. इथे गंमत अशी की परिस्थिती तीच पण विचार धारणा माझ्याच, दृष्टिकोन माझेच. त्यामुळे मी फक्त माझ्या धारणात त्याची परिस्थिती बसवतो. या उलट क्षणभर आपले विचार, आपल्या धारणा, आपले दृष्टिकोन बाजूला ठेवून त्याचे विचार, त्याच्या धारणा आणि त्याच दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहणे म्हणजे एम्पथी. हा जो परकायाप्रवेश आहे, तो तात्पुरता फक्त त्याला समजून घेण्यासाठीचा. एकदा ते समजून घेतला की पुन्हा आपण आपल्या स्वत:त परत यायचं. त्याला मराठीत परिभाषा कोषप्रमाणे तद-भावना म्हणतात. काही सहसंवेदना म्हणतात तर डॉ. आनंद नाडकर्णी आस्था शब्द वापरतात. आज पूर्ण पुरुष म्हणून जगात वावरायचं असेल तर हे कौशल्य अंगीकारायलाच हवे.
हे सगळे मला निश्चितपणे ठाऊक आहे. त्यातले मी स्वत: किती अमलात आणतो, असे विचारलं तर त्याचे उत्तर- थोडय़ा प्रमाणात- हेच आहे. पूर्ण पुरुषत्वाकडे वाटचाल हे माझे उद्दिष्ट आहे आणि एक दिवसाच्या हिशोबाने मार्गक्रमणा करतोय. बघू कधी यश मिळेल ते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा