पुस्तकं ही आपल्या जगण्यातली, वाढण्यातली अपरिहार्य गोष्ट. लहानपणापासूनचे आपले सवंगडी. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विषयाची विविधता बदलत जाते. या विविधतेचा शोध घेण्यातूनच आपल्याला सापडतात ती अनेकविध पुस्तकं. मनाला रिझवणारी, हसवणारी, रडवणारी, गंभीर करणारी, विचारमग्न करणारी, कुतूहल निर्माण करणारी, प्रश्न विचारणारी, जगण्याचं भानही देणारी. ज्ञानाचा प्रचंड खजिना असणारी ही पुस्तकं आजही अगदी इंटरनेटच्या जगातही आपलं स्थान, अस्तित्व टिकवून ठेवणार याची खात्री देतात. म्हणूनच हे सदर दर पंधरा दिवसांनी. जागेच्या मर्यादेमुळे विषयांना थोडी मर्यादा घातली गेली आहे. स्त्रियांनी लिहिलेली किंवा स्त्रीकेंद्रित पुस्तकाचं इथे स्वागत आहे. स्त्री लेखिकांची परंपरा मराठी साहित्याला नवीन नाही. आणि काळाच्या ओघात कविता, कथा, कांदबऱ्यांच्या पलीकडे जाऊन शोधलेखनातही स्त्री लेखिकांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. अशा सर्वच लेखनाचं, त्यांच्या पुस्तकाचं या सदरात स्वागत आहे. या सदरात लेखक लिहिणार आहेत आपल्या येऊ घातलेल्या किंवा प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकांबद्दल. त्याच्या अनुभवांबद्दल. जे त्या पुस्तकाच्या पलीकडचे असेल.. वाचकांशी हे हितगुज असेल. यंदा कवयित्री इंदिरा संत यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यांच्या कवितेचंच एक शीर्षक
‘असे शब्द..असे अर्थ’ या नावाने हे सदर त्यांनाच अर्पण.
प्रकाशक वा लेखिकाही आपली पुस्तके इथे पाठवू शकतात. पत्ता – चतुरंग, ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई ४००७१०.
वयाच्या सातव्या वर्षी मी पहिली कविता लिहिली-
हिरवे हिरवे गवत
फुले भोवती जमत
जाते मी माघारी
येते मी रमतगमत..
छानच की! मस्तच की! मी माझी पाठ थोपटली भाई- आई- दीदींनी भरपूर कौतुक.. मी आनंदानं उतू चाललेले. मग काय कविताच कविता.. हळू हळू वह्य़ा कंटाळू लागल्या, दीदी पोट धरून हसू लागली, पण मी हटतेय काय. जाम चिवटच. हळूहळू आयुष्याची वळणं बदलली. काही माणसांनी एक्झिट घेतली, काहींनी एन्ट्री केली. पण कविता आपली तशीच मनात, मेंदूत चूपचाप. एखाद्या बारक्या तळघरात शेकडो लोक कोंबावेत तसे शब्द. म्हणजे कसं की ही माझ्या जिवंत असण्याची खूणच. श्वास चालत असला, ठोके धाड धाड उडत असले की कसं आपण म्हणतो, आहे बरं का जिवंत.. तसं मी लिहितेय, म्हणजे आहे बरं का मी जिवंत. मी नाचतेय, गातेय, हसतेय खदाखदा.. चला म्हंजे श्वास चालूय माझा. मी बरं लिहिते की वाईट या जंजाळात मी पडतच नाही. ते लोकांनी ठरवायचं. ते वाचतायत की नाही, हेपण पाहायचं काम माझं नाही.
तर नुकतंच प्रकाशित झालेलं ‘झाडपणाची गोष्ट’ हे माझं नववं पुस्तक, अपत्य. विविध कथा एकत्र केलेल्या. एक वाचक म्हणून मला स्वत:ला आवडलेल्या या संग्रहातल्या कथा म्हणजे ‘झाडपणाची गोष्ट’, ‘अंथागतेच्या पलीकडे’ आणि ‘कासव’, ‘महानगर’ या गोष्टी. या कथासंग्रहातल्या कथांची निवड केलीय ‘लोकवाङ्मयगृह’ प्रकाशननं. त्यातल्या शेवटच्या दोन कथा या संग्रहापासून खूप वेगळ्या आहेत. विशेषत: ‘ब्रेनड्रेन’ ही. वि. स. वाळिंबे म्हणून गेलेत की, शुभंकराप्रमाणेच भयंकरालाही त्याचे असे आकर्षण असते. या त्यांच्या उक्तीनुसार मलाही रहस्यकथा प्रचंड आवडतात. शेवटी माणूस आज जो इथवर आला तोच मुळी त्याला आयुष्यातल्या निसर्गातल्या प्रत्येक भयंकर गूढ गोष्टीचं कुतूहल वाटलं म्हणूनच ना. माणूस जो सनातनाचा स्वत्वाचा स्वत:चा शोध घेतो त्याबद्दल माझ्या मनात सततच मंथन चालू असतं, त्याचंच हे रूप.
‘एक होता उंदीर’ काय, ‘झाडपणाची गोष्ट’ काय किंवा ‘अथांगतेच्या पलीकडे’ या कथा माणसाचा सनातन शोध मांडतात. यातल्या प्रत्येक जीवाला पलीक डे जाण्याचा ध्यास आहे. या कथांमधल्या उंदीर- झाडं, पक्षी यांना स्वत:च्याही पलीकडे जायचं असतं. उंदीर, झाड, पक्षी, माणूस यात एकच सनातन ओढ आणि सजीवता ही कॉमन बाब आहे. जरी यांच्या भूमिका बदलल्या तरी शोध तोच राहतो. प्रश्न दु:ख तेच राहतं हीच खरी मेख आहे. ती फक्त प्रतीकं आहेत. आणि ही पण दुसरी गंमत आहेच की मी उंदीर होऊ शकले, झाड होऊ शकले, पक्षी होऊ शकले, माणूस होऊ शकले की नाही याचाच शोध चालू आहे!
बरं नुसत्या लिखाणातच मी रमले असं नाहीये. एकंदर जगात – आयुष्यातच मी रमते. दु:ख, सिस्टिम आणि माणसांपेक्षा जग सुंदर आहे. छोटी रेषा काळी कुळकुळीत गिरवत बसण्यापेक्षा दुसरी मोठी लांबच लांब रेषा काढावी न् लिहीत बसावं..
लिहिणं – व्यक्त होणं हीच एक महत्त्वाची अपरिहार्य गोष्ट आहे. ती आपल्या अस्तित्वाबाहेरची गोष्ट नाहीच मुळी. लिहायला आवडतं बिवडतं ही बाबच नाही. शक्य नसतं हे माहितीय पण मला मेल्यावर, मला पुरल्यावरपण जर कुणी कागद पेन ठेवलं तर मी जमिनीतून हात वर काढून पटापटा लिहूच लागेन इतकं हे अपरिहार्य.‘बियांचं काय केलंस’, ‘महानगर’, ‘जागा आहे का’, ‘देह काचेचा’, ‘मृत्युपनिषद’, ‘प्रेम आंधळं नसतं’ या कथा नेहमीप्रमाणेच लिहिता लिहिता आपोआप पूर्ण झाल्यावर मी स्वत: वाचल्यावर मला तीव्रतेनं वाटलं की यावर खरंतर चांगल्या फिल्म्स करता येतील. पण कागद-पेन इतकं कॅमेरा- लाइट्स लोकेशन मनुष्यबळ स्वस्त नसल्यानं मी नंतर तो मोह आवरला. पण रोज दिवसाला एक कथा, एक स्क्रिप्ट लिहिण्याइतकं मॅटर आहे बरं का या मेंदूत. आजवरची नऊ पुस्तकं म्हंजे फक्त तुम्हाला मला सहन करण्याची सवय व्हावी न् ताकद असावी म्हणून!
हे कथाविश्व मी माझ्या अनोळखी पण निश्चित कधी भेटेल हे ठाऊक नाही, पण भेटताना भय वाटू नये- माणसांना भेटताना वाटतं तसं – ही इच्छा ठेवून, माझ्या मृत्यूला अर्पण करतेय.. जसं समिधा यज्ञात टाकाव्या, जसं समुद्राचं जळ समुद्राला अघ्र्य म्हणून परत करावं तसं.. आपल्याला मृत्यू असला तरी आपल्या सर्जक कलेला मृत्यू नसावा ही इच्छा आहेच.