यूटीव्ही (आता डिस्ने यूटीव्ही) सारख्या बलाढय़ वाहिनीच्या एकूण तीन संस्थापकांपैकी एक. यूटीव्ही बिन्दास, यूटीव्ही स्टार्स, यूटीव्ही अ‍ॅक्शन, हंगामा टीव्ही यांसारख्या ब्रॉडकास्ट ब्रॅण्ड्सची कर्तीधर्ती आणि अनेक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांची क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर झरिना मेहता. त्या झगमगत्या ग्लॅमरच्या दुनियेतून ‘स्वदेस’च्या निमित्ताने स्वेच्छेने सामाजिक कामात उतरणाऱ्या झरिना मेहता यांच्या आगळ्यावेगळ्या करिअरविषयी..
भारतासह अनेक देशांत जेव्हा स्त्रियांच्या ‘वर्किंग अवर्स’ ची गणती होते, तेव्हा ती सरासरी आठ तासांची असते. ‘वर्किंग अवर्स’ या ठरावीक संज्ञेपलीकडे जाऊन करिअर करणाऱ्या झरिना मेहता यांनी ‘यूटीव्ही’साठी स्वत:ला २७ वर्षे वाहून घेतल्यानंतर आता वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी एका नव्या करिअरमध्ये स्वत:ला पूर्ण वेळ झोकून दिलंय. ‘यूटीव्ही’चं द्वार ओलांडून ‘स्वदेस’च्या उंबरठय़ात प्रवेश करणाऱ्या झरिना मेहता एका नव्या ध्येयपूर्तीसाठी तळमळीने, जिद्दीने झपाटलेल्या आहेत. झरिना मेहता व त्यांचे पती रॉनी स्क्रूवाला यांनी ‘स्वदेस’ ही संस्था ग्रामीण भारत सबल, स्वावलंबी व सुशिक्षित करण्याच्या हेतूने स्थापलेली आहे. ‘स्वदेस’सह अन्य काही मुद्दय़ांवर झरिनांशी झालेल्या या गप्पा.
मनोरंजनाच्या क्षेत्रात आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर कोटय़वधींची उलाढाल लीलया करणाऱ्या झरिना मेहता आणि त्यांनीच स्थापन केलेल्या ‘यूटीव्ही’ या ब्रॅण्डचा दोन भिन्न पातळीवर विचार आपण करूच शकत नाही. ‘यूटीव्ही’चे तीन संस्थापक ज्यात रॉनी स्क्रूवाला, देवेन खोटे आणि तिसऱ्या झरिना मेहता. ‘यूटीव्ही’ हा जागतिक पातळीवर नेण्यासाठी झरिना मेहता यांनी  ‘यूटीव्ही’चं  विश्व अक्षरश: शून्यातून उभारलं.
    ‘यूटीव्ही’तलं एक लोकप्रिय चॅनल ‘बिन्दास’. याच्या निर्मिती मागे होती एक घटना. त्या सांगतात,‘‘एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी मला आणि रॉनीला आमंत्रित करण्यात आलं होतं. सहा ते नऊ अशी वेळ असूनही आम्ही रात्री साडेनऊच्या सुमारास पार्टीस्थानी पोहोचलो. चॅनेल्सच्या कामाचा ताण, रस्त्यातील प्रचंड ट्रॅफिक यांना तोंड देत चेहरा कसानुसा करत तिथे पोहोचलो तर ज्या मुलाचा वाढदिवस होता, तो शांतपणे आलेल्या प्रेझेन्टस्ची खोकी उघडण्यात गर्क होता. पण त्या ‘बर्थ-डे बॉय’च्या चेहऱ्यावर काही हसू नव्हतं. त्याचा तो चौदावा वाढदिवस होता. पण वाढदिवसाला मिळालेल्या गिफ्टस्मध्ये कुणीही त्याच्या ‘वाढत्या’ वयाचा विचार न करता त्याला वय र्वष ९ ते १४ वयोगटातील मुलांना उपलब्ध असलेल्या बैठे गेम्स-पझल्स तत्सम भेटी दिल्या होत्या..’ आम्ही त्याच्याशी बोललो तरी त्याची कळी खुलेना.. पण बोलत असताना हे गेम्स खेळायला मी लहान राहिलेलो नाहीये..’ हे त्याचं तक्रारीवजा पालुपद माझ्या डोक्यातून जाता जाईना..’’
तो काळ होता २००४-२००६ दरम्यानचा.  त्या सांगत होत्या, ‘‘टीनएजर मुलांच्या मानसिक, बौद्धिक गरजा यांचं एक वेगळं विश्व आहे. १४-१५-१६ या वयातली मुलं खरं तर मोठय़ांच्या दृष्टिकोनातून ‘कीड्स’ असतात, पण या पौगंडावस्थेतल्या मुलांना ‘कीडस्’ म्हणवून घेणंही फारसं रुचत नाही. बैठे खेळ खेळण्यात त्यांना स्वारस्य नसतं, ना पार्टी करण्याचं, ना एन्जॉय करण्याचंही वय. अशा आडनिडय़ा वयातल्या मुलांच्या वाढदिवसाला कोणती भेट द्यावी या संभ्रमावस्थेत आपण नेहमीच असतो. झरिनाचं विचारचक्र वेगाने सुरू झालं. तिने आपल्या प्रश्नांचा भुंगा रॉनीकडे व्यक्त केला. टीनएजर मुलांसाठी एक स्वतंत्र दूरचित्रवाहिनी असायलाच हवी, या विचाराने तिला झपाटलं.
खरं तर २००० च्या दशकापासून झरिनाचा नोकरीतून एक मोठा ब्रेक घेण्याचा विचार चालला होता. आज-उद्या करता-करता झरिनाने तिची पूर्वनियोजित दीर्घ रजा घेतलीही. जी काही वर्षांपासून प्रतीक्षा यादीतच रेंगाळत होती. झरिनाने थेट विदेश गाठला. ‘आय अ‍ॅम स्ट्रिक्टली ऑन लीव्ह.. टोटली आयसोलेटेड..’ घोषा करीत परदेशात गेलेल्या झरिनाची ‘आयसोलेटेड लाँग लीव्ह एक महिन्याच्या आतच संपली. मात्र नवीन आव्हानं काम-ध्येयाच्या नशेने झपाटलेल्या झरिनाचे आराखडे सुट्टीच्या दरम्यान तयार झाले होते.. ‘व्हॉट्स न्यू’.. म्हणत टीनएजर मुलांची बौद्धिक गरज ध्यानात घेऊन झरिनाने ‘यूटीव्ही-बिन्दास’ हे नवं-कोरं युनिक चॅनल सुरू केलं.. वय वर्ष ४ ते १२ साठी ‘यूटीव्ही हंगामा’ देखील लॉन्च केलं. झरिनाच्या शब्दांत सांगायचं, तर ‘बिन्दास’ आणि ‘हंगामा’ ही दोन्ही माझी बाळं आहेत. या दोन्ही वाहिन्यांचं लॉन्चिंग होईपर्यंत माझ्या मेंदूने आणि डोळ्यांनी दोन तासांचीही स्वस्थ झोप घेतली नाही.. ‘यूटीव्ही-बिन्दास’ची सुरुवात २४ सप्टेंबर २००७ मध्ये झाली.. फन, फ्रँक, फिअरलेस, फ्रीडम या चतु:सूत्रीवर ‘बिन्दास’ची निर्मिती केली होती. नवथर वयातल्या मुलांना खरंच थोडीशी गंमत, थोडंसं साहस, थोडीशी निर्भीडता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्य हवं असतं.. वेब, मोबाइल, गेमिंग, ग्राऊन्ड इव्हेनस असं ‘हट के’ प्रोग्रॅमिंग केलं आणि अवघ्या १८ महिन्यांत ‘बिन्दास’नं बाळसं धरलं! ‘यंग अ‍ॅडल्ट्स’.. साठीचं ते नंबर वन चॅनल होतं.
दीर्घ रजा, ब्रेक, विरक्ती यांचे मनसुबे हवेत विरले. पुढची २०११ पर्यंतची सगळी र्वष झरिनाने पुन्हा ‘यूटीव्ही’च्या या नव्या आव्हानांना समर्थपणे पेलण्यात घालवली. ‘यूटीव्ही’ची आणखी एक स्वतंत्र वाहिनी ‘यूटीव्ही स्टार्स’ ,‘अ‍ॅक्शन बॉलीवूड’देखील सुरू झालं. ३५०० तासांची अखंड मनोरंजनाची धुरा झरिनाच तना-मना वाहत होती. ‘इमोशनल अत्याचार’ या कार्यक्रमावर तर राळ उठली.. तितकीच अभूतपूर्व लोकप्रियताही मिळाली. झरिनाच्या मतानुसार, आपली मैत्रीण-मित्र-सहचर या प्रत्येकाबद्दल नैतिकतेच्या काही खऱ्या-खोटय़ा कल्पना मनात असतात, पण त्यातलं सत्य जाणून घ्यायचं धारिष्टय़ नसतं, त्यामुळे ‘इमोशनल अत्याचार’ त्यातल्या वास्तविकतेमुळे खऱ्या अर्थाने ‘रिअ‍ॅलिटी शो’ ठरला! असे एकामागोमाग एक चॅनल्स आणि त्यावरचे विविध कार्यक्रम, त्यांची आव्हानं, त्यातलं यशापयश या सर्वात झरिना पुन्हा एकदा बुडून गेली. पण त्यातून बाहेर पडायलाच हवं होतं.. ती तिच्या अंतर्मनाची साद होती..
ग्लॅमर, प्रतिष्ठा, अमाप पैसा अशा अनेक गोष्टी घेऊन येणाऱ्या या व्यवसायापासून २७ वर्षांनंतर फारकत घेणं हा निर्णय भल्या-भल्यांची झोप उडवणारा आहे. हे एका रात्रीत त्यांना कसं शक्य झालं..?
 ‘‘अर्थातच हा माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय होता. ’’ त्या सांगत होत्या. ‘‘यूटीव्ही’ची स्थापना मी, माझे पती रॉनी स्क्रूवाला व देवेनने (खोटे) मिळून केली. त्यामुळे ‘यूटीव्ही’ आणि आमच्या इतर वाहिन्याही मला माझ्या मुलांसारख्या आहेत. २७-२८ र्वष ज्याच्याशी मी एकरूप झाले त्याच्याकडे पूर्णत: पाठ फिरवताना झालेलं दु:ख शब्दांत नाही मांडता यायचं मला. ‘यूटीव्ही’ ही माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतील पहिली आणि शेवटची नोकरी-व्यवसाय होता. ‘यूटीव्ही’च्या उभारणीसाठी मी सर्वस्व पणाला लावलं. त्यामुळे हा निर्णय नक्की करण्यापूर्वीची गेली ३-४ वर्षे माझं मन दोलायमान होतं. असंख्य विचारांचं काहूर माजायचं.. मीच उभारलेल्या विश्वातून कायमचं बाहेर निघणं हा निर्णय हृदयावर दगड ठेवूनच घेतला मी! ‘यूटीव्ही’ जेव्हा आम्ही ‘डिस्ने’ला विकला, तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकले आणि आम्ही पूर्ण वेळ आमच्या ‘स्वदेस’ फाऊन्डेशनला द्यायचं ठरवलं.’’
 ‘कारकिर्दीच्या शिखरावर पोहचल्यानंतर हा निर्णय घेणं हा विरक्तीच्या भावनेतून घेतलेला आहे का..?’ असं विचारता झरिना म्हणतात, ‘‘विरक्तीची भावना मी म्हणणार नाही. ‘यूटीव्ही’ने आजवरच्या आयुष्यात खूप भरभरून दिलं. मान-सन्मान, यश, कीर्ती.. मी कृतज्ञ आहे. माझी आणि रॉनीची भेट, परिचय, प्रेम आणि पुढे लग्न, – रॉनी माझा सहकारी ते जीवनसाथी हे टप्पे इथलेच. पन्नाशीपर्यंतचा व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनातलं साहचर्य, चढाओढ, दिवस-रात्र नव-नव्या आव्हानांची झिंग, टीआरपीचे खेळ सारं काही पेललं. या अखंड कामाच्या चक्रव्यूहातच मानसिक द्वंदाचं स्फुलिंग निर्माण होत गेलं. मला समाजासाठी, विशेषत: तळागाळातील जनतेसाठी काही तरी करायला हवं होतं, त्यासाठी मलाच पुढे यायलाच हवं होतं. अर्थात, माझे हे विचार सुरुवातीच्या काळात अगदी रॉनीलादेखील सांगितले नव्हते. पण नंतरच्या काळात, २००१ मध्ये आम्ही (यूटीव्ही) ‘शेयर’ (सोसायटी टू हिल,  रि-स्टोअर अ‍ॅण्ड एज्युकेट) ही धर्मादाय संस्था सुरू केली. ‘शेयर’साठी मी व रॉनी झटून काम करू लागलो. २००४ मध्ये आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटातली मध्यवर्ती कल्पना माझ्या मनाला खूप भिडली आणि आमच्या ‘शेयर’ संस्थेचं नामकरण ‘स्वदेस’ केलं. अर्थात आशुतोष गोवारीकर यांच्या अनुमतीने.’’
 झरिना मेहता यांनी ज्याप्रमाणे ‘यूटीव्ही’चं साम्राज्य स्थापन केलं ते  झपाटलेपण आता ‘स्वदेस’साठी दिसतं आहे. ‘स्वदेस’ संस्था ग्रामीण भारताचा सर्वागीण विकास, मूलभूत गरजा, पाणी, स्वच्छता, उपजीविकेचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण याखेरीज महिलांचे स्वयंसाहाय्यता बचत गट अर्थात ग्रामीण महिलांना रोजगाराच्या व स्वावलंबी बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्याअंतर्गतच त्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘माता रमाई’, ‘सोमजाई’, ‘जिजाऊ’ व ‘नागेश्वरी’ अशा चार बचत गटांचा सत्कारही केला. ‘स्वदेस’पुढे मोठी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांना समर्थपणे तोंड द्यायला झरिना मेहताही सिद्ध आहेत.
‘‘मोठी गंमतच आहे.. खरं तर मी माझ्या ‘यूटीव्ही’च्या कारकिर्दीत शेकडो लोकांना भेटले. सेलिब्रेटीजच्या भेटीगाठी, अनेक व्यावसायिक मीटिंग्ज, अनेक देशांचे दौरे, रोजच्या तर अनेक बैठका असत. पण जेव्हापासून मी ‘स्वदेस’च्या कामात स्वत:ला झोकून दिलंय. तेव्हापासून मी इतक्या माणसांना, इतक्या महिलांना-युवकांना भेटलेय, जेवढी मी गेल्या २७ वर्षांमध्ये भेटले नव्हते.. ग्रामीण भारतात, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईजवळच्या आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही इतके प्रश्न, इतक्या समस्या असतील हे मला वातानुकूलित केबिनमध्ये बसून कधी कळलं नाही! पण आता जीवनाचा जो काही अर्थ मला गवसतो आहे तो अगदी हृदयाच्या आरपार भिडतोय, मला नवसंजीवन देतोय..’’
(समाप्त)

Story img Loader