कागद-कचऱ्यातून अतिश्रीमंत बनलेली ‘चीनची कचरा क्वीन’ झांग यीन, कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ‘इको पोस्ट’ची निर्मिती करून बेरोजगारी थोपवणारी केनियाची लोर्ना रुट्टो, कचरा उचलण्यासाठी लोकांकडूनच पैसे वसुली करणारी लिबेरियातील कोफा, प्लास्टिकवर प्रक्रिया करून कोटय़वधींचा उद्योग उभारून सामाजिक बदलाची प्रवर्तक ठरलेली आफ्रिकेच्या गांबियातील इसाटाऊ सेसे ही आहेत फक्त काही नावं. आज अशा असंख्य जणी कचऱ्याला आपल्या उद्योगाचं भांडवल बनवत आहेत. कचरा म्हणजे घाण, किळसवाणं काम ही संकल्पना मागे पडून उद्योजिका होण्याचं, ‘स्वच्छ’ मार्गाने प्रचंड पैसे मिळवण्याचं साधन बनत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने.
कचरा तुम्हाला जगातील अतिश्रीमंत व्यक्तींपैकी एक बनवू शकतो, कचऱ्याच्या योग्य वापरातून तुम्ही बेरोजगारी कमी करू शकता, अनेकांची गुन्हेगारीकडे जाणारी पावलं थांबवू शकता, कचऱ्यापासून सौंदर्यालंकार बनवू शकता, इतकंच नव्हे तर कचऱ्याच्या जोरावर तुम्ही मुलींची शाळागळती थांबवू शकता, असं सांगितलं तर विश्वास बसेल? पण हे सत्य आहे. जगभरातील विविध स्त्रियांकडून कचरा व्यवस्थापनातून होणारे हे विविध प्रयोग आज कचऱ्यातून क्रांती घडवत आहेत. कचरा म्हणजे घाण, किळसवाणं काम ही संकल्पना मागे पडून उद्योजिका होण्याचं, ‘स्वच्छ’ मार्गाने प्रचंड पैसे मिळवण्याचं साधन बनत आहे.
पर्यावरणाचे बकालपण वाढवणारा घटक म्हणजे कचरा. त्यातही प्रक्रियेनंतरही तशाच राहणाऱ्या, अविघटनशील कचऱ्याचा यक्षप्रश्न प्रगत देशांचीही झोप उडवणारा! त्यालाच आव्हान देत अनेक स्त्रियांनी रुळलेल्या वाटांना झुगारून कचऱ्यापासून सृजन साकारलं आहे. तर अनेक ठिकाणी कचऱ्यावरील प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमुळे थेट रोजगारनिर्मिती झाली आहे, यातून उद्योगाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. कचऱ्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थेट ३६० अंशांनी बदलायला लावणारी ही काही उदाहरणं.
चीनची ‘कचरा क्वीन’
जगातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींपैकी एक असणारी झांग यीन यशस्वी उद्योजिका ठरलीय ती तिच्या काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याच्या क्षमतेमुळे. अमेरिका, युरोप येथील देशांमध्ये ऐंशीनंतर कॉर्पोरेट संस्कृती आकाराला येत होती, त्यामुळे टनावारी टाकाऊ कागदांचा कचरा गोळा व्हायचा. ही संधी हेरली झांग हिने. हा टाकाऊ कागदांचा कचरा गोळा करून तो जहाजाने थेट चीनमध्ये आणायचा व त्यावर प्रक्रिया करून त्यापासून कार्डबोर्डसारख्या कठीण स्वरूपाच्या खोक्यांसाठी लागणाऱ्या पुठ्ठय़ांची निर्मिती करायची हा तिचा व्यवसाय. या पुठ्ठय़ाला त्या वेळी चीनच्या स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी होती. हा पुठ्ठा चीनमधून मोठय़ा प्रमाणावर पाश्चिमात्य राष्ट्रांनाच निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, फर्निचर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी वापरला जायचा. यासाठी तिच्या ‘नाइन ड्रॅगन्स पेपर’ या कंपनीचं एक कार्यालय हाँगकाँग शहराबाहेर आहे, तर दुसरं अमेरिकेच्या लॉस एंजेलिस्मध्ये. एका अत्यंत सोप्या मात्र डोकं लढवणाऱ्या या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवून झांग यीन श्रीमंतांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. तिला ‘चीनची कचरा क्वीन’ अशी उपाधीही उद्योगजगताने दिली आहे!
मात्र आजच्या तिच्या या लखलखत्या ऐश्वर्यामागे हलाखीच्या भूतकाळाची काळी किनार आहे. वडील लष्करात, आठ भावंडांपैकी सगळ्यात थोरली झांग यीन. वर्षांतून केव्हा तरी मटणाचं जेवण मिळे तो दिवस एखाद्या सणावारासारखा वाटे. झांगने प्रयत्नपूर्वक शिक्षण पूर्ण केलं, अनेक नोकऱ्या केल्या. त्यातच तिला कागदावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या व्यवसायाची कल्पना सुचली; परंतु चिनी बाजारपेठेत ती फारशी नफादायी ठरली नसती. तिने काही काळ हा व्यवहार करून पाहिलाही. पण अखेर स्वप्नपूर्तीसाठी तिने १९९० मध्ये लॉस एंजलिस्ला स्थलांतर केलं व नवऱ्याच्या मदतीने कंपनी स्थापन केली. त्या वेळी एकटय़ा अमेरिकेत ४७० लाख टन टाकाऊ कागद जमा व्हायचा. त्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याच्या कल्पनेने तेथे मूळ धरलं होतं. त्याच वेळी चीनमधील पॅकेजिंग व्यवसायाला टाकाऊ कागदाच्या लगद्याची कमतरता जाणवत होती. हीच संधी समजून झांगने पुन्हा मायभूमीत पाय रोवले व तिची ‘नाइन ड्रॅगन्स पेपर’ ही कंपनी थाटात उभी राहिली. फक्त टाकाऊ कागदावर पुनप्र्रक्रिया करण्याचा हट्ट धरून ठेवला असता तर लखपती होणं अवघड होतं.
वेळीच या प्रक्रिया केलेल्या कागदाचा वापर ‘पेपर मॅन्युफॅक्चरिंग’कडे वळवला नसता तर संधी हातची गेली असती. व्यवसायात दूरदृष्टी खूपच महत्त्वाची असते हे सांगताना ती म्हणते, जेव्हा आमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे ५० हजार टनांपेक्षा कमी कागदावर प्रक्रिया करणारी मशिनरी होती त्या वेळी माझ्या कंपनीची मशिन्स २०० हजार टन क्षमतेची होती. आमचं ध्येय उच्च होतं, त्यासाठी मेहनतही पराकोटीची घेणं भाग होतं.
आज तिच्या कंपनीत ११ अशी बलाढय़ मशिन्स आहेत. साडेपाच हजार कर्मचारी आहेत. १०० कोटी डॉलरचं वार्षिक उत्पन्न आहे. तिला आता वेध लागले आहेत कार्डबोर्ड मशिन्समध्ये अग्रगणी होण्याचे. एका स्त्रीने हे स्वप्न पाहणं, ते व्यवहारात उतरवणं हे कौतुकास्पद होतं.
रुट्टोची ‘ग्रीन आंत्रप्रनरशिप’
केनियाच्या लोर्ना रुट्टो हिचा तर झोपडपट्टीतील रहिवासी ते कंपनीची मालकीण होण्याचा प्रवास स्फूर्तिदायक आहे. प्लॅस्टिकसारख्या नैसर्गिकरीत्या विघटन न होऊ शकणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधत तिने ‘ग्रीन आंत्रप्रनरशिप’ हे बेरोजगारी व पर्यावरणाच्या पतनाला ठोस उत्तर ठरू शकेल, हे जगाला दाखवून दिलं. २००९ साली स्थापन केलेली तिची ‘इको पोस्ट’ ही संस्था प्लॅस्टिक कॅरीबॅग, खेळणी, बाटल्या, घरातली इतर उत्पादने अशा प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून मजबूत, टिकाऊ, सुरक्षित प्लॅस्टिक निर्मितीचं शिवधनुष्य पेलते आहे. शिवधनुष्य अशासाठी, कारण केनियात दरदिवशी १० लाख टन कचरा तयार होतो. त्यात २० टक्क्यांहून अधिक प्लॅस्टिक असतं. या प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीसाठी ठोस उपाययोजना नाही. हा प्लॅस्टिकचा कचरा इतस्तत: पडलेला असतो, उकिरडं वाढवतो, गटारी तुंबवतो, चाऱ्यासोबत जनावरांच्या पोटात गेल्याने दुभत्या जनावरांचे बळी घेतो, एक ना अनेक संकटे. त्यापैकी बऱ्याच प्लॅस्टिक कचऱ्याला रुट्टोने प्रक्रिया करून वापरात आणल्याने मोठा धोका टळला आहे.
केनियात बेरोजगार तरुणांची वाढती संख्या, गुन्हेगारीला प्रवृत्त होणारी त्यातील अनेकांची पावलं व मोठय़ा मनुष्यबळाचा उपयोग करून घेण्यास अपयशी ठरलेली व्यवस्था याची जाणीव रुट्टोला अस्वस्थ करायची. अखेर रुट्टोने बँकेतली सुखासीन नोकरी सोडली व २००९ मध्ये ‘इको पोस्ट’ची स्थापना केली. आतापर्यंत तिने २ दशलक्ष किलो प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला आहे. मुख्य म्हणजे यातून हजारो जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला. गुन्हेगारीकडे वळणारी पावलं थबकू लागली. तिचा झोपडपट्टीतील रहिवासी ते कंपनीची मालक हा प्रवास प्रेरणादायी आहे.
‘इको पोस्ट’ नेमकं काय वेगळं करते? कचरावेचक म्हणून काम करणारे त्यांचे बांधलेले लोक प्लॅस्टिक कचरा (पॉलिथिन व पॉलिप्रोपेलिन) गोळा करतात, ते धुऊन स्वच्छ करून त्याचे रीतसर वर्गीकरण करतात व कंपनीपर्यंत हा कचरा पोहोचतात. कंपनी त्यांच्याकडून हा माल विकत घेते. ‘इको पोस्ट’मध्ये तो पुन्हा धुऊन, वाळवून वितळवला जातो व विविध साच्यांमध्ये तो ओतला जातो. विशेष म्हणजे यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नाही, फक्त पुनर्प्रक्रियेत, प्रशिक्षित कर्मचारी टाकाऊ प्लॅस्टिकचं रूपांतर एका एकसंध फ्लॅस्टिकच्या स्वरूपात करतात. ज्यामुळे प्लॅस्टिकचं आयुर्मान वाढतं व उपयुक्तताही. इमारतबांधणीसाठी लागणाऱ्या लाकडाला पर्याय म्हणून या पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लॅस्टिकचे स्लॅब, रॉड वापरता येतात. याशिवाय कुंपण घालण्यासाठी, माहिती फलक लावण्यासाठी आणि रस्तेबांधणीसाठी हे प्लॅस्टिक वरदान ठरलं आहे. आज ‘अॅबरडेअर नॅशनल पार्क’सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ‘इको पोस्ट’च्या प्लास्टिकचं कुंपण घातलं गेलं आहे. इतकंच नाही तर अनेक क्रीडा संकुलं, जंगलं यांच्या सीमारेषाही ‘इको पोस्ट’च्या नावे लिहिल्या गेल्या आहेत. आता तर इतकी मागणी आहे तिच्या प्लॅस्टिकला, की पुरवठा अपुरा पडू लागला आहे!
कोफाची कचऱ्यासाठी पैसे वसुली
लिबेरियातील कचरा व्यवस्थापनाबाबतचा धडा तर सगळं फुकट हवं असणाऱ्या मानसिकतेवर चपराक ओढणारा आहे. घनकचऱ्याचं आव्हान वाढत्या वस्तीसोबत अधिक भीषण होत जातं. लिबेरियात तब्बल १४ र्वष चाललेल्या नागरी युद्धामुळे, अस्थिरतेच्या काळात नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणं डोईजड होतं की कचरा व्यवस्थापन वगैरेचा मुद्दाही कुणाच्या गावी नव्हता. पण कचऱ्याचा ढीग वाढल्याने रोगराई वाढली व आरोग्याचे तीन तेरा वाजले. साथ पसरून अनेकांचे बळी गेले. अखेर आपण निर्माण केलेल्या कचऱ्यावर आपणच उपायही शोधला पाहिजे, ही जाणीव होऊन स्थानिक खासगी कंत्राटदार पुढे आले व त्यांनी कचऱ्यातून एका आरोग्यदायी उद्योगाचा श्रीगणेशा केला. पेनेसविले वेस्ट इंटरप्रायजेस ही कंपनी प्रिन्सेस कोफा या होतकरू उद्योजिकेने २०१० मध्ये स्थापन केली. त्या वेळी कचऱ्यासाठी पैसे मोजणं ही कल्पनाच बहुतांशी लोकांच्या पचनी पडणारी नव्हती, पण कोफाने ती यशस्वी करून दाखवली. आठवडय़ातून चार वेळा संस्थेचे १० लोक घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. सुमारे ३०० घरांचा त्यात समावेश असतो. दर शनिवारी संस्थेचा एक प्रतिनिधी ५० ते ५०० लिबेरियन डॉलपर्यंतची रक्कम कचरा विल्हेवाट लावण्यासाठीची फी म्हणून वसूल करतो व कचरा व्यवस्थापनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करतो. स्वच्छतेची आस धरणं ईश्वरसेवा केल्यासारखंच आहे, त्यामुळे मी माझ्या कामाकडे घाण गोळा करणं असं न पाहता परिसर स्वच्छ ठेवण्याचा उद्योग म्हणून पाहते, असे कोफा म्हणते. कोफा म्हणते, आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पैसे मोजणं लोकांना थोडं अवघड वाटायचं, पण लोकांना याचं गांभीर्य आता कळू लागलं आहे. आता त्यांचा दृष्टिकोन बदलतो आहे, लोक स्वत:हून पैसे देण्यासाठी वाट पाहत असतात. मुळात आपण केलेल्या कचऱ्यासाठी पैसे मोजणं म्हणजे आपोआपच कचरा करतानाच काळजी घेण्याची सवय नागरिकांमध्ये जडली. मुख्य म्हणजे सरकारने कचरा व्यवस्थापनाचं सर्वासाठी क्षेत्र खुलं केल्याने हे शक्य झालं असं ती म्हणते. सहकाऱ्यांच्या उत्साहावर आता संस्थेची व्याप्ती वाढते आहे.
कचऱ्यावर भविष्य विणणारी सेसे
आफ्रिकेतीलच गांबिया येथील इसाटाऊ सेसे यांनी कचऱ्याच्या प्रक्रियेतून घडवलेला बदल केवळ अविश्वसनीय आहे. त्यांची Njau Recycling and Income Generation Group (NRIGG) ही संस्था हजारोंना नोकऱ्या देणारी, तर कोटय़वधी रुपये उभी करणारी ठरली आहे. १९९७ सालापासून सेसे यांनी कचऱ्याच्या विघटनाबाबत जनजागृती करण्यासाठी असंघटित क्षेत्रातल्या लोकांसोबत काम करायला सुरुवात केली. झोपडपट्टी, टेकडय़ा, अरुंद वस्त्या अशा ठिकाणी राहणाऱ्या समाजाच्या निम्नस्तरातील लोकांच्या आसपास कचऱ्याचे डोंगर साचत जातात, त्याची विल्हेवाट न लावण्याचे दूरगामी परिणाम असतात, याची त्यांना कल्पना नसते. यासाठीच आपणच काही तरी केलं पाहिजे असं सेसे यांनी ठरवलं. मात्र, खुद्द त्यांच्या आईलाही ही कल्पना रुचली नाही. लोकांच्या कचऱ्यावर आपलं भविष्य विणण्याची त्यांची कल्पना आईने साफ धुडकावून लावली. मात्र ब्रिटनसारख्या अनेक देशांत हा ट्रेंड ७०-८० च्या काळात रुजला होता. त्याचा वापर करण्याचं सेसे यांनी ठरवलं. शास्त्रशुद्ध अभ्यासानंतर सेसे यांनी या लोकांना कचऱ्यावर विशेषत: प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त वस्तू बनवण्याच्या कामी लोकांना सामील करून घेतलं. कचरा जाळण्यापासून त्यांना कायमचं परावृत्त केलं. प्लॅस्टिक जाळल्याने निर्माण होणाऱ्या कार्बन मोनॉक्साइडचा घातक परिणाम त्यांच्या लक्षात आणून दिला होता. कचरा व्यवस्थापनाची कोणतीही योजना नसणाऱ्या विकसनशील देशात हे अत्यंत गरजेचं होतं. प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून चटया, प्रवासी बॅगा, आकर्षक कानातले तयार केले. रबरवर प्रक्रिया करून त्यापासून चक्क नक्षीदार व इकोफ्रेंडली नेकलेस तयार केले. जुन्या कॅसेट्स, व्हिडीओ टेप्सच्या सुरेख पर्सेस तयार केल्या. आहे की नाही कमालीचा व्यवसाय! इतकंच नाही तर जोडीला मेण बनवणं, मधुमक्षिकापालन या गोष्टीही या समाजापर्यंत पोहोचवल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी अनेक कौशल्यं आत्मसात केली व त्यांच्या हाती चार पैसे येऊ लागले. कुटुंबातील कमवता हात म्हणून त्यांची मान अभिमानाने ताठ झाली. आज या शहराचा कायापालट झाला आहे तो फक्त सेसे यांच्या दूरदृष्टीमुळे. खरोखरीच अनेक पुरस्कार पटकवणाऱ्या सेसे सामाजिक बदलाच्या प्रवर्तक ठरल्या आहेत.
कचऱ्यातून थांबली शाळागळती
युगांडातील कंपाला येथे एका उद्यमी तरुणाने मुलींच्या शाळागळतीच्या समस्येवर शोधलेलं कचऱ्याचं उत्तर केवळ लाजवाब आहे. शासकीय आकडेवारीनुसार, युगांडामधील दर दहापैकी एक किशोरवयीन मुलगी मासिक पाळी सुरू झाली की शाळेकडे पाठ फिरवीत होती, आधी शाळेत न जाणं, आणि पाठोपाठ तर शाळेला कायमचा रामराम. यामुळे कितीही शैक्षणिक तरतुदी केल्या तरी परिणाम शून्य अशी स्थिती होती. रिचर्ड बबाले एमबीएधारक सामाजिक उद्योजक याने यावर शक्कल लढवली व कनिष्ठ वर्गातील मुली-महिलाही विकत घेऊ शकतील असे सॅनिटरी पॅड्स विकसित केले. तेही केळीच्या बुंध्यांपासून तयार होणाऱ्या दोऱ्यासारख्या भागापासून. या टाकाऊ भागापासून जाडसर कागदाच्या स्वरूपाचा कागद तयार करून तो द्रव शोषून घेऊ शकेल असं तंत्रज्ञान विकसित केलं व ‘बन्ना पॅड्स’ तयार झाले. कमीत कमी खर्चात, शिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पॅड्समुळे नवी आर्थिक चळवळ या भागात उभी ठाकली. विशेष म्हणजे हा सर्व महिलांनी, महिलांसाठी, महिलांकरिता उभारलेला प्रकल्प ठरला आहे. यामुळे हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे. युगांडामध्ये दरवर्षी साडेसोळा कोटी टन केळी पिकतात, त्यांपैकी ३ कोटी टन केळीचे बुंधे खत म्हणून वापरता यावेत म्हणून सडण्यासाठी ठेवले जातात. त्यापासून हे पॅड तयार केले जातात. मुख्य म्हणजे यामुळे महिलांच्या हाती पैसे तर आलेच, पण पॅड्सचा वापर करण्याची मानसिकता रुजली आहे. पॅड्सच्या निर्मितीपासून त्याची विक्रीपर्यंतची सर्व साखळी महिलाच सक्षमपणे सांभाळतात. पॅड्सचा सहज वापर करता येण्याने १० ते १९ वयोगटातील सुमारे साडेतीन हजार मुलींना शिक्षणाच्या प्रवाहातून तुटण्यापासून वाचवता आलं आहे.
गरज आणि शोधाची योग्य ती सांगड घालण्याचा हा झाला उत्तम नमुना. महत्त्वाचं म्हणजे विकसनशील देशांत अविघटनशील कचऱ्यामध्ये सॅनिटरी पॅड्समुळे जी भर पडतेय ती या उपक्रमामुळे रोखली जाणार आहे. शिवाय महिलांना स्वावलंबी करणारी आदर्श व्यवस्थाही साकारली आहे.
या उदाहरणांमधून हेच अधोरेखित होतं आहे की, कचरा म्हणजे घाण, दरुगधी किंवा किळसवाणं काही हा समज आता बुरसटलेला झाला आहे. कचऱ्यातून नवनिर्मितीची, उद्यमशीलतेची वाट धुंडाळणं हा नवा अध्याय आता लिहिला जातोय.
कचरा उद्योगाचा ‘स्वच्छ’ मार्ग
कागद-कचऱ्यातून अतिश्रीमंत बनलेली ‘चीनची कचरा क्वीन’ झांग यीन, कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ‘इको पोस्ट’ची निर्मिती करून बेरोजगारी थोपवणारी केनियाची लोर्ना रुट्टो, कचरा उचलण्यासाठी लोकांकडूनच पैसे वसुली करणारी लिबेरियातील कोफा, प्लास्टिकवर प्रक्रिया करून कोटय़वधींचा उद्योग उभारून सामाजिक बदलाची प्रवर्तक ठरलेली आफ्रिकेच्या गांबियातील इसाटाऊ सेसे ही आहेत फक्त काही नावं.
आणखी वाचा
First published on: 07-06-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zhang yin clean way of garbage business