एक प्रकारचा समर स्क्वॅश म्हणून ओळखली जाणारी झुकिनी हिरव्या-पिवळ्या रंगाची असते, काकडी आणि दुधी यांचं मिश्रण म्हणा ना! झुकिनी आपण सालासकट खाऊ शकतो, पटकन शिजणारी, कसलाही उग्र वास नसलेली झुकिनी थाई, मेक्सिकन, मेडिटेरिनिअन पदार्थात म्हणजे सूप, सॅलड, पास्ता यात तर वापरतातच शिवाय ब्रेड, गोड पदार्थ आणि मफिन्समध्येही वापरतात. पचायला हलकी असून शरीराला उपयुक्त असं फॉलेट, पोटॅशियम आणि जीवनसत्त्व ‘अ’ झुकिनीत असतं. याशिवाय कॉपर, मॅग्नेशियम आणि फायबर असूनही लो कॅलरी फूड म्हणून ओळखलं जातं. १०० ग्रॅम झुकिनीत फक्त १७ कॅलरीज असतात
झुकिनीचे काप
साहित्य : झुकिनीचे १५-२० काप, अर्धी वाटी बेसन, १ मोठा चमचा बारीक रवा, १ चमचा चाट मसाला, अर्धा चमचा ओवा, चवीला मीठ, तिखट, तेल.
कृती : बेसन, तिखट, मीठ, चाट मसाला, ओवा एकत्र करावं. झुकिनीच्या कापाना दोन्ही बाजूंनी काटय़ाने टोचे मारावेत आणि काप पिठात उलटसुलट घोळवावे, तव्यावर तेल टाकून काप दोन्ही बाजूंनी खरपूस होऊ द्यावे.
काप पिठात घोळवल्यानंतर ते ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवावेत म्हणजे कुरकुरीत होतात.
वसुंधरा पर्वते