एक दिवस कल्याणला समर्थानी सर्व लेखनसामग्री घेण्यास सांगितली, आज कुठे जायचे ते कल्याणला कळेना. समर्थाना डोंगराच्या घळीत जायला फार आवडत असे हे त्याला ठाऊक होते. गडावरील रामघळी-सारख्याच सह्य़ाद्रीच्या कोणत्याही घळीत जायला त्यांना आवडत असे, या वेळी त्यांनी जावळीच्या जंगलातील शिवथर घळीत राहायचे ठरवले होते, दरमजल करीत समर्थ व कल्याण शिवथर घळीत आले. आजूबाजूला सह्य़ाद्री पर्वताचे मोठे कडे, त्यावरून वाहणारा मोठा धबधबा, आजूबाजूला दाट हिरवीगार वनराई, रात्री श्वापदांचा व रातकिडय़ांचा आवाज, १२५ फूट लांब ७५ फूट रुंद अशा त्या घळीत, दोघे जण पाठीत वाकून आत गेले. आत गेल्यानंतर समर्थानी गणपतीची स्थापना करून त्याची पूजा केली आणि कल्याणाला लेखन साहित्य काढायला सांगितले. कल्याणाने विचारले, आपण कोणता ग्रंथ सांगणार आहात? स्वामी म्हणाले, ‘ग्रंथ नाम दासबोध, गुरू शिष्यांचा संवाद, येथे बोलीला विशद, भक्तिमार्ग..’ कल्याण आपल्या वळणदार अक्षराने स्वामी जे सांगतील ते लिहीत होता. मनोमनी नवल करीत होता. समर्थानी जीवन कसे जगावे याचे किती चांगले मार्गदर्शन यात केले आहे. जो ग्रंथ वाचेल, त्याचे मनन करेल त्याला जीवनातल्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळेल. सर्व साधुसंतांनी भक्ती मार्गाविषयी माया अविद्या प्रकृती पुरुष याबद्दल लिहिले, पण समर्थाचे वेगळेपण असे की त्यांनी आधी प्रपंच नीट करायला सांगितले.
‘आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो..’ या बरोबरच कुविद्या म्हणजे काय, तमो गुण, मूर्ख लक्षणे, पढतमूर्ख नेता, उत्तम पुरुष लक्षणे, युगधर्म, चातुर्य, राजकारण हे सर्व त्यांनी विस्तारपूर्वक सांगितले. समर्थाची भाषा सोपी परंतु कडक आहे याचा त्याला अनुभव येत होता. आपल्या गुरूवर प्राणापलीकडे प्रेम करणाऱ्या कल्याणस्वामींनी समर्थाची आरती लिहिली.
‘ओवाळा ओवाळा श्रीगुरू रामदासा राणा, सद्गुरू रामदास राणा, पंचही प्राणांचा दीप लाविला जाणा..’
माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com