ज्ञानेश्वरीत दुसऱ्या अध्यायात कर्म योगाबद्दल सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘देखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदि पुरुषी अर्पिजे’, अर्थात आपल्याकडून जे कार्य होते ते ईश्वराला अर्पण करावे, तसे केले की ते काम परिपूर्ण होते. खरोखर समाजात अशी काही माणसं असतात, ती दुसऱ्याला आपलं जीवन समर्पित करतात. त्यांचं कार्य शब्दात सांगता येत नाही तिथे शब्द देखील स्तब्ध होतात.
बाल शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या आशाताई गवाणकर अशाच एक कर्मयोगिनी होत्या. बालशिक्षणाचं महत्त्व त्या जाणून होत्या. घरोघरी जाऊन बालशिक्षणाचं महत्त्व त्या सांगत असत. त्यांच्या अथक प्रयत्नातून १९५० मध्ये अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाची प्राथमिक शाळा एका भाडय़ाच्या जागेत सुरूझाली. संस्थापिका मुख्याध्यापिका असलेल्या आशाताईंना शाळेची स्वत:ची इमारत असावी असे वाटे. पाहता पाहता शाळेची भव्य इमारत उभी राहात असतानाच बाईंचं निवृत्तीचं वय येऊन ठेपलं आणि शाळेत अडकलेलं आपलं मन त्यांनी अलगद काढून घेतलं. त्यांच्या निरोप समारंभात आपलं मनोगत त्यांनी कवितेत सांगितलं. बाई, एक उत्कृष्ट साहित्यिक आणि कवयित्री होत्याच. कवितेचं शीर्षक आहे, ‘पण परतायचंच कशाला?’
आता या क्षणाला पोचले आहे मी पैलतीराला,
आता परतायचं म्हटलं, तरी परतता येईल का कोणाला?
पण परतायचं कशाला? ऐलतीरावरचे ते हिरवे झुले, इथूनच दिसताहेत मला,
एकेका झुल्यावर एक एक हसरे बाळ,
घेत आहे झोका,
वाजताहेत चाळ, याचेच तर होते मला खूळ, सांगून ठेवले आहे मी तुम्हाला
आणि निश्चिंत मनाने परतले आहे मी पैलतीराला,
आता परतायचं म्हटलं, तरी परतता येईल का कोणाला, पण परतायचाच कशाला?
शेवटी त्या म्हणतात, स्वप्न घेत आहे आकार, स्वप्न होत आहे साकार, आता कोणत्याही क्षणी थांबला, म्हणून काय झाले, जीवन वीणेचा झंकार? आपलं कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पण करणाऱ्या आशाताईंनी, आपल्या कामाचे श्रेय स्वत:कडे कधीही घेतलं नाही.
माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com