राज्यातील विविध कारागृहांमध्ये २९ हजार कैदी आहेत. येरवडा कारागृहाची क्षमता दोन हजार कैद्यांची आहे. प्रत्यक्षात येरवडा कारागृहात चार हजार कैदी आहेत. राज्यातील सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. कारागृहातील कैद्यांची वाढती संख्या पाहता त्याचा ताण कारागृहातील सुविधांवर पडत आहेत

कारागृहातील कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. साहजिकच त्याचा ताण कारागृहाच्या पायाभूत सुविधांवर पडतो. बराकीत दाटीवाटीने कैदी राहत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठे कारागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सार्वजानिक बांधकाम विभागाकडून दुमजली बराक बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी एका बराकीचे काम अंतिम टप्यात आले आहे. गंभीर गुन्ह्य़ात पकडल्या जाणाऱ्या आरोपींना न्यायाधीन बंदी संबोधिले जाते. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येते. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात येते. गंभीर गुन्ह्य़ात शिक्षा भोगणारे कैदी आणि न्यायाधीन बंद्यांच्या वाढत्या संख्येचा ताण कारागृहाच्या कार्यक्षमतेवर होतो. कैद्यांच्या वाढत्या संख्येचा तुलनेत कारागृहातील सुविधा अपुऱ्या पडतात. त्यामुळे येरवडा कारागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार दुमजली बराकी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत दुमजली बराकी कैद्यांसाठी खुल्या करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील अन्य कारागृहात दुमजली बराकी आहेत. येरवडय़ात पहिल्यांदाच दुमजली बराक बांधण्यात येणार आहे. कारागृहाच्या आवारातील टिळक यार्डाच्या परिसरात दुमजली बराक बांधण्यात आली आहे. राज्य शासनाने दोनशे कैद्यांसाठी नवीन बराक बांधण्यासाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येक बराकीत पन्नास कैदी राहू शकतील. दुमजली बराकीत तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी पंचवीस कैदी राहू शकतील. त्यांच्यासाठी स्नानगृहे आणि स्वच्छतागृहाची सोय बराकीत करण्यात आली आहे.  उर्वरित बराकींचे काम येत्या काही महिन्यांत सुरू करण्यात येईल.

ब्रिटीशकालीन येरवडा कारागृह हे दक्षिण आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारागृह आहे. येरवडा कारागृहाचा परिसर ५१२ एकर आहे. राज्यातील अन्य कारागृहांच्या तुलनेत येरवडा कारागृहात कैद्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. कारागृहाची शेती आहे. तसेच मुद्रणालय आहे. कैद्यांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम कारागृहाच्या आवारात नियमित राबविले जातात. कारागृहातील सुरक्षाव्यवस्था बळकट आहे. कारागृहाच्या आवारात दोन वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कारागृहाचे आवार विस्तीर्ण आहे. त्यामुळे रात्री तेथे गस्त घालण्यासाठी श्वान घेण्याचा विचार आहे. कारागृह प्रशासनाकडून हा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

सुरक्षाव्यवस्थेला गालबोट

येरवडा कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेला गालबोट लागण्याच्या घटना घडल्या आहेत. येरवडा कारागृहाच्या आवारात अंडा बराक आहे. अंडाकृती बराकीत टोळी युद्धातील गुंड, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्यांना ठेवले जाते. जून २०१२ मध्ये गुंड शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार अलोक भालेराव यांनी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये गुंतलेल्या कतिल सिद्धीकी याचा अंडा सेलमध्ये पायजमाच्या नाडीने गळा आवळून खून केला होता. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या अंडासेलमध्ये इंडियन मुजाहिदीनच्या संशयित दहशतवाद्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात अंडासेलमधून टोळीयुद्धातील गुंडांनी भ्रमणध्वनीचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. मोहोळ टोळीतील गुंड मुन्ना शेखने भ्रमणध्वनीचा वापर करुन त्याच्या कुटुंबीयांशी तसेच वकिलांशी संपर्क साधल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी टोळीयुद्धातील गुंडांकडे भ्रमणध्वनी पोहचविण्यात कारागृह रक्षकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयातून कारागृहात परतणाऱ्या कैद्यांनी कारागृहात अमली पदार्थ नेल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. येरवडा कारागृहाची सुरक्षाव्यवस्था भेदून काही वर्षांपूर्वी दोन कैदी पहाटे पसार झाल्याची घटना घडली होती.
राहुल खळदकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader