सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत मजूर वर्गाचे तसंच हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं त्वरित ७ हजार ५०० रूपये देण्याची मागणी केली. अनेक वैद्यकीय कर्मचारी कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय काम करत आहेत. आपण या सर्व करोना वॉरिअर्सना सलाम केला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत. आर्थिक कामे रखडली असताना बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान ७ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत देणे आववश्यक आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी टेस्टिंग किट्सवरही निशाणा साधला. पीपीई किट्सची कमतरता आणि त्यांच्या गुणवत्तेबाबत सोनिया गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सध्या करोनाच्या होणाऱ्या चाचण्यांची संख्या खुप कमी आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही आरोप केले. करोनाशी लढताना चाचण्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीतही चाचण्या कमी होत आहेत. तसंच पीपीई किट्सची गुणवत्ताही योग्य नाही. आम्ही अनेक सूचना केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांनाही समस्या

यावेळी सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं त्या म्हणाल्या. खरेदीच्या अस्पष्ट धोरणांमुळे वितरण व्यवस्थेवर आलेल्या ताणामुळे शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या पाहिजे, तसंच खरीपाच्या पिकांसाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

मजुरांना अन्नधान्य पुरवा

लॉकडाउनमुळे अनेक मजूर अडकून पडले आहेत. तसंच बेरोजगारीमुळे अनेकांना आपल्या घराकडे परतायचं आहे. ते सध्या एका कठिण परिस्थितीतून जात आहेत. यादरम्यान त्यांना अन्नधान्य पुरवणं तसंच आर्थिक मदत करणं आवश्यक आहे. करोनाचा प्रसार असो किंवा त्याचा वेग गेल्या तीन आठवड्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.