लॉकडाउनच्या पाचव्या टप्याच्या सुरूवातीलाच २०० नव्या रेल्वे गाड्या धावनार आहेत. यापूर्वी १२ मे पासून राजधानी एक्स्प्रेससारख्या ३० रेल्वे धावत होत्या. आता एक जूनपासून एकूण २३० रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या सर्व रेल्वे मेल आणि एक्स्परेस आहेत. या रेल्वेंना वेळापत्रकानुसार चालवले जाणार आहे. या सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. देशभरातून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये महाराष्ट्रातून सुटणाऱ्या गाडय़ांचाही समावेश आहे. या गाडय़ांचे आरक्षण आधी ३० दिवस अगोदर करण्याची अट होती. परंतु त्यात बदल करुन १२० दिवस आधी करण्याचा निर्णय घेतला.

१ ते ३० जून दरम्यान २६ लाख प्रवाशांनी या गाडय़ांचे आगाऊ आरक्षण केले आहे. या कालावधीत तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर रेल्वेने जारी केलेल्या सुचना आणि नियम माहित असणे गरजेचं आहे. कारण करोना व्हायरस मुळे रेल्वेने अनेक नियमांत बदल केला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यासाठी घरातून निघण्यापूर्वीच सर्व तयारी करा. जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

– स्टेशनमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळी द्वारे

– कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे.

– प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक

– प्रवासासाठी ९० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक

– प्रवाशांचे स्थानकात प्रवेश देण्याआधी थर्मल स्क्रि निंगद्वारे तपासणीही होईल. तपासात करोनाची लक्षणे आढळ्यास प्रवास करता येणार नाही. असे झाल्यास प्रवासाचे भाडे माघारी केलं जाईल.

– प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक

– चादर, ब्लॅंकेट आणि टॉवेल मिळणार नाही. घरूनच घेऊन यावं लागेल.

– प्रवाशांनाच जेवण आणि पाण्याच्या बाटलीची सोय करावी लागणार. काही स्थानकात IRCTC पैसे घेऊन जेवणाची सोय करेल. मिळणारे जेवण आणि पाणी सीलबंद असेल.

– प्रवास पूर्ण झाल्यानंतर स्थानकात पोहचल्यानंतर प्रवाशाला आरोग्य नियमाचे पालन करावे लागेल. जे तेथील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने तयार केले असतील. स्टेशनपासून घरापर्यंत पोहचण्याची व्यवस्था राज्य सरकार करेल. जर एखाद्याला क्वारंटाइन सेंटरला पाठवायचे असल्यास तेही राज्य सरकार ठरवेल.