भारतात गेल्या २४ तासांत करोना संसर्गाची एका दिवसातील सर्वाधिक, म्हणजे सुमारे १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता चार लाख ९० हजार ४०१  इतकी झाली आहे. तर दुसरीकडे देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. दरम्यान, मृतांची संख्याही १५ हजारांच्या पुढे पोहचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

करोना संसर्गाच्या दैनंदिन वाढीचा विचार करता, आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे १७ हजार २९६ नवीन रुग्ण आढळून आल्याने आजवरची एकूण संख्या ४,९०,४०१ इतकी झाली. तर करोनामुळे दिवसभरात ४०७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या १५ हजार ३०१ इतकी झाली आहे. करोनाबाधितांची संख्या १४ हजारांहून अधिक वाढण्याचा हा सलग सातवा दिवस होता. २० जून रोजी १४ हजार ५१६, २१ जून रोजी १५ हजार ४१३, २२ जून रोजी १४ हजार ८२१, २३ जून रोजी १४ हजार ९३३, तर २४ जून रोजी रुग्णांच्या संख्येत १५ हजार ९६८ रूग्णांची वाढ झाली. याचाच अर्थ, करोना संसर्गाच्या प्रकरणांत २० जूनपासून एक लाख रुग्णांची भर पडली असून, १ जूनपासून रुग्णसंख्या २.८२ लाखांहून अधिक वाढली आहे.

तथापि, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून ते ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या एक लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर दोन लाख ८५ हजार ६३७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे.