करोनाची तिसरी लाटही ओसरली असून ९५.४० टक्के रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. करोना मुक्त होण्याचे प्रमाण हे उपचाराधीन रुग्णांच्या ३० पटीने जास्त आहे. सध्या ३ लाख १३ हजार ८३१ रुग्ण करोनाबाधित असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ३.१४ टक्के इतकेच आहे. बाधित रुग्ण आणि करोनामुक्त रुग्ण यांच्यातील तफावत दिवसेंदिवस वाढत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधोरेखित केले आहे.
आतापर्यंत ९२ लाख ६ हजार ९९६ रुग्ण करोना मुक्त झाले असून हे प्रमाण ९५.४० टक्के आहे. सर्वाधिक करोनामुक्त होणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक बराच वरचा आहे.
गेल्या २४ तासांत २२ हजार ८९० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३१ हजार ८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
देशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळपास ५२ टक्के इतके आहे. दररोज करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही घट झाली असून गेले १३ दिवस बळींची संख्या ५०० हून कमी आहे.