अदानी समुहाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये अध्यक्ष गौतम अदानी यांनी कंपनीच्या भागिदारांना संबोधित करताना करोना कालावधीमध्ये देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी लढलेल्या करोना योद्ध्यांचे आभार मानले. इतकच नाही तर त्यांनी कंपनीने पैशांच्या रुपाने योगदान दिलं असलं तरी करोना योद्ध्यांनी खासगी आयुष्यामध्ये करोना कालावधीत केलेल्या त्यागासमोर ही देणगी काहीच नसल्याचंही म्हटलं आहे. तसेच पीएम केअर्समध्ये दिलेला निधी हा करोनाविरुद्धच्या लढ्यात लढताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या वैयक्तिक त्यागासमोर फारच कमी असल्याचंही गौतम अदानी म्हणाले आहेत.

भारतावर टीका होत असल्याचं दिसून आलं…

करोनामुळे आपल्यापैकी सर्वांचेच मागील वर्ष हे अत्यंत कठीण गेलं. या महामारीने दिलेले घाव पूर्णपणे भरून येण्यासाठी काही दशकांचा कालावधी लागेल. जगभरामध्ये करोनाचे १९ कोटी रुग्ण आढळून आले असून ही साथ जगासमोरील सर्वात मोठं आव्हान असल्याचं गौतम अदानी म्हणाले. आतापर्यंत करोनाने ४० लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला असून कोणताही खंड, कोणताही देश आणि कोणताही समाज या महामारीच्या तडाख्यामधून सुटलेला नसल्याचं गौतम अदानी म्हणाले. झालेला प्रत्येक मृत्यू हा शोकांतिकाच आहे. तरीही एक देश म्हणून आपण चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये लसीकरणासंदर्भात आपल्या देशावर टीका झाल्याचं पहायला मिळालं. एकीकडे विविध राष्ट्र आपल्या सर्व साधनसामुग्रीसहीत महामारीशी लढण्यात व्यस्त असतानाच भारतावर टीका होत असल्याचं दिसून आलं, असं गौतम अदानी म्हणाले.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

मनोबल तोडणाऱ्या टीकेला आपण बळी पडून चालणार नाही

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या आणि महानगरातील लोकसंख्येची घनता हे लक्षात घेता आपल्या समोरील आव्हाने ही अधिक कठीण आहेत. संपूर्ण  युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियामधील महत्वाच्या देशांच्या एकत्र लोकसंख्येपेक्षा आपली लोकसंख्या ही अधिक आहे. त्यामुळे आपले लसीकरणाचे लक्ष्य हे ८७ देशांपेक्षा अधिक असल्याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सम्पूर्ण जगात ३२० कोटी लसीच्या डोसची गरज आहे, फक्त एकट्या भारताची गरज ही ३५ कोटी डोस इतकी आहे. भारताच्या लसीकरण कामगिरीसंदर्भातील काही टीका जरी योग्य असली तरी आपल्या पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांनी आणि आरोग्य सेवकांनी जो मोठा त्याग केला आहे तो लक्षात घेता त्यांचे मनोबल तोडणाऱ्या टीकेला आपण बळी पडून चालणार नाही, असं गौतम अदानी म्हणाले. करोना लढ्यातील सर्व सर्व फ्रंटलाईन वर्कर्स हे आपले प्रेरणास्थान आहेत, असंही गौतम अदानी यांनी सांगितलं.

देशाला केलेली मदत आकडेवारीत मोजणं चुकीचं

जे आम्ही कॉर्पोरेट्स करतो त्याप्रमाणे देशाची मदत करताना ती आकड्यात मोजणं हे सर्वस्वी चुकीचे आहे. देशाच्या मदतीला धावून जाणे म्हणजे त्या प्रत्येक नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, ज्याच्यापर्यंत आपण पोहचू शकतो आणि आपल्या प्रत्येक कृतीतून देश पहिला हे दाखवून देणे गरजेचे असते. या आदर्शाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, ज्यांनी आपल्या  वागण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून सेवा परमो धर्मचा खरा अर्थ आपल्याला दाखवून दिला. आपले प्रथम कर्तव्य हे मानवजातीची सेवा करणे हे आहे, असंही गौतम अदानी म्हणाले.

नक्की वाचा >> “…अदानींसोबत हवेत उडणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत”; मोदींचा फोटो शेअर करत नेत्याची टीका

भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याचं कौतुक

अदानी समूहाने जगभरातून महत्वपूर्ण असा द्रवरूप ऑक्सिजन, क्रायोजेनिक टँक्स आणि ऑक्सिजन सिलेंडर्ससारख्या अत्यावश्यक गोष्टी देशात आणण्यासाठी आपले योगदान दिले परंतू आमच्या या योगदानापेक्षा भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे योगदान हे अधिक महत्वपूर्ण आहे. त्यांनी ही सामुग्री देशात आणण्यासाठी जगभर असंख्य उड्डाणे केल्याचं गौतम अदानींनी सांगितलं.

आम्ही पीएम केअर्समध्ये मदत केली पण…

आम्ही पीएम केअर्स फंडमध्ये आमचे योगदान दिले असले तरी पैशापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे तो वैयक्तिक त्याग. वैयक्तिक त्याग पैशात मोजता येऊ शकत नाही. सामान्य भारतीयांनी रस्त्यावरच्या अशा असंख्य लोकांना मदत केली कि ज्यांना ते आयुष्यात परत कधीही भेटणार नव्हते. हे खरोखर प्रेरणादायी आहे, असं मत गौतम अदानींनी व्यक्त केलं.

त्यांनी जिवावर उदार होऊन देशवासियांची सेवा केली

अदानी समूहाने देशाला लॉजिस्टिक सपोर्ट दिला आणि हवाई, जल, रस्ते आणि रेल्वे मार्गाने अत्यंत महत्वाच्या अशा आरोग्य यंत्रणांसाठी लागणारी हजारो टन साधनसामुग्रीची ने-आण केली. त्या कालावधीमध्ये या सामुग्रीची तातडीची गरज असल्याने आम्ही ही मदत केली. परंतु आमची हि कामगिरी त्या हजारो डॉक्टर्स आणि नर्सेसच्या कामगिरी समोर काहीच नाही ज्यांनी जिवावर उदार होऊन देशवासियांची सेवा केली. वैयक्तिक त्यागाची आणि मानवतेचे दर्शन घडवणारी असंख्य उदाहरणे आपण या काळात पहिली, ज्याच्या पुढे नतमस्तक व्हावेसे वाटते आणि या सर्व काळात अदानी फौंडेशनने आपल्या उपलब्ध यंत्रणेसहीत तज्ज्ञांच्या मदतीने ऑक्सिजनचे वितरण आणि रुग्णांची काळजी घेण्याचं काम केलं, असंही गौतम अदानी म्हणाले.

नक्की वाचा >> अदानी समूहाच्या बंदर उद्योगातील नफ्यात १६ टक्क्यांनी वाढ; तीन महिन्यात १५७३ कोटींचा नफा

अदानी विद्या मंदिरचे कोव्हिड सेंटर केलं

वैयक्तिक त्यागाचं उदाहरण देताना गौतम अदानी यांनी अगदी थोड्या कालावधीमध्ये, आमच्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय चमूने अहमदाबादमधील अदानी विद्या मंदिरचे रुपांतर शेकडो खाटांच्या सुसज्ज अशा रुग्णालयात केले. या ठिकाणी ऑक्सिजन आणि शिजवलेले अन्न अशा अनेक सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. हे खरोखरच विद्यादानातून जीवनदान होते. आमच्या शाळेचे वर्ग हे जीवनदान देणारे वर्ग झाले. तसेच भूज आणि मुंद्रा येथील आमची रुग्णालये हि १००% कोव्हिड केअर रुग्णालये झाल्याचे गौतम अदानींनी सांगितले.

हे कर्मचाऱ्यांमुळे शक्य झालं…

अदानी समुहाला करोना काळात देशाची मदत करता आली याचं श्रेय गौतम अदानींनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलं आहे. “हे सर्व शक्य झाले ते हजारो ‘अदानीयनस’च्या प्रयत्नामुळे. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मदत करण्याचं हे पवित्र कार्य पूर्ण केले. या बाबत एक उदाहरणच द्यायचे झाले तर लॉजिस्टिक डिव्हिजनच्या कर्मचाऱ्यांनी शीत कपाटांमध्ये साठवलेल्या लसी देशभर पुरवण्यासाठी जे अंतर कापले ते दोन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्यावर जेवढे अंतर भरले असते तेवढे होते. मला या सर्वांचे मनापासून आभार मानावेसे वाटत आहेत आणि त्यांनी ही  कामगिरी केली किंवा अजूनही करत आहेत त्याचा मला अभिमान वाटत आहे,” असंही गौतम अदानी म्हणाले.

२०२२ मध्ये प्रत्यक्ष भेटू

कंपनीच्या भागिदारांची प्रत्यक्षात भेट घेण्याची इच्छा असली तरी करोना परिस्थितीमुळे ऑनलाइन माध्यमातून आपण संवाद साधत असल्याचं गौतम अदानी यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीस सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी २०२२ साली ही वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात होईल तेव्हा आपण नक्कीच हॅण्डशेक करुन एकमेकांना भेटू अशी इच्छा व्यक्त केली.