गुगल कंपनी आतापर्यंत ग्राहकांचे इमेल वाचून त्यानुसार जाहिरातीचे संदेश त्यांना पाठवण्याची व्यवस्था करीत होती पण हा व्यक्तिगततेचा भंग असल्याने यापुढे इमेल वाचून त्यानुसार व्यक्तिविशिष्ट जाहिराती पुरवण्याची पद्धत बंद करीत असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगलमधील इमेलमध्ये जी माहिती असते त्यावरून संबंधित व्यक्तीच्या काही आवडीनिवडी कळतात व त्यानुसार जाहिरातींचा मारा केला जातो तो आता यामुळे बंद होणार आहे.

शुक्रवारी एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून गुगलने ग्राहकांची व्यक्तिगतता जपणारी ही घोषणा केली. जी सूट या जीमेल सेवेत मात्र या आधीही व्यक्तिगत जाहिराती न पाठवण्याचा नियम पाळला जात होता. आता मोफत जीमेल वापरणाऱ्या ग्राहकांनाही व्यक्तिगत जाहिरातींचा त्रास होणार नाही. व्यक्तिगत इमेलचे स्कॅनिंग करून व्यक्तिगत जाहिराती पाठवण्याची पद्धत बंद करीत असल्याचे गुगलने म्हटले आहे. इतर गुगल उत्पादनांप्रमाणेच आता जीमेल अ‍ॅडसही नियम पाळणार आहे. असे असले तरी मोफत जीमेलमध्ये जाहिरातीचे संदेश येत राहतील. त्यासाठी गुगल इमेलमधून मिळवलेल्या माहितीचा वापर न करता यूटय़ूब व गुगल सर्चमधून लोकांची जी माहिती कळेल त्या आधारे जाहिरातींचा मारा केला जाईल, कारण इमेल बघून जाहिरातीचे संदेश पाठवल्यास त्यात कायदेशीर कारवाईचा धोका असतो. युजर्स सेटिंग्जवर आधारित जाहिराती सध्या आहेत. वापरकर्ते सेटिंग्ज बदलून जाहिराती बंद करू शकतात. जी सूट सेवा ही आधीच जाहिरातमुक्त आहे. गुगल त्याच्या स्थापनेपासूनच लोकांच्या इमेलमधील माहितीचा वापर जाहिरात संदेशांसाठी करीत होती. गुगल अजूनही अँटी स्पॅम, अँटी फिशींग, मालवेअर डिटेक्शन सेवांसाठी तुमच्या इमेलमध्ये डोकावणार आहेच, पण त्यात जाहिरातीचा हेतू नसेल. अँटी स्पॅम, अँटी फिशींग, स्मार्ट रिप्लाय या सोयींसाठी जीमेलला इमेलचे विश्लेषण करणे भाग आहे असे गुगलचे म्हणणे आहे.