शेवटचे अमेरिकन सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य असलेला देश घोषित केला आहे. २० वर्षे चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले आहे. शेवटच्या अमेरिकन विमानाने अफगाणिस्तान सोडल्यानंतर अफगाणिस्तान अधिकृतपणे अमेरिकन सैन्यापासून मुक्त आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे मुक्त झाला आहे आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे, असे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला आहे.

“अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ सोडले आहे आणि आपल्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे,” असे तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी सांगितले.

अमेरिकेने त्यांच्या अंतिम अंतिम मुदतीपूर्वी देश सोडला असल्याचे सांगितले आहे. अफगाणिस्तानात २० वर्षांच्या युद्धानंतर विजयाचा आनंद साजरा करताना तालिबान्यांनी फटाके फोडच आकाशात गोळीबार केला. तालिबान्यांनी शेवटचे अमेरिकन विमान सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीच्या आकाशात पाहिल्यानंतर त्यांच्या हवेत गोळीबार केला आणि फटाके उडवले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर भाष्य केलं. अमेरिकेची २० वर्षांपासून अफगाणिस्तानातील लष्करी उपस्थिती आता संपली आहे असे म्हटले. बायडेन यांनी आपल्या कमांडर्सचे आभार मानत आणखी अमेरिकन नागरिकांचे आणखी जीव जाऊ न देता अफगाणिस्तानातून बाहेर काढले असे म्हटले आहे.

१४ ऑगस्टपासून अमेरिकेने अफगाणिस्तानातून एकूण १,२३,००० लोकांना बाहेर काढले आहे. यामध्ये अमेरिकन नागरिक, अमेरिकीचे सहकारी मित्र आणि अफगाण नागरिक यांचा समावेश होता. ही अमेरिकेची सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहित होती. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी अफगाणिस्तानमध्ये आपली उपस्थिती न वाढवण्याच्या निर्णयावर लोकांना संबोधित करतील असे बायडेन यांनी म्हटले आहे.