देशामध्ये एकीकडे ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी व्हाइट फंगस म्हणजेच पांढऱ्या बुरशीसंदर्भातही इशारा देण्यात आला आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गाझीयाबादमध्ये यल्लो फंगसचाही पहिला रुग्ण आढळून आलाय. धक्कादायक बाब म्हणजे यल्लो फंगसचा संसर्ग हा ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. यल्लो फंगसच्या या पहिल्या रुग्णावर शहरातील कान नाक घसा तज्ज्ञ अशणाऱ्या ब्रिज पाल त्यागी यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याचं डीएनए या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

यल्लो फंगसच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सुस्ती येणे, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे ही प्राथमिक लक्षणं आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये जखमांमधून पू बाहेर येणे आणि जखमा भरण्यासाठी गरजेपेक्षा अधिक वेळ लागण्याच्या समस्या उद्भवतात. कधीकधी अवयव निकामी होणे, डोळ्यांचा आकार कमी होणे, डोळे कोरडे पडणे अशी लक्षणंही दिसून येतात. यल्लो फंगसची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे याचा संसर्ग झाल्याचं तातडीने कळत नाही. शरीराअंतर्गत याचा संसर्ग झाल्यानंतर हळूहळू लक्षणं दिसू लागतात. त्यामुळेच काहीही लक्षणं दिसली तरी तातडीने औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन हा सध्या यल्लो फंगसवरील एकमेव इलाज आहे. हे इंजेक्शन बुरशीसदृश्य आजारांवर दिलं जातं.

यल्लो फंगसचा संसर्ग होण्यामादील मूळ कारण म्हणजे अस्वच्छता. घरातील तसेच शारीरिक स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. घरामधील जुने आणि खाण्यास योग्य नसणारे अन्नपदार्थ आणि विष्ठा, मलमुत्र वेळोवेळी स्वच्छ करणे आणि घरात घाण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अस्वच्छतेमुळे घरामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला वाव मिळतो. घरामध्ये किती दमटपणा आहे यावरही यल्लो फंगसच्या संसर्ग होऊ शकतो की नाही याचा अंदाज बांधता येतो. घरात दमटपणा अधिक असेल तर बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला अधिक वाव मिळतो. घरामध्ये ३० ते ४० टक्के दमट वातावरण हवं. जास्त बाष्प असणाऱ्या वातावरणामध्ये राहण्यापेक्षा दमटपणा कमी असलेल्या वातारवणात राहणं आरोग्यासाठी अधिक फायद्याचं असतं.