वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजपाकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नातेवाईकांना खूश करणे, सत्तेत बसण्यासाठीची भाजपाकडून राजकारण सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून देण्यात आलेली नाना पटोले यांची उमेदवारी डमी असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असून यापुढील सर्व निवडणुका या वंचित आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आता आघाडी अशक्य असल्याचे दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील त्यांची उमेदवारी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.