अखलाखच्या कुटुंबाचा निर्धार
गोमांसाचा साठा करून त्याचे सेवन केल्याच्या अफवांमुळे मोहम्मद अखलाख याची दहा दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आलेली असली, तरी गेल्या पाच पिढय़ांपासून आपण राहत असलेले बिसरा गाव कायमचे सोडून जाण्याचा आपला विचार नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
दरम्यान, अफवा पसरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केली. तर अखलाखची हत्या ही एका विशिष्ट पक्षाच्या तीन लोकांनी केली असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी केला.
आमच्या कुटुंबीयांनी कुठेही स्थलांतर केलेले नसून तसे करण्याचा आमचा इरादाही नाही. आम्ही बिसरा गावातच आहोत, असे अखलाखचे मोठे भाऊ जमील यांनी या खेडय़ात वृत्तसंस्थेला सांगितले. मात्र गरज भासल्यास आम्ही २-४ महिन्यांसाठी कुठे तरी जाऊ शकतो असे तो म्हणाला.
या कुटुंबाला २४ तास पोलीस संरक्षण देण्यात आले असल्याचे गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी नागेंद्र प्रसाद सिंग यांनी सांगितले.
अखलाखचा मुलगा सरताज याने मंगळवारी रात्री त्याचे कुटुंब दिल्लीला हलवले असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता जमील म्हणाले की, कुटुंबीयांच्या काळजीपोटी तो काही गोष्टी म्हणतो आहे, परंतु याचा अर्थ तो माझ्या शब्दाबाहेर जाईल असे नाही.
इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा, दोषींना सजा मिळणे हे आमच्या कुटुंबासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे, असे या घटनेबाबत प्रसारमाध्यमांच्या सतत देखरेखीमुळे वैतागलेल्या जमील यांनी सांगितले. न्याय मिळावा हा आमचा एकमेव उद्देश असून केवळ प्रशासन व न्यायालय ते निश्चित करू शकतात, असे जमील म्हणाले.

‘दादरी घटना कारस्थान!’
एका ‘विशिष्ट पक्षाच्या’ तीन लोकांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप मुलायमसिंह यादव यांनी केला. दादरीची घटना हा पूर्वनियोजित कट होता. मला मिळालेल्या माहितीनुसार एका विशिष्ट पक्षाचे तीन जण त्यामागे आहेत. समाजवादी पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच बिसरा येथे जाणार असून त्यानंतर या तिघांची नावे तुम्हाला कळतील, असे यादव यांनी पत्रकारांना सांगितले.
एकदा ही नावे स्पष्ट झाली की आम्ही कुठलीही किंमत देऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करू, असे यादव यांनी सांगितले. एका ठरावीक समाजाच्या लोकांना दाबून टाकण्याचे हे कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही यादव म्हणाले.

दोघांना अटक
दरम्यान, या भागातील धार्मिक ऐक्य भंग करणाऱ्या अफवा कथितरीत्या समाजमाध्यमांवर पसरवल्याबद्दल दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला जेवाड येथून, तर दुसऱ्याला सूरजपूर येथून अटक करण्यात आल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाच्या सायबर विभागाने अफवाखोरांवर बारकाईने लक्ष ठेवले असून त्यांना अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.