नवी दिल्ली : अम्फोटेरिसिन- बी इंजेक्शनच्या ३० हजार १०० कुप्या केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी सोमवारी दिली. यापैकी सर्वाधिक कुप्या महाराष्ट्राला देण्यात आल्या आहेत.

अम्फोटेरिसिन- बी  हे इंजेक्शन काळी बुरशी किंवा म्युकरमायकोसिस नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोगावरील उपचारासाठी वापरले जाते. या रोगामुळे नाक, डोळे, नाकाला कवटीशी जोडणारी पोकळी (सायनस) व कधीकधी मेंदूचेही नुकसान करते.

अम्फोटेरिसिन- बी  च्या ३० हजार १०० अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना पुरवण्यात आल्या, असे ट्वीट गौडा यांनी केले.

नव्या साठय़ापैकी सर्वाधिक ५९०० कुप्या महाराष्ट्राला, तर ५६३० कुप्या गुजरातला देण्यात आल्या आहेत. आंध्रप्रदेश (१६००), मध्यप्रदेश (१९२०), तेलंगण (१२००), उत्तरप्रदेश (१७१०), राजस्थान (३६७०), कर्नाटक (१९३०), हरियाणा (१२००) या राज्यांनाही अतिरिक्त कुप्या मिळाल्या आहेत.