गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून एका तरुणीवर पाळत ठेवण्याचे प्रकरण गाजत असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती संरक्षण यंत्रणांकडून गोळा केली जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच, उपलब्ध झालेल्या माहितीवरून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करायची किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले.
आजवर राष्ट्रीय महिला आयोगासह कोणत्याही व्यक्तीकडून अथवा यंत्रणेकडून ‘पाळत’ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचे गृहमंत्री शिंदे यांनी सांगितले. संबंधित मुलीच्या वडिलांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊ नये अशीच आपल्या मुलीचीही इच्छा असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार किंवा कसे याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये उत्सुकता होती.
दरम्यान, कोणताही राजकीय पक्ष, स्वयंसेवी संघटना किंवा अन्य कोणी वैयक्तिकरीत्या येऊन याप्रकरणी काही सांगायचे ठरविले तर त्यांची दखल घेतली जाऊ नये, असे आवाहन सदर मुलीचे वडील प्राणलाल सोनी यांनी राष्ट्रीय तसेच गुजरात महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. राज्य सरकारने आपल्याला पुरविलेल्या सुरक्षेबद्दल आपली मुलगी पूर्णपणे सतर्क असून तिच्या खासगी आयुष्यावर कसलेही अतिक्रमण झालेले नाही, असेही सोनी यांनी स्पष्ट केले. आपल्या मुलीच्या खासगी आयुष्यासंबंधी चर्चा होऊ नये, अशी आपली इच्छा असून त्यामुळेच अन्य कोणाच्या म्हणण्याची महिला संघटनांनी दखल घेऊ नये, असे मत सोनी यांनी व्यक्त केले.