नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याचे अ‍ॅण्टिग्वातून अपहरण करण्यात आल्याच्या प्रकरणाचा अ‍ॅण्टिग्वा आणि बर्बुडातील पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असे अ‍ॅण्टिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

चोक्सीच्या वकिलांनी याबाबत तक्रार केली असून त्यामध्ये चोक्सीचे अ‍ॅण्टिग्वातून अपहरण करून त्याला शेजारी असलेल्या डॉमिनिकामध्ये नेण्यात आल्याचे म्हटले आहे.

या कथित अपहरणात हात असलेल्यांची नावे चोक्सीच्या वकिलांनी पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत दिली आहेत, असेही ब्राऊन यांनी सांगितल्याचे वृत्त अ‍ॅण्टिग्वा न्यूजने दिले आहे.

चोक्सी यास २३ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमाराला एका नौकेतून डॉमिनिकात आणण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते लेनॉक्स लिण्टन यांनी केल्याचे असोसिएट्स टाइम्सने म्हटले आहे. चोक्सी हा २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अ‍ॅण्टिग्वामध्येच होता, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला, त्यामुळे १२० मैलांचे अंतर केवळ चार-पाच तासांमध्ये गाठणे अशक्य असल्याचे असोसिएट्स टाइम्सने म्हटले आहे.

अ‍ॅण्टिग्वातून नौका रात्री १० वाजण्याच्या सुमाराला निघाली असल्याचे एका दस्तऐवजावरून स्पष्ट होत असले तरी चोक्सी याच्या घरातील नोकरांनी तो सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरातच असल्याचे म्हटले आहे. चोक्सी अ‍ॅण्टिग्वा आणि बर्बुडातून २३ मे रोजी  बेपत्ता झाला होता, तो आपल्या प्रेयसीसमवेत  डॉमिनिकामध्ये पसार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला शेजारच्या डॉमिनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले.