रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज (९ नोव्हेंबर) लागणार आहे. न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा, शांतता राखण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निकालानंतर सोशल मीडियातून आक्रमक आणि भडकाऊ टीका-टिप्पणी करणे टाळावे, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियातून टीकाटिपणी, पत्रकबाजी करणे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी ठरू शकते. यामुळे सोशल मीडियातून प्रतिक्रिया देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर नागरिकांनी सोशल मीडियात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

– जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.
– अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करु नका.
– निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये
– गुलाल उधळू नये
– फटाके वाजवू नयेत.
– मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.
– महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.
– निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये.
– कोणतंही वाद्य वाजवू नये.
– कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा पोस्ट करू नये
– अफवा पसरवू नये.

वरील सूचनांचे उल्लंघन करुन जातीय तणाव निर्माण केल्यास, भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता कलम आणि इतर कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

या कलमांअंतर्गत होऊ शकते कारवाई

कलम २९५ –  कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे
कलम २९५ (अ) –  कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे
कलम २९८ – धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे