१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यासाठीची मुदत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ३ महिन्यांनी वाढवली आणि या खटल्याचा निकाल ३१ ऑगस्टपूर्वी दिला जावा असे सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे या खटल्यात आरोपी आहेत.
या खटल्याच्या कार्यवाहीवर योग्य ते नियंत्रण ठेवावे, जेणेकरून या ठरलेल्या कालमर्यादेपलीकडे उशीर होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने विशेष न्यायाधीश एस.के. यादव यांना सांगितले. साक्षी नोंदवणे आणि खटल्याच्या कार्यवाहीदरम्यान करण्यात आलेल्या अर्जाची सुनावणी यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आदी सुविधांचा वापर करावा, असे सुचविण्यात आले.
राजकीयदृष्टय़ा संवेदनशील अशा या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला देण्यात आलेली मुदत वाढवावी, असे पत्र विशेष न्यायाधीशांनी पाठवले होते. त्यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करताना न्या. आर. एफ. नरिमन व सूर्य कांत यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.