बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) मेडिकल सायन्स विभागातील न्यूरॉलॉजिस्ट आणि त्यांच्या टीमने विशिष्ट वेबसाईट्स ब्लॉक करु शकणारे अॅप्लिकेशन तयार केले आहे. विद्यार्थ्यांना अश्लील वेबसाईट्स पाहता येऊ नयेत, या उद्देशाने या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपला ‘हर हर महादेव’ असे नाव देण्यात आले असून यामुळे इंटरनेटवरील अश्लील व्हिडिओ आणि इतर अश्लील गोष्टी ब्लॉक होतील. त्यामुळे विद्यार्थी या सर्व गोष्टींपासून दूर राहतील.
‘हर हर महादेव’ अॅप डाऊनलोड केल्यानंतर वापरकर्त्याने अश्लील साईटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला भजन आणि भक्तीगीते ऐकू येतील. बनारस हिंदू विद्यापीठातील न्यूरॉलॉजिस्ट आणि त्यांच्या टीमने या अॅपची निर्मिती केली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. ‘आम्ही विकसित केलेले अॅप वेबसाईट ब्लॉक करण्यात आणि इंटरनेट फिल्टरिंग करण्यात मदत करेल. त्यामुळे कोणतीही व्यक्ती आक्षेपार्ह वेबसाईट्स सुरु करु शकणार नाही. कधीकधी इंटरनेट वापरताना आपोआप आक्षेपार्ह वेबसाईट्स सुरु होतात. मात्र या अॅपच्या मदतीने हे टाळता येऊ शकेल,’ असे विद्यापीठाच्या न्यूरॉलॉजी विभागातील डॉक्टर विजय नाथ यांनी सांगितले.
हर हर महादेव अॅप्लिकेशनची निर्मिती सुरु करण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागल्याची माहिती नाथ यांनी दिली. ‘हे अॅप ३,८०० आक्षेपार्ह वेबसाईट्स ब्लॉक करण्यात सक्षम आहे. या अॅप्लिकेशनवर आम्ही काम सुरुच ठेवणार आहोत. कारण अश्लील वेबसाईट्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे,’ असेही ते म्हणाले. ‘या अॅपमुळे अश्लील वेबसाईट सुरु करण्याचा प्रयत्न केल्यास हिंदूंची धार्मिक गीते सुरु होतील. यामध्ये इतर धार्मिक गीतांचा समावेश करण्याचाही आमचा प्रयत्न असेल,’ असे त्यांनी सांगितले.