जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० बाबत भाजपने आपली भूमिका मवाळ केली आहे. ही विशेष तरतूद राज्याला फायदेशीर ठरली आहे काय यावर चर्चा करावी. लोकांचे मत जर त्याच्या बाजूने असेल तर हे कलम रद्द करण्याची आपली जुनी मागणी सोडून देण्याचे संकेत पक्षाने दिले.
  जम्मूमध्ये रविवारी भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘ललकार रॅली’चे आयोजन केले होते. या सभेत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही मोदींच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. प्रथमचे भाजपने कलम ३७०बाबत वेगळी भूमिका घेतली आहे. कलम ३७०बाबत काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. ‘‘देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम ३७० हे काळाच्या ओघात रद्द केले जाईल, असे म्हटले होते. काळाच्या ओघात काँग्रेसने नेहरूंच्या विधानापासून फारकत घेतली आहे काय, असा सवाल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना विचारू इच्छितो, असे मोदी म्हणाले. कलम ३७० हे फुटीरतावादाला चालना देते. विधीतज्ज्ञांनी यावर चर्चा करावी, असे मोदी यांनी सांगितले.
  जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांना देशाच्या इतर भागात मिळतात तसे अधिकार मिळत नसल्याचे या तरतुदींचा संदर्भ घेत मोदींनी ओमर अब्दुलांचे उदाहरण दिले. ओमर यांनी जर काश्मीरबाहेरील मुलीशी विवाह केला तर त्यांचे अधिकार कायम राहतात. मात्र त्यांची बहीण सारा यांना मात्र काश्मीरबाहेर विवाह केल्याने अधिकार गमवावे लागल्याचे मोदींनी सांगितले.