ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथील एका विद्यार्थिनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्कार केल्याचा तसंच एक वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी या प्रकरणात एका व्हिडीओचा समावेश झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक व्यक्ती निर्वस्त्र होऊन मसाज करुन घेत असल्याचं दिसत आहे. ही व्यक्ती स्वामी चिन्मयानंद असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळली जात आहे. हा व्हिडीओ चष्म्यात लावण्यात आलेल्या गुप्त कॅमेऱ्याच्या सहाय्याने रेकॉर्ड करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीकडे (एसआयटी) हा व्हिडीओ दिला आहे. एसआयटीने अद्याप व्हिडीओसंबंधी कोणतीही माहिती दिली नसता हा व्हिडीओ कितपत अधिकृत आहे आणि तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो का यावर चर्चा सुरु आहे. स्वामी चिन्मयानंद यांचे वकील ओम सिंह यांनी मात्र या व्हिडीओचा स्वामी चिन्मयानंद यांच्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या अशिलाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असून फॉरेन्सिक रिपोर्टच्या माध्यमातूनच त्याची अधिकृतता तपासली जाऊ शकते असं ओम सिंह यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपल्याकडे पीडित मुलगी आणि तिच्या काही मित्रांचा व्हिडीओ आहे, ज्यामध्ये स्वामी चिन्मयानंद यांची बदानामी करण्याचा कट आखला जात आहे असा दावा त्यांनी केला आहे.

ब्लॅकमेल केलं जात असल्याचा मुलीचा आरोप
आपल्यावर बलात्कार करताना चित्रफित काढत त्याच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात आल्याचा विद्यार्थिनीचा आरोप आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने दिल्ली पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात आपल्यावर चिन्मयानंद यांच्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. चिन्मयानंद यांचे अनेक आश्रम तसंच शैक्षणिक संस्था आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीसमोर (एसआयटी) पीडित मुलीने वारंवार आपल्या आरोपांची पुनरावृत्ती केली. एसआयटीने मुलीची जवळपास १५ तास चौकशी केली. यावेळी त्यांनी मुलीने सादर केलेले व्हिडीओचींदेखील पाहणी केली.

आपल्या १२ पानांच्या तक्रारीत पीडित मुलीने सांगितलं आहे की, गतवर्षी जून महिन्यात तिची चिन्मयानंद यांच्यासोबत प्रथम भेट झाली. चिन्मयानंद यांच्या शहाजहानपूर येथील कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी पीडित मुलगी गेली होती. चिन्मयानंद यांनी आपला फोन नंबर घेतला आणि प्रवेश मिळण्याची व्यवस्था केली. त्यांनी नंतर फोन करुन आपल्याला नोकरीची ऑफर दिली आणि पाच हजार पगार मिळेल सांगितलं. आपलं कुटुंब गरिब असल्या कारणाने आपण नोकरी स्विकारली असं मुलीने सांगितलं आहे.

आरोप करण्यात आल्यानुसार, चिन्मयानंद यांनी मुलीला ऑक्टोबर महिन्यात हॉस्टेलमध्ये येऊन राहण्यास सांगितलं. नंतर त्यांनी तिला आश्रममध्ये बोलावलं. यावेळी त्यांनी माझा आंघोळ करतानाचा व्हिडीओ दाखवत व्हारल करण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला असं मुलीने तक्रारीत सांगितलं आहे. यावेळी चिन्मयानंद यांनी बलात्कार करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं आणि त्याच्या आधारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. चिन्मयानंद यांचे सहकारी बंदुकीचा धाक दाखवत आपल्याला घेऊन जायचे असा मुलीचा आरोप आहे.

गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत हा प्रकार सुरु होता. पण नंतर मुलीने व्हिडीओलाच पुरावा करत चिन्मयानंद यांच्याविरोधात जाण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात मुलीने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला आणि पळून गेली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबाची तक्रार दाखल करुन घेतली. मात्र यावेळी एफआयआर दाखल केला गेला नाही. नंतर मुलगी राजस्थानमध्ये सापडली. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांनी तिला न्यायालयात हजर करण्यास सांगितलं. ३० सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

गेल्या आठवड्यात मुलीने दिल्लीमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली. आपल्याला उत्तर प्रदेश पोलिसांवर विश्वास नसल्याचं तिने सांगितलं आहे. आपल्याला तपासादरम्यान प्रश्नांची उत्तर देण्यात काही समस्या नाही, पण सर्वात आधी आरोपींना अटक झाली पाहिजे अशी मागणी मुलीने केली आहे. चिन्मयानंद यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.