चेन्नईमधील पर्यावरणवादी डॉ. अब्दुल घनी यांनी एक वृक्षसंवर्धनासाठी एक आगळावेगळा प्रयोग सुरु केला आहे. ‘ग्रीन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनी यांनी चक्क झाडांना प्रथमोपचार देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. खोड किंवा फांद्या तुटलेल्या तसेच कोणीही उपटून टाकलेल्या झाडांना पुन्हा उभं करण्याच्या दृष्टीने घनी यांनी ही मोहिम सुरु केली आहे.
जगभरातील हरित पट्टा कमी होत आहे. अनेक ठिकाणी बेसूमार वृक्षतोड होत असून त्याचा पर्यावरणावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी कारखाने, वसाहतींसाठी जंगलांची कत्तल केली जात आहे. या सर्वांमध्ये अनेक झाडे मारली जात असून अशा झाडांना जगण्याची दुसरी संधी देत ‘जखमी’ झालेल्या झाडांची काळजी घेत त्यांना प्रथमोचार पोहचवून त्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. २०२० पर्यंत संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात ही मोहिम पोहचवण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे घनी यांनी एनएनआयशी बोलताना सांगितले.
घनी यांनी एनएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘या रुग्णवाहिकेने ५ जूनपासून आपला प्रवास सुरु केला आहे. तामिळनाडूमधून निघालेली ही रुग्णवाहिका वृक्षसंवर्धनासंदर्भात जागृती करत करत पुढील दोन महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये पोहचणार आहे. या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणच्या शाळा तसेच कॉलेजसमध्ये वृक्षसंवर्धन आणि जंगलांचे महत्व मुलांना सांगणार आहे.’
Tree ambulance launched in Chennai, aims at planting uprooted trees& offer services like seed ball distribution,plant distribution,aiding tree plantation, shifting&survey of trees & removal of dead trees.Founder Abdul Ghani says, aim to implement it cross the country by year 2020 pic.twitter.com/18QIn2klaV
— ANI (@ANI) June 4, 2019
तामिळनाडूला मागील काही वर्षांमध्ये दोन मोठ्या चक्रीवादाळांचा फटका बसला आहे. यामध्ये २०१६ साली आलेल्या वरद आणि २०१८ साली आलेल्या गज या चक्रीवादळामुळे राज्यातील लाखो झाडे उन्मळून पडली. या वृक्ष रुग्णवाहिकेच्या मदतीने मुळं कमकूवत झालेल्या झाडांच्या मुळाशी मातीचा भर टाकून राज्यातील हरित पट्ट्याचे संवर्धन करण्याचे प्रयत्न घनी आणि त्यांच्या टीमने सुरु केले आहेत.
जखमी म्हणजेच फांदी किंवा खोडाला इजा झालेल्या झाडांची काळजी घेणे, बियाणांचे संवर्धन, सीड बँक, झाडांचे स्थलांतर करणे, वृक्ष वाटप अशी अनेक पद्धतीची कामे ही वृक्ष रुग्णवाहिका करणार आहे. नासाने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये भारत आणि चीन हे दोन्ही देश हरित पट्ट्याखालील क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. घनी आणि त्यांच्या टीमने सुरु केलेल्या या मोहिमेमुळे भारताच्या या प्रयत्नांना अधिक यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.