तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला करोना संसर्ग झाल्याने, २५ एप्रिल रोजी नवी दिल्लीमधील एम्स येथे दाखल करण्यात आले होते. मात्र आता तो बरा झाला असल्याने आज त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याने, त्याची पुन्हा एकदा तिहार तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.

२२ एप्रिल रोजी छोटा राजन कोरना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर त्याला २५ एप्रिल रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, तेव्हा छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन जिवंत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

छोटा राजन जिवंत आहे; ‘त्या’ वृत्तानंतर AIIMS च्या अधिकाऱ्यांचा खुलासा

तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असं आधी तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची करोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला. यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Story img Loader