“सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाचा पाकिस्तानही फायदा घेऊ शकतं. जर कोणतंही संकट आलं आणि पाकिस्ताननं त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी आम्ही तयार आहोत,” असं म्हणत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या पाकिस्तानसोबतच्या आर्थिक आणि सैन्य सहकार्यावर वरिष्ठ स्तरावर लक्ष देणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त पूर्वेकडेही संघर्षाची भीती वाढली आहे. त्यासाठी आपल्याला तयार राहायला हवं,” असंही ते म्हणाले.

“पाकिस्ताननं भारताविरोधात प्रॉक्सी वॉर सुरू केलं आहे. पंरंतु पाकिस्तानला त्यात यश मिळणार नाही. पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीशिवाय देशातील अन्य भागांमध्येही दहशतवाद पसवण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तरेकडील सीमेवर भारतासाठी पाकिस्तान उडचण निर्माण करू पाहत आहे. परंतु पाकिस्तानला यात यश मिळणार नाही आणि त्यांचं मोठं नुकसान होईल,” असंही रावत म्हणाले.

पाकिस्तान आणि चीननं एकत्र हल्ला केल्यास त्याचा सामना करण्यासाठी आम्ही रणनिती तयार केली आहे. भारतीय सशस्त्र दलांना कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आता तयार राहायला हवं आणि भविष्यासाठीही तयार राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले. आम्हाला शांतता हवी आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून चीननं आक्रमक पावलं उचलली आहेत. परंतु परिस्थिती सांभाळण्यास आम्ही सक्षम आहोत. तिन्ही दलं कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलं.