पूर्व लडाखमध्ये दादागिरी करणाऱ्या चीनची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लडाख सीमेजवळून चीनच्या फायटर विमानांनी उड्डाण केल्याचं समोर आलं आहे. पूर्व लडाखपासून ३० किलोमीटर अंतरापर्यंत ही फायटर विमानं आली होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

चीनने ल़डाखपासून जवळ असलेल्या आपल्या एअर बेसवर फायटर विमान तैनात केली आहेत. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक समोरा-समोर उभे आहेत. चिनी एअर फोर्सच्या प्रत्येक हालचालीकडे भारताचे अत्यंत बारीक लक्ष आहे.

पूर्व लडाखपासून जवळ असलेल्या होतान आणि गारगनसा या पीएलएच्या एअर फोर्स स्टेशनवर चीनने १० ते १२ फायटर विमान सज्ज ठेवली आहेत. “पर्व लडाखच्या सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर जे-७ आणि जे-११ या फायटर विमानांचे उड्डाण सुरु होते. सीमा रेषेपासून आवश्यक अंतर राखून या विमानांचे उड्डाण सुरु होते. पण आम्ही धोका पत्करु शकत नाही. काही मिनिटात ते आमच्या भागापर्यंत पोहोचू शकतात” असे सूत्रांनी सांगितले.

टेहळणी क्षमतेमधील सर्व त्रुटी भरुन काढण्यात आल्या आहेत. पूर्व लडाखमधील चिनी एअर बेसच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे असे गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर आणि चिनी हेलिकॉप्टर आकाशात परस्परांच्या जवळ आल्यानंतर भारताची फायटर विमाने लगेच आकाशात झेपावली होती.

उंचावरील युद्धासाठी चीनकडे टाइप १५ रणगाडा, Z-20 हेलिकॉप्टर, GJ-2 ड्रोन

लडाखमध्ये दादागिरी करणाऱ्या चीनने पर्वतरांगांमध्ये उंचावरील क्षेत्रात युद्ध लढण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. २०१७ साली डोकलाममध्ये झालेल्या संघर्षापासूनच चीनने उंचावरील युद्ध लढण्यासाठी विशेष शस्त्रास्त्रे सज्ज ठेवली आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

“२०१७ साली डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते. ७० पेक्षा जास्त दिवस हा संघर्ष सुरु होता. डोकलाम तणावानंतरच चिनी सैन्याने आपल्या ताफ्यात टाइप १५ टँक, झेड-20 हेलिकॉप्टर आणि जीजे-2 ड्रोन विमानांचा समावेश केला. उंचावरील क्षेत्रात युद्ध झाल्यास चीनला त्याचा फायदा होईल” असे ग्लोबल टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.