भारतात वेगाने करोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना करोनाचा एक नवा भारतीय उपप्रकार समोर आला असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, हा उपप्रकार भारतीय नसून यासंदर्भात करण्यात आलेले सर्व दावे हे निराधार आणि सत्यावर आधारित नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआयनं केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. “अनेक प्रसारमाध्यमांनी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) B.1.617 हा करोनाचा उपप्रकार जागतिक चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. पण काही माध्यमांनी हा उपप्रकार भारतीय असल्याचा दावा केला आहे. मात्र, माध्यमांमध्ये करण्यात आलेले हे दावे निराधार असून सत्याधारीत नाहीत”, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
WHO च्या पत्रकात ‘भारतीय’ उल्लेख नाहीच!
दरम्यान, ज्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कागदपत्रांच्या हवाल्याने B.1.617 हा करोनाचा उपप्रकार भारतीय असल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यात भारतीय या शब्दाचा उल्लेखच नसल्याचं सांगितलं आहे. “या उपप्रकाराविषयी जागतिक आरोग्य संघटनेनं ३२ पानी परिपत्रक काढलं आहे. पण यात कुठेही ‘भारतीय’ हा उल्लेख करण्यात आलेला नाही”, असं देखील कंद्र सरकारनं सांगितलं आहे.
This is to clarify that WHO has not associated the term “Indian Variant” with the B.1.617 variant of the coronavirus in its 32 page document. In fact, the word “Indian” has not been used in its report on the matter: Government of India
— ANI (@ANI) May 12, 2021
“…म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!” डॉ. फौचींनी सांगितलं कारण!
बी.१.६१७ विषाणू उपप्रकार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम महाराष्ट्रात सापडला होता. आता हा विषाणू २१ देशांत सापडला आहे. मात्र, हा विषाणूचा उपप्रकार भारतीय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलेलं नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. “करोना विषाणूचा नवा उपप्रकार WHO च्या ६ विभागांमधल्या ४४ देशांमध्ये आढळून आले आहेत. B.1.617 हा करोनाचा उपप्रकार गेल्या वर्षी भारतात सर्वप्रथम सापडला होता. त्याची वर्गवारी जागतिक चिंतेचा विषय म्हणून करण्यात आली होती”, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.