करोनामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही. करोनाचा फैलाव इतक्या झपाट्याने होत आहे की, दर दिवशी हजारो लोकांना करोनाची लागण होत आहे. आता करोनामुळे मृत्यूदरही वाढत चालल्याचं दिसत आहे. स्मशानात मृतदेहांवर अंतिमसंस्कार करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडत आहेत.

“शमशान और कब्रिस्तान दोनों… जो कहा सो किया|”, असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याचबरोबर मोदी मेड डिसास्टर हा हॅशटॅगही वापरला आहे. या ट्वीटनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कमेंट्समध्ये एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत.

शुक्रवारीही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. “केंद्र सरकार की कोविड रणनीति- स्टेज १- तुगलकी लॉकडाऊन लगाओ|, स्टेज २- घंटी बजाओ|, स्टेज ३- प्रभु के गुण गाओ | “, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर स्थलांतरित मजुरांच्या मुद्यावरून जोरदार टीका केली होती. “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे.” असं राहुल गांधी म्हणाले होते.