देशातील अनेक शहरात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या किंमतीची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. रोज एक मुद्द्यांवरून ते मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘महागाईचा विकास’ केल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी आपल्या ट्वीटमधून केली आहे.

“काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. पेट्रोल पंपावर बिल घेताना मोदी सरकारने केलेला महागाईचा विकास दिसणार आहे. कर वसुली, महामारीच्या लाटा येत आहेत”, असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

“पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही”

दरम्यान, डिझेल आणि पेट्रोलचे दर अद्याप कमी करता येणार नाहीत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले, गुजरात दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील का? असा प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांना केला असता. ते म्हणाले, “सरकारचे उत्पन्न बरेच कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान उत्पन्न कमी राहिले आणि २०२१-२२ मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे तेलाचे दर आता कमी करता येणार नाहीत”

दिवाळीपर्यंत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त

आजही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. दिल्लीत डिझेलच्या दरात २७ पैसे आणि पेट्रोलमध्ये २८ पैशांनी वाढ झाली आहे. एक दिवस आधी म्हणजेच ६ जून रोजीही पेट्रोलचे दर २७ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैसे वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल १०१.५२ रुपये आणि डिझेल ९३.९८ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.