काँग्रेसच्या संविधान बचाव रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रोखले. ही आपली संस्कृती नाही. आपण कोणाविरोधातही अशा घोषणा द्यायच्या नाहीत, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आणि त्यांनी पुन्हा घोषणा देऊ नये, अशी तंबी देखील दिली.

दिल्लीतील तालकटोरा मैदानात सोमवारी काँग्रेसतर्फे संविधान बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राहुल गांधी यांनी दलितांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेला सुरुवात करताच काँग्रेसच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोदी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. राहुल गांधींनी या अतिउत्साही कार्यकर्त्यांना तातडीने रोखले. ‘आपण काँग्रेसची लोकं आहेत. आपण कोणाविरोधात अशा अपशब्दांचा वापर करत नाही’, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाषणात राहुल गांधींनी मोदींवर टीका देखील केली. मोदींच्या मनात गरीब, महिला आणि दलितांसाठी जागा नाही. देशात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत, असे त्यांनी सांगितले. मोदींनी त्यांच्या खासदारांना खडे बोल सुनावले आहेत. भाजपाच्या खासदारांनी देखील बोलू नये, असे मोदींना वाटते. संसदेत मला १५ मिनिटे बोलण्याची संधी दिली तर मोदी माझ्यासमोर उभे देखील राहू शकणार नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

Story img Loader