एका अठरा वर्षीय मुलीच्या आंतरधर्मीय विवाहानंतर जम्मू आणि काश्मिरातील शीख समुदाय आक्रमक झाला आहे. मुलीचं जबरदस्ती धर्मांतर करून विवाह लावण्यात आला, असा आरोप शीख समुदायाने केला असून, सोमवारी श्रीनगर येथे आंदोलनही केलं. या प्रकरणी मुलीला श्रीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तिच्या आईवडिलांना न्यायालयात येण्याची परवानगी देण्यात आली नाही, असा आरोपही काही आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी केला आहे. या आंदोलनात काश्मिरबाहेरील शीख लोकही सहभागी झाले होते.
शीख समुदायातील एका अठरा वर्षीय मुलीचं या महिन्याच्या सुरुवातीला श्रीनगरमधील एका मुस्लिम मुलाशी लग्न झालं. त्या मुलीचा विवाह जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप करत कुटुंबियांसह शीख समुदाय आक्रमक झाला आहे. मुलीचं जबरदस्ती धर्मांतर करून लग्न करण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. शनिवारी जेव्हा मुलगी न्यायालयात होती, तेव्हा तिच्या आईवडिलांना न्यायालयात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे कुटुंबियासह इतरांनी न्यायालयाबाहेर निर्दर्शनं केली.
या आंदोलनात पंजाबमधील विरोधी पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाचे नेतेही सहभागी झाले होते. अकाली दलाचे माजिंदर सिंग सिरसा यांच्यासह इतर नेते आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल स्थानिक नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला. बाहेर येऊन आंदोलनात सहभागी होणारे नेते त्यांच्या राजकीय फायद्यासाठी परिस्थिती बिघडवत असल्याचं स्थानिक नेत्यांनी म्हणणं आहे. दरम्यान, न्यायालयाने मुलीचा ताबा तिच्या आईवडिलांकडे दिला आहे.
यासंदर्भात काश्मिरातील शीखांच्या सर्व पक्षांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष जगमोहन सिंग रैना इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले, “पोलिसांनी मुलीच्या वडिलांना न्यायालयात जाऊ दिलं नाही. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी काही नातेवाईक आणि मित्रांना बोलावून घेतलं. त्याचबरोबर शीख समुदायातील इतर लोकही न्यायालयाबाहेर जमा झाले आणि प्रवेश न दिल्याप्रकरणी त्यांनी निदर्शनं केली,” अशी माहिती त्यांनी दिली.
“मला याची माहिती मिळाल्यानंतर मी राज्यपालांच्या सल्लागारांना फोन केला. त्यानंतर न्यायालयात गेलो. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, निदर्शनं करणारे आपापल्या घरी गेले, तर ते मुलीला आईवडिलांच्या स्वाधीन करतील. मी आंदोलकांना हे समजून सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मुलीला पालकांच्या स्वाधीन केलं,” असं ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर पोलिसांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र, पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीनं कुटुंबियांनी केलेल्या आरोपांविरुद्ध भूमिका न्यायालयात मांडली. आपण स्वतःच्या मर्जीने विवाह केला असल्याचं तिने न्यायालयात सांगितलं.