पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ जिल्ह्य़ांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. करोनाविरुद्धच्या लढय़ात राज्यातील आणि जिल्ह्य़ातील अधिकारी हे ‘फिल्ड कमांडर’ आहेत, असे नमूद केलं. स्थानिक स्तरावर प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करून चाचण्यांची व्याप्ती वाढविणे आणि जनतेला योग्य आणि परिपूर्ण माहिती देणे ही करोनावर मात करण्याचे मार्ग आहेत, असं मोदींनी या बैठकीच्या वेळी सांगितलं. अनेक वृत्तवाहिन्यांवरुन मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेली ही बैठक लाइव्ह दाखवण्यात आली. मात्र आता यावरुनच दिल्लीमध्ये सत्तेत असणाऱ्या आम आदमी पार्टीने आक्षेप घेत केंद्र सरकार आणि मोदींना प्रोटोकॉलची आठवण करुन दिलीय.

नक्की पाहा >> व्हायरल व्हिडीओ : मोदी चूकून म्हणाले, “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या” 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मोदींची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक लाइव्ह दाखवण्यावरुन टोला लगावला. “आजच्या बैठकीमधील पंतप्रधान मोदींचं वक्तव्य टीव्हीवर लाइव्ह दाखवण्यात आलं. मागील बैठकीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लाइव्ह प्रसारणावर आक्षेप नोंदवत प्रोटोकॉल मोडल्याचं म्हटलं होतं. आजच्या बैठकीमधील प्रोटोकॉलमध्ये लाइव्ह प्रसारणाची परवानगी होती का? कसं कळणार की कोणत्या बैठकीचं लाइव्ह प्रसारण करायचं आणि कोणत्या बैठकीचं नाही?,”असा प्रश्न सिसोदिया यांनी विचारलाय.

ती बैठक गाजली…

२३ एप्रिल रोजी देशातील ऑक्सिजनच्या अभूतपूर्व टंचाईवर चर्चा करण्यासाठी मोदींनी आयोजित केलेली मुख्यमंत्र्यांची बैठक राजकीय वादात सापडली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीचे ‘थेट प्रक्षेपण’ केल्यामुळे संतापलेल्या भाजपाने केजरीवाल यांच्या ‘माफीनाम्या’ची चित्रफीत सोशल नेटवर्किंगवर प्रसिद्ध करून ‘ऑक्सिजनच्या राजकारणा’वर प्रत्युत्तर दिले.

तेव्हा केजरीवाल काय म्हणाले होते?

दिल्लीत ऑक्सिजनची मोठी टंचाई असून एखादी भयानक दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? शेजारील राज्यांकडून प्राणवायूचे टँकर अडवले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत केंद्रात कोणाशी संपर्क साधायचा? पंतप्रधान म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा, असे बैठकीत केजरीवाल पंतप्रधानांना म्हणाले होते. बैठकीत केजरीवाल यांचे हे म्हणणे वृत्तवाहिन्यांवर लाइव्ह दाखवण्यात आले होते. केजरीवाल यांनी पंतप्रधान कार्यालयाला न सांगताच बैठकीतील घडामोडी प्रक्षेपित केल्यामुळे भाजपाने आम आदमी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला. मात्र, या बैठकीतील कोणतीही गोपनीय माहिती प्रसारित केली गेली नसल्याचा दावा केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने केला. बैठकीचे थेट प्रक्षेपण न करण्याचे कोणतेही संकेत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री कार्यालयाने भाजपाच्या आरोप फेटाळून लावले.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश : करोनामुळे भाजपाच्या पाचव्या आमदाराचा मृत्यू; योगी सरकारमधील मंत्र्याचं निधन

मोदींनी नोंदवला आक्षेप

या बैठकीत केजरीवाल म्हणणे मांडत असताना पंतप्रधान मोदींनी त्यांना अडवले. ‘परंपरा आणि शिष्टाचार न पाळता या खासगी बैठकीचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. एखाद्या मुख्यमंत्र्याकडून अशी बाब होणे योग्य नसून त्यांनी संयम पाळला पाहिजे’, अशा शब्दांत मोदींनी आक्षेप नोंदवला. त्यावर भविष्यात  या सूचनेचे पालन केले जाईल, असे सांगत केजरीवाल यांनी माफी मागितली.