करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण आरोग्य यंत्रणेचं पितळ उघडं पडलं आहे. रुग्णालयात बेडपासून ऑक्सिजनपर्यंत सर्वच रामभरोसे सुरु असल्याचं दिसत आहे. करोनाग्रस्त रुग्णांसोबत नातेवाईकांची फरपट होत आहे. करोनामुळे संपूर्ण देशात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन आणि रुग्णालयात बेड मिळत नसल्याने अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागत आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना ग्रेटर नोएडामध्ये समोर आली आहे.

ग्रेटर नोएडामधील एका ३५ वर्षीय करोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात बेड न मिळाल्याने पार्किंग स्लॉटमध्ये उभ्या असलेल्या गाडीतचं मृत्यू झाला. जागृती गुप्ता असं महिलेचं नाव आहे. गाडीत सुरु असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकाने बेडसाठी नोएडातील सरकारी रुग्णालयाकडे अक्षरश: भीक मागितली. हातापाया पडला मात्र रुग्णालय प्रशासनाला काही पाझर फुटला नाही. अखेर महिलेला प्राणाला मुकावं लागलं. शेवटी डॉक्टरांनी तिला गाडीतच तपासून मृत घोषित केलं. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीने केला आहे. तिचा पती आणि दोन मुलं मध्य प्रदेशात राहात असून ती एकटी कामानिमित्त नोएडात राहात होती. तिच्या निधनाने दोन लहान मुलं पोरकी झाली आहेत.

मोहम्मद शाहबुद्दीन यांचं करोनामुळे निधन; तिहार तुरूंगातून हलवलं होतं ‘डीडीयू’मध्ये

मृत्यूनंतरही करोनाबाधीत महिलेची फरपट थांबली नाही. अंतिम संस्कारसाठी स्थानिक प्रशासन ढीम्मच होतं. तिचा मृतदेह गाडीत तीन तास तसाच पडून होता. बऱ्याच प्रयत्नानंतर कर्मचारी तिथे आले आणि तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

करोनाच्या धोक्यामुळे केंद्र सरकारकडून ३ ते २० मे दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाउनची घोषणा? जाणून घ्या काय आहे सत्य

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात ऑक्सिजन बेड्सची कमतरता नसल्याचा दावा केला आहे. मात्र वास्तविक पाहता अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड अभावी प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे जनतेचा रोष वाढू लागला आहे. नोएडात ८,२०० अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. तर २१२ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी सरकारने शुक्रवारी जाहीर केली आहे.