उत्तर प्रदेशमधील करोना हाताळणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले. उत्तर प्रदेश सरकारने करोनाची दुसरी लाट अभूतपूर्व पद्धतीने नियंत्रणात आणली, असे पंतप्रधान म्हणाले.

वाराणसीतील आयआयटी- बीएचयू मैदानावर गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी १५०० कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचा शिलान्यास केला. त्यानंतर, जपानच्या मदतीने उभारण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल को-ऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर- रुद्राक्ष’चे त्यांनी उद््घाटन केले. करोनाची हाताळणी करण्यात उत्तर प्रदेश सरकारने केलेले प्रयत्न  ‘कौतुकास्पद’ असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, ‘‘उत्तर प्रदेशची लोकसंख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही मोठी आहे. मात्र ज्या  प्रकारे सरकारने करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणली व त्याचा फैलाव रोखला, ते अभूतपूर्व आहे.’’

यापूर्वी लहानसहान समस्याही आरोग्यविषयक सुविधांच्या कमतरतेमुळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत. मेंदूज्वरासारख्या आजारांचा सामना करण्यात येणाऱ्या अडचणींचा काळ उत्तर प्रदेशच्या लोकांनी पाहिलेला आहे. सध्या करोना ही जगाला भेडसावत असलेली गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठी समस्या आहे. ही सर्वात मोठी महासाथ आहे व त्यामुळे करोनाच्या हाताळणीसाठी उत्तर प्रदेशने केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत, असे मोदी म्हणाले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दलही पंतप्रधानांनी राज्य सरकारची प्रशंसा केली. उत्तर प्रदेशात आज कायद्याचे राज्य आहे. एकेकाळी नियंत्रणाबाहेर असलेल्या माफियाराज आणि गुंडगिरीवर आता कायद्याचा वचक आहे, असे ते म्हणाले.

योगींवर स्तुतिसुमने…

राज्यात २०१७ आधी निधी किंवा योजनांची करतरता नव्हती. मात्र, २०१४ नंतरच्या केंद्रातून होणाऱ्या विकासासाठीच्या प्रयत्नात राज्यात खोडा घातला जात होता. मात्र, आता योगी आदित्यनाथ कठोर परिश्रम घेत असून, ते व्यक्तिश: सर्व विकास प्रकल्पांवर देखरेख ठेवत आहेत, असे मोदी म्हणाले.