नवी दिल्ली : खोकताना, शिंकताना अथवा अगदी बोलतानाही बाहेर पडणारे सूक्ष्म तुषार हवेत १० मीटर अंतरापर्यंत पसरू शकतात, असा इशारा सरकारने गुरुवारी दिला. करोनाशी लढण्यासाठी सहज अनुसरण करता येणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून त्यामध्ये दुहेरी मुखपट्ट्या, सामाजिक अंतर आणि हवेशीर जागा यांचा समावेश आहे.

हवा खेळती कशी राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास करोनाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करता येऊ शकतो, असे केंद्र सरकारचे प्रधान विज्ञान सल्लागार के. विजयराघवन यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. दारे, खिडक्या बंद करून वातानुकूल यंत्राचा वापर करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. वातानुकूल यंत्र सुरू असल्यास खोलीतील हवा बाधित होते आणि बाधितापासून त्याची इतरांना लागण होण्याचा धोका असतो, असेही विज्ञान सल्लागारांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

ज्या लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत तेही या विषाणूचा प्रसार करू शकतात हे ध्यानात ठेवावे, असे ‘स्टॉप द ट्रान्समिशन, क्रश द पॅण्डेमिक’ असे शीर्षक असलेल्या दस्तऐवजामध्ये म्हटले आहे व जनतेला करोना विषयक नियमांचे कटाक्षाने पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे. लाळ आणि बिंदूंच्या स्वरूपामध्ये बाहेर पडणारा अनुनासिक स्राव आणि बाधित व्यक्तींचे सूक्ष्म तुषार हे विषाणूच्या प्रसाराचे प्राथमिक माध्यम आहे, असेही दस्तऐवजामध्ये म्हटले आहे.